मुंबई महापालिकेच्या विजयासाठी मनसेचा प्लॅन तयार, राज ठाकरेंनी टोचले कार्यकर्त्यांचे कान
राज्यातील येणाऱ्या महापालिका निवडणुकांसाठी मनसेने जोरदार तयारी सुरू केली आहे. राज ठाकरे यांनी अलीकडेच प्रमुख नेत्यांची बैठक घेतली, त्यात वॉर्डनिहाय मतदार यादी तपासणी, ११० सदस्यांची टीम तयार करणे आणि खालच्या पातळीपर्यंत संघटनात्मक बळकटीकरण यावर भर देण्यात आला.

राज्यातील लोकसभा, विधानसभा निवडणुकीनंतर सध्या येणाऱ्या महापालिका निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. त्यातच आता मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जोरदार तयारी सुरू केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे गेल्या काही दिवसांपासून ठिकठिकाणी अनेक प्रमुख नेते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. आता नुकतंच राज ठाकरे यांनी मुंबईतील प्रमुख नेते आणि पदाधिकाऱ्यांची एक महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी आगामी निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत काही महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. यावेळी त्यांनी प्रत्येक कार्यकर्त्यांने निवडणुकीच्या कामाला लागावे, असे आवाहन केले.
राज ठाकरे यांनी नुकतंच मुंबईतील प्रमुख नेते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत राज ठाकरे यांनी प्रत्येक शाखाध्यक्षाला आपल्या वॉर्डमधील मतदार याद्या तपासण्यासाठी दोन कार्यकर्त्यांची नेमणूक करावी, असे आदेश दिले आहेत. यासोबतच प्रत्येक वॉर्डमधून ११० जणांची एक मजबूत टीम तयार करावी. या सर्व कामाचा सविस्तर आढावा अनंत चतुर्दशीनंतर आपल्याला नेत्यांकडून सादर करण्यात यावा, अशी सूचना राज ठाकरेंनी केली आहे.
खालच्या स्तरापर्यंत यंत्रणा राबवा
या बैठकीत राज ठाकरे यांनी यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना कानही टोचले. फक्त सभेला गर्दी होते म्हणून आपण निवडणूक जिंकू शकत नाही. त्यासाठी आपल्याला निवडणुकीची यंत्रणा ही खालच्या स्तरापर्यंत राबवायला हवी, असे राज ठाकरेंनी स्पष्ट भाषेत म्हटले. या बैठकीवेळी राज ठाकरेंनी प्रत्येक विभाग आणि वॉर्ड स्तरावर कार्यकर्त्यांना विशिष्ट जबाबदाऱ्या सोपवल्या आहेत. इतर पक्षांपेक्षा आपली स्थिती अधिक मजबूत आहे. गटाध्यक्ष आणि इतर पदाधिकाऱ्यांनी विशेष जबाबदारी घेऊन कामाला लागावे, अशा सूचना राज ठाकरेंनी केल्या. २०१७ पासून मी मतदार यादीतील घोळाबद्दल बोलत आहेत. आता इतर पक्षही हाच मुद्दा उचलत आहेत, असे राज ठाकरे यांनी यावेळी म्हटले. यामुळे येत्या महापालिका निवडणुकीसाठी मनसे पूर्णपणे सज्ज झाल्याचे पाहायला मिळत आहे.
मनसेमध्ये मोठे संघटनात्मक बदल
दरम्यान काही दिवसांपूर्वी राज ठाकरेंनी मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवली होती. यावेळी विविध विभागांमधून सादर करण्यात आलेल्या अहवालांवर बैठकीत विचारमंथन करण्यात आले. या विभागीय अहवाल सादर झाल्यानंतर मनसेमध्ये मोठे संघटनात्मक बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज ठाकरे यांनी यावेळी प्रत्येक विभागात मनसेची सद्यस्थिती काय, त्यात किती रिक्त पदे आहेत, यावरही चर्चा केली. ही सद्यस्थिती जाणून घेतल्यानंतर त्यानुसार रिक्त पदे भरण्याचा निर्णय राज ठाकरेंनी घेतला होता.
