मुंबईकरांनो आता पुन्हा लावावे लागणार मास्क, कारण…
गेल्या काही दिवसांपासून मुंबईत वाऱ्याचा वेग कमी झाला आहे. त्यामुळे हवेतील प्रदूषणाचे प्रमाण झपाट्याने वाढू लागले आहे. यामुळे मुंबईतील रुग्णालयांमध्ये श्वसनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे.
Mumbai Air Pollution : गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील प्रदूषण सातत्याने वाढत आहे. नुकतंच महाराष्ट्रात मोठ्या धामधुमीत दिवाळी साजरी करण्यात आली. दिवाळीत मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. मात्र यामुळे मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावली आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून मुंबईत वाऱ्याचा वेग कमी झाला आहे. त्यामुळे हवेतील प्रदूषणाचे प्रमाण झपाट्याने वाढू लागले आहे. यामुळे मुंबईतील रुग्णालयांमध्ये श्वसनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे.
प्रदूषणाच्या प्रमाणात झपाट्याने वाढ
मुंबईत वाऱ्याचा वेग कमी झाला आहे. त्यामुळे हवेतील प्रदूषणाचे प्रमाण झपाट्याने वाढू लागले आहे. नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात मुंबईची हवा प्रदूषितच आहे. त्यामुळे सर्वत्र धुरकट वातावरण पाहायला मिळत आहे. तसेच यामुळे दृष्यमानताही कमी झाली आहे. मुंबईतील या प्रदूषणामुळे आणि खराब वाऱ्यामुळे सर्वत्र धुक्याची चादर पसरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
मुंबईकरांनो काळजी घ्या
हवामान तज्ज्ञांच्या मते, दिवाळीत फोडलेल्या फटाक्यांमुळे प्रदूषणात वाढ झाली आहे. मुंबईतील प्रदूषित हवेमुळे फुफ्फुसाच्या संसर्गाच्या रुग्णांमध्ये २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामुळे डॉक्टरांनी मुंबईकरांना काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. तसेच घराबाहेर पडताना मास्क लावावा, असा सल्लाही डॉक्टरांनी दिला आहे.
सध्या मुंबईतील वायू प्रदूषणात वाढ झाल्याने महापालिका प्रशासन हैराण झाले आहे. सध्या मुंबईत हवेचा गुणवत्ता निर्देशांक १२९ वर आहे. ही अत्यंत खराब श्रेणी असल्याने मुंबईतील हवेची गुणवत्ता ढासळली आहे. यावर तोडगा काढण्याचे शर्थीचे प्रयत्न मुंबई महापालिकेकडून केले जात आहे. मात्र याला कितपत यश येणार हे पाहणं महत्वाचे ठरेल.
कारण काय?
दरम्यान तज्ज्ञांच्या मते, हिवाळ्यात नोव्हेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत सर्वाधिक प्रदूषण असते. या वर्षी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासूनच प्रदूषणाचे प्रमाण वाढले आहे. मुंबईत सध्या अनेक बांधकामे आणि विकासकामे सुरू आहेत. त्यामुळे धुळीचे प्रमाण वाढत आहे.