Chagan Bhujbal : मनोज जरांगेंमुळे मराठा समाजाचं मोठं नुकसान, छगन भुजबळांनी पुन्हा काढले अस्त्र, त्या वक्तव्याने आता वाद पेटणार

Chagan Bhujbal on Manoj Jarange Patil : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यातील वाकयुद्ध पुन्हा रंगण्याची शक्यता आहे. जरांगे पाटील यांचा चलो मुंबईचा पवित्रा आणि भुजबळांची जरांगेंच्या आंदोलनावरची टीका यांचा जणू योग्य जुळून आला आहे. त्यामुळे पुन्हा वाद पेटण्याची शक्यता आहे.

Chagan Bhujbal : मनोज जरांगेंमुळे मराठा समाजाचं मोठं नुकसान, छगन भुजबळांनी पुन्हा काढले अस्त्र, त्या वक्तव्याने आता वाद पेटणार
छगन भुजबळांचा घणाघात
Image Credit source: गुगल
| Updated on: May 06, 2025 | 5:43 PM

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यातील वाकयुद्धाची ठिणगी पडली आहे. छगन भुजबळ यांनी पहिली तोफ डागली आहे. भुजबळ यांच्या वक्तव्याने वाद रंगण्याची शक्यता आहे. भुजबळ यांनी मनोज जरांगे यांच्यावर चांगलेच तोंडसुख घेतले आहे. जरांगे पाटील यांचा चलो मुंबईचा पवित्रा आणि भुजबळांची जरांगेंच्या आंदोलनावरची टीका यांचा जणू योग्य जुळून आला आहे. त्यामुळे पुन्हा वाद पेटण्याची शक्यता आहे.

आरक्षण पुन्हा बहाल

माझी नाराजी त्या ठिकाणी आहे. ओबीसी आणि सभागृहावरील संकट दूर झालेलं आहे. आमचं आरक्षण आम्हाला पुन्हा बहाल केलं गेलं आहे. आठ कोटी जनतेचा आनंदाचा क्षण आहे कारण सुप्रीम कोर्टाने आमचं आरक्षण आम्हाला दिलंय, अशी प्रतिक्रिया भुजबळांनी दिली.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने आनंद

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने आनंद झाल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. कोणीही नाराज होण्याची गरज नाही. आमचं आरक्षण 1994-1995 पासून मिळालेलं आहे. यामध्ये काही लोकांनी फांद्या मारून कोर्टात जाऊन अडचणी निर्माण केल्या. त्यामुळे आमचं आरक्षण खाली वर होत होतं. सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिलाय त्यावर कोणीही नाराज होण्याचं कारण नाही. हा क्षण आनंदाचा असल्याचे ते म्हणाले.

मराठा समाज आरक्षण

मराठा आरक्षणाविषयी त्यांनी बोलकी प्रतिक्रिया दिली. जे झालंय जे होतंय ते तुमच्या समोर आहे. जे नवीन नेते उभे राहिलेत ते काही निर्णय घेताय. अनेकवेळा अभ्यासही नसतो आरक्षण कशाला म्हणतात ते का द्यायचं आहे, कसं द्यायचं आहे , सुप्रीम कोर्ट आणि आयोगाचे निर्णय काय आहे, महाराष्ट्राची सामाजिक परिस्थिती काय आहे याचा अभ्यास ज्यांना आहे ते नाराज होत नाही. ज्यांचा अभ्यास नाही त्यांना काय वाटतं त्याची पर्वा करण्याचं काही कारण नाही, असा टोला छगन भुजबळांनी लगावला.

मराठा समाजाला वेगळं दहा टक्के आरक्षण दिलं आहे. मराठा समाजाचे आरक्षण फडणवीस सरकारने मान्य केलंय. आमचं म्हणणं आहे की तुमचं आरक्षण तुम्ही सांभाळा त्याचा तुम्ही फायदा करून घ्या. गोर गरीब आणि भटक्या विमुक्त जनतेचे आरक्षण त्यांना सांभाळुन घ्या. त्यांना सहकार्य करा, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

अनेक नेते निवडून येतात ते मराठा समाजाचे आहे त्यांनी यापूर्वीच कुणबी सर्टिफिकेट घेतले आहे. तरीसुद्धा ओबीसी बाजूने लढताना ते ओबीसी बाजूने लढत नाही ते विरुद्ध बाजूने लढतात. तुम्ही ओबीसी सर्टिफिकेटवर फायदा घेतला आहे तर तुम्ही ओबीसी बाजूने लढा. ओबीसींवर अन्याय होतोय एकतर ओबीसी जागा घ्यायच्या आणि जागा घेऊन तिथं बसून पुन्हा ओबीसीला विरोध करायचा, असा आरोप त्यांनी केला आहे.

मनोज जरांगे यांच्यावर घणाघात

मनोज जरांगे यांनी सक्रिय होऊन काहीही फायदा नाही. मराठा समाजाचे जास्तीत जास्त नुकसान त्यांनी केलाय, अशी टीका छगन भुजबळ यांनी केली. प्रत्येक गावागावातील मराठा समाज बांधवांना आणि गावातील वातावरण बिघडवण्याचे काम त्यांनी केलं आहे. दुसरं काहीही झालं नाही, अशी बोचरी टीका त्यांनी मनोज जरांगे पाटलांवर केली.