राज ठाकरे-देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, वर्षावर खलबतं, नक्की काय घडणार?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. राज ठाकरे हे मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा निवासस्थानी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. यावेळी ते नागरिकांच्या समस्यासंदर्भात चर्चा करणार आहेत. त्यामुळे सध्या चर्चांना उधाण आले आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निवसास्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर राज ठाकरे आणि फडणवीसांची चर्चा होणार आहे. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मुंबईत पावसामुळे झालेली पूरस्थिती, पाऊस आणि मिठी नदीसह विविध नागरी समस्यांवर चर्चा करण्यासाठी राज ठाकरे हे फडणवीसांच्या भेटीला जात असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र सध्याच्या राजकीय घडामोडी पाहता या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकांच्या निकालाबद्दलही चर्चा करणार
राज ठाकरे हे त्यांच्या कृष्णकुंज निवासस्थानाहून मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी रवाना झाले. याआधीही त्यांची फडणवीसांसोबत एका हॉटेलमध्ये भेट झाली होती. गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा जोरदार सुरू आहे. तर दुसरीकडे राज ठाकरेंच्या मुख्यमंत्र्यांसोबतच्या भेटीमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. विशेष म्हणजे, नुकताच उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरेंनी ‘मातोश्री’वर जाऊन शुभेच्छा दिल्या होत्या, ज्यामुळे ठाकरे बंधूंच्या जवळिकीत वाढ झाल्याचे संकेत मिळाले होती.
सार्वजनिकरित्या देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे हे नागरी समस्यांवर चर्चा करणार असले तरी पडद्यामागे राजकीय विषयांवर महत्त्वाची चर्चा होण्याची शक्यता आहे. राजकीय नेत्यांच्या भेटींमधील गुप्त चर्चा नेहमीच गुलदस्त्यात राहतात. त्यामुळे या भेटीतून काही ठोस राजकीय निर्णय समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच काल झालेल्या बेस्ट पतपेढीच्या निवडणुकांच्या निकालाबद्दलही त्यांच्यात चर्चा होण्याची शक्यता आहेत
राजकीय वर्तुळाचे लक्ष
या भेटीच्या काही दिवसांपूर्वीच, राज ठाकरे आणि शिवसेनेचे नेते संजय राऊत हे शेतकरी कामगार पक्षाच्या मेळाव्यात एकाच मंचावर एकत्र आले होते. तसेच दहीहंडीच्या उत्सवातही दोन्ही पक्षांचे नेते एकत्र दिसले होते. या सर्व घटनांमुळे ‘ठाकरे बंधूंच्या युती’ची चर्चा सुरू झाली. खुद्द राज ठाकरेंनीही आपल्या पदाधिकाऱ्यांना आणि प्रवक्त्यांना ‘युतीबाबत कोणीही बोलू नका’ असे आदेश दिल्याचे समोर आले आहे. एकीकडे ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीची जोरदार चर्चा सुरू असताना, दुसरीकडे राज ठाकरे यांनी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नवे समीकरण तयार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही भेट केवळ नागरी समस्यांपुरती मर्यादित होती की, त्यात राजकारणाचेही काही धागेदोरे होते, हे येणारा काळच ठरवेल. मात्र, या भेटीने सध्या तरी राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेतले आहे.
