‘एक वेळी आई मेली तरी चालेल…’ मराठीवरून शिंदे सेनेच्या आमदाराचे वादग्रस्त वक्तव्य; वाद पेटल्यावर हात जोडत म्हणाले…
Eknath Shinde Shivsena MLA Statement : महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जशा जवळ येत आहे. तसे मतदारांचे लांगुलचालन करण्याचे प्रकार वाढले आहे. त्यात आता शिंदे सेनेच्या या आमदाराने मराठी-हिंदी भाषेवरून मोठे वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

MLA Prakash Surve Statement : राज्यात इयत्ता पहिलीपासून हिंदीची सक्ती करण्याचा निर्णय वादग्रस्त ठरला होता. याच मुद्दावरून उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे एकत्र आले. चार महिन्यांपूर्वी मराठी आणि हिंदीचा मुद्दा राज्यात ऐरणीवर आला. आता स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निडवणुका जवळच येताच पुन्हा हा मुद्दा उफाळला आहे. मागाठाण्याचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी मोठे वादग्रस्त विधान केले आहे. त्यावरून आता वाद पेटण्याची चिन्ह आहेत.
आई मेली तरी चालेल
मागाठाण्याचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी मराठी ही माझी आई आहे. तर उत्तर भारत (हिंदी) ही माझी मावशी आहे. एक वेळ आई मेली तरी चालेल पण मावशी जगली पाहिजे असे वक्तव्य करून वाद ओढावून घेतला. शिवेसना आणि मनसेकडून त्यांच्यावर टीकास्त्र सुरु झाले. मतांच्या लाचारीसाठी सुर्वे यांनी असे वक्तव्य केल्याचा आरोप विरोधकांनी केला. उद्धव सेनेच्या किशोरी पेडणेकरांनी सुर्वे यांच्यावर निशाणा साधला आहे. 2022 रोजी आईलाच नमस्कार करुन ते बाहेर पडले. त्यांना आई आणि माता याच्यातील फरक तरी कळतो का? असा सवाल त्यांनी केला. मतांच्या लाचारासाठी त्यांनी असं विधान केल्याचे पेडणेकर म्हणाल्या.
हात जोडून मागितली माफी
उद्धव सेना आणि मनसे नेत्यांनी टीकेची झोड उठवल्यानंतर अखेर आमदार प्रकाश सुर्वे यांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. मराठी माझी मायमावली आहे. अनावधनाने माझ्याकडून तो शब्द बाहेर पडल्याची सरावासारव त्यांनी केली. कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर आपण दिलगिरी व्यक्त करतो असे म्हणत सर्वे यांनी हात जोडून माफी मागितली.
तर मंत्री उदय सामंत यांनी आमदार सुर्वे यांच्याकडून चुकून हा शब्द बाहेर पडला. त्यांनी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. पण काही जण त्यांच्या वक्तव्याचा आधार घेत राजकीय पोळी भाजण्याचे काम करत आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून दिला आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात मराठी भाषेसाठी आम्ही काम करत असल्याचे सामंत म्हणाले.
