
येत्या 29 ऑगस्ट रोजी मराठा वादळ मुंबईत येऊन धडकणार आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी हाक दिली आहे. मुंबईत आरक्षणाचा हुंकार घुमणार आहे. गेल्या काही वर्षांपासून मराठा आरक्षणासाठी मुंबईसह राज्यात लाखोंचे मोर्चे काढण्यात आले. ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण देण्याची आणि सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. यापूर्वी मुंबईच्या वेशीवर वाशी येथे मराठा वादळ धडकले होते. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक मागण्या मान्य केल्या होत्या. त्यातील काहींची अद्याप अंमलबजावणी न झाल्याने तसेच ओबीसी प्रवर्गातून मराठ्यांना सरसकट आरक्षण न दिल्याने आता मराठा समाजाचा मोर्चा मुंबईत धडकणार आहे.
तिसर्या दिवशी आरक्षणाचा गुलाल
29 ऑगस्ट रोजी केवळ दोन दिवसासाठी मुंबईला या, तिसर्या दिवशी आरक्षणाचा गुलाल अंगावर पडला समजा. यावेळी तीन ते चार कोटी मराठे मुंबईला येतील असं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे. जरांगे पाटील यांच्याकडून रात्री उशिरा परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील धारसुर येथे पारावरची चावडी बैठक घेण्यात आली. त्यावेळी जरांगे पाटील यांनी हे वक्तव्य केले.
ही आरपारची लढाई
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षणासाठी आता आरपारची लढाईची घोषणा केली आहे. गेल्या महिन्यात अंतरवाली सराटीत महत्त्वाची बैठक झाली. त्यात त्यांनी मुंबईमध्ये आंदोलनाची घोषणा केली. मराठा समाजाला कोणीही रोखू शकत नाही. आता विजयाचा गुलाल घेऊनच यायचे असे आवाहन त्यांनी समाजाला केले.
27 ऑगस्ट रोजी जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात अंतरवाली सराटी येथून मराठा समाजाचा मोर्चा निघेल. तो 29 ऑगस्ट रोजी मुंबईत धडकेल. अंतरवाली सराटी येथून शहागड, पैठण, शेवगाव, पांढरीपूल, अहिल्यानगर, नेप्टी नाका मार्गे, आळेफाटा, शिवनेरी दर्शन, माळशेज घाट, कल्याण, वाशी, चेंबूर आणि पुढे मंत्रालयावर हा मोर्चा धडकणार आहे. मोर्चासाठी पैठण, गंगापूर, वैजापूर, येवला, नाशिक आणि पुढे मुंबई असा पर्यायी मार्ग ही असेल.
या मोर्चात महाराष्ट्रातून लाखोच्या संख्येने समाज रस्त्यावर उतरेल अशी माहिती त्यांनी दिली. या मोर्चाच्या दृष्टीने राज्यात विविध ठिकाणी चावडी बैठका घेण्यात येत आहे. मनोज जरांगे पाटील हे मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात चावडी बैठका घेत आहेत. यावेळी मुंबईत 3 ते 4 कोटी मराठे येतील अशी माहिती जरांगे पाटील यांनी दिली.