70 टक्के ऑक्सिजन बेड, 200 आयसीयू बेड, आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात लहान मुलांसाठीचे पहिले जम्बो कोव्हिड सेंटर

| Updated on: May 09, 2021 | 3:33 PM

यात 70 टक्के ऑक्सिजन खाटा असतील तर 200 अतिदक्षता विभागातील खाटा असणार आहेत. (Jumbo Covid Center for children at Worli)

70 टक्के ऑक्सिजन बेड, 200 आयसीयू बेड, आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात लहान मुलांसाठीचे पहिले जम्बो कोव्हिड सेंटर
small child corona
Follow us on

मुंबई : राज्यासह देशभरात कोरोनाची दुसरी लाट प्रचंड थैमान घालत आहे. पहिल्या लाटेत वयस्कर नागरिकांना कोरोना संसर्गाचा जास्त धोका होता. या दुसऱ्या लाटेसह तिसऱ्या लाटेत लहान मुलं, गर्भवती महिला आणि तरुणांना कोरोनाचा सर्वाधिक धोका आहे. यामुळे राज्यात अनेक ठिकाणी चाईल्ड कोव्हिड सेंटर उभारले जाणार आहे. याठिकाणी मुलांसाठी बेड, व्हेंटीलेटर्स, आयसीयूसह सर्व सुविधा दिल्या जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईत लहान मुलांसाठी 500 खाटांचे स्वतंत्र जम्बो कोव्हिड सेंटर सुरु करण्यात येणार आहे. (Mumbai BMC To Setup Jumbo Covid Center for children at Worli)

1 वर्षापासून ते 18 वर्षे वयोगटातील मुलांवर उपचार 

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना सर्वाधिक धोका असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. हेच मत लक्षात घेऊन मुंबईत 500 खाटांचे लहान मुलांसाठी स्वतंत्र जम्बो कोविड केंद्र सुरू करण्यात येणार आहे. मुंबईत वरळी येथे पालिकेच्या माध्यमातून 500 खाटांचे जम्बो कोविड केंद्र उभारण्यात येणार आहे.

यात एक वर्षापासून ते 18 वर्षे वयोगटातील मुलांना दाखल केले जाणार आहे. या लहान मुलांबरोबर आई असणे गरजेचे आहे. हीच बाब लक्षात घेऊन क्युबिकल पद्धतीने या जम्बो केंद्राची निर्मिती केली जाणार आहे. यात 70 टक्के ऑक्सिजन खाटा असतील तर 200 अतिदक्षता विभागातील खाटा असणार आहेत.

आणखी तीन ठिकाणी जम्बो कोविड रुग्णालये उभारणार

वरळीत उभारण्यात येणारे हे लहान मुलांचे जम्बो कोविड केंद्र येत्या 31 मे पूर्वी उभारावे, असा पालिकेचा मानस आहे. याशिवाय प्रत्येकी दोन हजार खाटांची आणखी तीन जम्बो कोविड रुग्णालये उभारण्याचे काम सुरु झाले आहे. यातील एक मालाड येथे तर सायनच्या सोमय्या मेडिकल सेंटर आणि कांजुरमार्गच्या क्रॉम्प्टन कंपनीत नवीन जम्बो रुग्णालये उभी करण्यात येतील.

दरम्यान पालिका आयुक्तांनी राबवलेल्या कोरोना नियंत्रण कार्यक्रमाची दखल घेत जम्बो केंद्र उभारणीसह अत्यावश्यक बाबींसाठी 50 कोटी रुपयांचा निधी कंपन्यांच्या सामाजिक बांधिलकी (सीएसआर) निधीतून देण्यात आला आहे.

लहान मुलांची काळजी घ्या – मुंबईच्या महापौर 

मुंबईतील लहान मुलांसाठीचे पहिले कोव्हिड रुग्णालय हे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात बनणार आहे. लहान मुलांची आपण सर्वांनी काळजी घ्यायला हवी. लहान बालकांसाठी मुंबईत पालिकेचे 500 खाटांचे ‘जम्बो करोना केंद्र’ उभारले जाणार आहे. वरळीत हे केंद्र उभारण्यात येईल, अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.  (Mumbai BMC To Setup Jumbo Covid Center for children at Worli)

संबंधित बातम्या : 

कोरोनाचा लहान मुलांना विळखा, पुण्यासह ठाणे, नागपुरात चाईल्ड कोव्हिड सेंटर उभारणार

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना सांभाळा; संसर्ग रोखण्यासाठी घ्या मुलांची काळजी

कोरोनामुक्त मधुमेहींना म्युकोरमायकोसिसचा धोका, लक्षणं कोणती? आजार टाळण्याचे उपाय काय?