हिंदी सक्ती अन् महाराष्ट्राला डिवचणाऱ्यांना राज ठाकरेंचे सडतोड उत्तर, भाषणातील महत्त्वाचे 10 मुद्दे
तब्बल २० वर्षांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत व्यासपीठावर एकत्र आलेल्या राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात विविध मुद्द्यांवर भाष्य केले.

महाराष्ट्र सरकारने त्रिभाषा सूत्रातील हिंदी भाषेच्या सक्तीचा निर्णय मागे घेतल्यानंतर आज मुंबईतील वरळी येथे विजयी मेळावा पार पडला. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे तब्बल २० वर्षांनी एकत्र आले. यावेळी राज ठाकरेंनी जोरदार भाषण केले. तब्बल २० वर्षांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत व्यासपीठावर एकत्र आलेल्या राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात विविध मुद्द्यांवर भाष्य केले.
बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं
राज ठाकरेंनी भाषणाच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर उपरोधिक टीका केली. “जे बाळासाहेबांना जमलं नाही, जे अनेकांना जमलं नाही, आम्हा दोघांना एकत्र आणण्याचं ते देवेंद्र फडणवीस यांना जमलं,” असे म्हणत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर उपरोधिक टोला लगावला.
मोर्चाचा कोणताही वेगळा झेंडा नाही
यानंतर राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंसोबत एकत्र येण्याच्या मुद्द्यावर भाष्य केले. कोणत्याही वादापेक्षा किंवा भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे, असे आपल्या मुलाखतीत म्हटले होते. त्यानंतर या गोष्टींची सुरुवात झाली आणि २० वर्षांनी मी उद्धव ठाकरेंसोबत एका मंचावर आलो, असे राज ठाकरे म्हणाले.
यावेळी राज ठाकरेंनी स्पष्ट केले की, “मेळाव्याचा किंवा मोर्चाचा कोणताही वेगळा झेंडा नाही, तर ‘मराठी हाच अजेंडा’ आहे. माझ्या मराठीकडे, महाराष्ट्राकडे वेड्यावाकड्या नजरेने कुणी पाहायचं नाही,” असा इशारा राज ठाकरेंनी दिला
आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर
“खरंतर हा प्रश्नच अनाठायी होता. गरज नव्हती. कुठून हिंदीचं आलं ते कळलं नाही. हिंदी, कशासाठी हिंदी? कुणासाठी हिंदी. तुम्ही लहान लहान मुलांवर जबरदस्ती करताय. कुणाला विचारायचं नाही. शिक्षण तज्ज्ञांना विचारायचं नाही. आमच्याकडे सत्ता आहे. आम्ही लादणार. तुमच्याकडे सत्ता असेल ती विधान भवनात. आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर”, असे राज ठाकरे म्हणाले.
महाराष्ट्र पेटून उठतो तेव्हा काय घडतं?
“महाराष्ट्रात प्रयोग करून पाहिला त्यांनी. दक्षिणेतील राज्य हिंग लावून विचारत नाही यांना. पण महाराष्ट्र पेटून उठतो तेव्हा काय घडतं आणि काय होतं हे राज्यकर्त्यांना समजलं असेल. त्याशिवाय का माघार घेतली. विनाकारण आणलेला विषय़ होता”, असेही राज ठाकरेंनी यावेळी म्हटले.
“हिंदी भाषिक राज्ये आर्थिकदृष्ट्या मागास असून, हिंदी न बोलणारी राज्ये आर्थिकदृष्ट्या प्रगत आहेत. हिंदी बोलणाऱ्यांना राज्य सांभाळता आले नाही, तरी आम्ही हिंदी का शिकावी”, असा सवाल राज ठाकरेंनी केला. बाळासाहेब ठाकरे आणि श्रीकांत ठाकरे हे इंग्रजी मीडियममध्ये शिकले आहेत. या दोघांवर मराठीबाबत शंका घ्याल का? लालकृष्ण आडवाणी सेंट पॅट्रीक हायस्कूल ख्रिश्चन मिशनरीमध्ये शिकले. हिंदुत्वावर शंका घेऊ का त्यांच्यावर. कॉन्व्हेंटमध्ये शिकले. दक्षिण भारतात बघा. त्यांना कोण विचारत नाही. उद्या हिब्रू भाषेत शिकेल आणि मराठीचा कडवट अभिमान बाळगेल. काय अडचण आहे? असा सवाल राज ठाकरेंनी केला.
पुन्हा जातीपातीचे राजकारण सुरू केले जाईल, राज ठाकरेंचा इशारा
आता सांगून ठेवतो. आज मराठी म्हणून एकत्र आला. महाराष्ट्रातील तमाम मराठी एकत्र आला आहे. याचं पुन्हा राजकारण तुम्हाला जातीत विभागतील. जातीचं कार्ड खेळतील. मराठी म्हणून तुम्हाला एकत्र येऊ देणार नाही. जातीपातीत विभागायला सुरू करतील. कुणाची माय व्यालीय त्यांनी महाराष्ट्राला हात घालून दाखवा. मुंबईला हात घालून दाखवा. मजाक वाटला का? आम्ही शांत आहोत याचा अर्थ गांडू नाही” अशा कठोर शब्दांत राज ठाकरेंनी महाराष्ट्राला किंवा मुंबईला डिवचणाऱ्यांना इशारा दिला.
मराठी माणूस, मराठी भाषा यावर तडजोड नाही
मराठी या विषयासाठी बाळासाहेब ठाकरे या माणसाने सत्तेवर लाथ मारली. हे संस्कार ज्याच्यावर झाले असेल तो मराठीसाठी तडजोड करेल का. युत्या आघाड्या होत राहतील. महाराष्ट्र, मराठी माणूस , मराठी भाषा यावर तडजोड होणार नाही. यावर सावध राहा. सतर्क राहा. पुढे काही गोष्टी घडतील माहीत नाही. पण मराठीसाठीची एकजूट कायम राहावी. महाराष्ट्रात बाळासाहेबांचं स्वप्न साकार व्हावं ही अपेक्षा व्यक्त करतो, असे राज ठाकरे म्हणाले.