
Maratha reservation impact on EWS student admissions : मराठा आरक्षणाचा तिढा अद्यापही मार्गी लागलेला नाही. इतर मागासप्रवर्गातून, ओबीसीतून आरक्षण मिळण्यासाठी संघर्ष सुरूच आहे. दरम्यान राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या (सीईटी कक्ष) अहवालातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यानुसार मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना सामाजिक आणि आर्थिक मागासप्रवर्गातून (SEBC) अभियांत्रिकी, वैद्यकीय, विधी आणि कृषी शाखेतील अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यात येत आहे. तर त्याचवेळी इतर मागासप्रवर्गातूनही काहींचे अर्ज दाखल झाले आहे. त्याचा फटका ईडब्ल्यूएस प्रवर्गाला बसला आहे. या प्रवर्गातील १५ टक्क्यांनी घट झाल्याचा दावा करण्यात येत आहे.
तीन वर्षांतील धक्कादायक आकडेवारी
मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय प्रवर्गातून (एसईबीसी) प्रवेश देण्याचा निर्णय यापूर्वी फडणवीस सरकारच्या काळात घेण्यात आला होता. त्याचा परिणाम आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकामधील प्रवर्गातील (ईडब्ल्यूएस) प्रवेशावर दिसत आहे. SEBC मुळे ईडब्ल्यूएस प्रवर्गातील प्रवेशांवर परिणाम झाला. प्रवेशांमध्ये गेल्या तीन वर्षांमध्ये १५ टक्क्यांनी घट झाली आहे. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (CET Cell) याविषयीचा अहवाल उच्च व तंत्रशिक्षण विभागाला सादर केला. त्यात ही धक्कादायक बाब समोर आली.
सीईटी कक्षाच्या अहवालात दावा काय?
सीईटी कक्षाने जो अहवाल उच्च व तंत्रशिक्षण विभागाला सादर केला. त्यानुसार, २०२३-२४ मध्ये राज्यात ईडब्ल्यूएस प्रवर्गासाठी ११ हजार १८४ जागा होत्या. या जागांवर ७ हजार ३५२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. प्रवेशाची टक्केवारी ६५.७४ टक्के इतकी होती. तर २०२४-२५ मध्ये जागांची संख्या १२ हजार ७०४ झाली. यावेळी जागा वाढल्या. मात्र प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली.
२०२४-२५ मध्ये ७ हजार २७६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये ईडब्ल्यूएस प्रवर्गात १ हजार ६८९ इतक्या जागा वाढल्या आहेत. आता उपलब्ध जागांची संख्या १४ हजार ३९३ इतकी वाढली आहे. तर दुसरीकडे प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ३५ ने घटली. २०२५-२६ मध्ये ७ हजार २४१ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. तीन वर्षांमध्ये ईडब्ल्यूएस प्रवर्गातून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या १११ ने कमी झाल्याचे अहवालात नमुद करण्यात आले आहे. तर दुसरीकडे ईडब्ल्यूएससाठी उपलब्ध जागांची संख्या सातत्याने वाढली आहे. प्रवेशाची टक्केवारी ६५.७४ वरून ५०.३१ टक्क्यांवर घसरली आहे. अनेक विद्यार्थी एसईबीसी ऐवजी आता ईडब्ल्यूएस पर्याय निवड असल्याने हा परिणाम झाल्याचा दावा करण्यात येत आहे.