
मनोज जरांगे पाटील यांनी मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी हैदराबाद गॅझेट लागू करण्याची आणि पश्चिम महाराष्ट्रातील मराठा बांधवांसाठी सातारा गॅझेट लागू करण्याची मागणी केली होती. त्यानंतर हे गॅझेट लागू करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पण मराठवाड्यातील या 8 गावांनी हैदराबाद गॅझेटला विरोध केला. या गावकऱ्यांना सातारा गॅझेट लागू करण्याची मागणी केल्याने प्रशासनासमोर पेच पडला आहे. का केली या गावकऱ्यांनी अशी मागणी?
धाराशिव जिल्ह्यातील 8 गावांमध्ये सातारा गॅझेट का?
धाराशिव जिल्ह्यातील 8 गावांमध्ये सातारा गॅझेट का? हैदराबाद गॅजेट याविषयी संभ्रम का असा सवाल यानिमित्ताने समोर आला आहे. त्यामागील कारणही गावकऱ्यांनी दिले आहे. 1982 पर्यंत धाराशिव जिल्ह्यातील 9 गावांचा समावेश सोलापूर जिल्ह्यामध्ये तर आता धाराशिव जिल्ह्यामध्ये समाविष्ट असल्याने संभ्रम निर्माण झाल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.
ग्रामस्थांची मागणी काय?
कुणबी नोंदी शोधण्यासाठी राज्य सरकारने हैदराबाद गॅजेट का? सातारा गॅजेट या संदर्भात स्पष्ट माहिती द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. हैदराबाद गॅझेट मध्ये मराठवाड्याची माहिती तर सातारा गॅजेट मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील माहिती असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. 1982 पर्यंत ही गावं सोलापूर जिल्ह्यात होती. म्हणजे सातारा गॅझेट त्यांना लागू होणार असा त्यांचा दावा आहे. या सर्व घडामोडींमुळे प्रशासन आता पेचात पडलं आहे.
या गावांनी केली सातारा गॅझेटची मागणी
याविषयीचे मोडी लिपीतील सर्व पुरावे कसबे तडवळा येथील जिल्हा परिषद शाळेच्या रेकॉर्डमध्ये उपलब्ध आहे. आंबेजवळगा, कौडगाव, येडशी,जवळा, दुधगाव, कसबे तडवळा ,गोपाळवाडी,कोंबडवाडी आशा 8 गावांचा 1982 पर्यंत पश्चिम महाराष्ट्रामध्ये समावेश होता. या 8 गावातील ग्रामस्थ कुणबी नोंदी शोधण्यासाठी आहेत संभ्रमात, प्रशासनाने लवकरात लवकर याविषयी माहिती स्पष्ट करून जनजागृती करण्याची मागणी केली आहे.
सातारा गॅझेट, औंध गॅझेटबाबत लगबग
दरम्यान सातारा गॅझेट लागू करण्याबाबत प्रशासकीय स्तरावर लगबग सुरू झाली आहे. याविषयी समितीच्या बैठकांना वेग आला आहे. येत्या काही दिवसात सातारा गॅझेट लागू करण्याची तयारी प्रशासन स्तरावर सुरू झाली आहे. तर औंध गॅझेट लागू करण्याविषयी पण चाचपणी सुरू आहे. औंध गॅझेटमधील नोंदी तपासणीचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे या भागातील मराठा कुणबी नोंदीची स्पष्टता समोर येणार आहे.