तुमची लोकल कधी येणार? मेगाब्लॉकमुळे मध्य रेल्वेच्या प्रवाशांचा संताप, वेळापत्रक कोलमडले
मध्य रेल्वेवर मेगाब्लॉकमुळे लोकल २० ते ३० मिनिटे उशिराने धावत असल्याने प्रवाशांचा संताप अनावर झाला आहे. ठाणे, कुर्ला आणि घाटकोपर स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी असून टॅक्सी भाड्यातही मोठी वाढ झाली आहे.

मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकल ट्रेनच्या प्रवाशांना आज पुन्हा एकदा मेगाब्लॉकचा सामना करावा लागणार आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर मार्गावर विविध अभियांत्रिकी देखभाल आणि तांत्रिक दुरुस्तीच्या कामांसाठी आज रविवारी (२५ जानेवारी २०२६) मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली आहे. मध्य रेल्वेच्या वतीने आज घेण्यात आलेल्या मेगाब्लॉकमुळे रविवारी मुंबईकरांचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले आहे. मुख्य आणि हार्बर अशा दोन्ही मार्गांवर तांत्रिक कामांमुळे प्रत्येक लोकल २० ते ३० मिनिटे उशिराने धावत आहे. तसेच काही फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे केवळ नोकरदारच नव्हे, तर सुट्टीचा आनंद घेण्यासाठी बाहेर पडलेल्या पर्यटकांचेही प्रचंड हाल होत आहेत.
मध्य रेल्वेवर वाहतुकीचा वेग मंदावला
मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर माटुंगा ते मुलुंड दरम्यान सकाळी ११.०५ ते दुपारी ३.४५ पर्यंत अप आणि डाउन जलद मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. सर्व जलद गाड्या माटुंगा आणि मुलुंड दरम्यान धीम्या मार्गावर वळवण्यात आल्या आहेत. एकाच ट्रॅकवर धीम्या आणि जलद अशा दोन्ही गाड्या आल्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला आहे. सध्या ठाणे, घाटकोपर आणि कुर्ला सारख्या महत्त्वाच्या स्थानकांवर लोकलच्या रांगा लागल्या आहेत. माटुंगा ते मुलुंड दरम्यान प्रवासासाठी एरवीपेक्षा दुप्पट वेळ लागत असल्याने प्रवाशांमध्ये संतापाची लाट आहे.
प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! 🚨 25.01.2026 रोजी मध्य रेल्वे, मुंबई विभागात मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. माटुंगा–मुलुंड दरम्यान अप/डाऊन जलद मार्गावर तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-चुनाभट्टी/बांद्रा डाऊन हार्बर मार्गावर आणि चुनाभट्टी/बांद्रा-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान… pic.twitter.com/Z5mJMBl2Su
— Central Railway (@Central_Railway) January 24, 2026
हार्बर रेल्वेच्या गाड्या प्रचंड उशिराने
तर हार्बर मार्गावर सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रे दरम्यान सेवा खंडित असल्याने प्रवाशांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.४० या काळात मुख्य सेवा बंद असल्याने प्रवाशांना कुर्ला स्थानकावर येऊन मुख्य मार्गाच्या लोकलचा आधार घ्यावा लागत आहे. मात्र, मुख्य मार्गावर आधीच ब्लॉक असल्याने तिथेही गाड्या प्रचंड उशिराने आहेत. पनवेल ते कुर्ला दरम्यान दर २० मिनिटांनी विशेष गाड्या सोडल्या जात असल्या, तरी प्रवाशांच्या वाढत्या संख्येपुढे या गाड्या अपुऱ्या पडत आहेत. सध्या बेलापूर, वाशी आणि नेरुळ स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी दिसून येत आहे.
प्रवाशांची दुहेरी कोंडी
सध्या लोकल उशिराने धावत असल्याने आणि अनेक फेऱ्या रद्द झाल्यामुळे प्रवाशांनी खासगी टॅक्सी किंवा रिक्षांकडे मोर्चा वळवला आहे. मात्र मागणी वाढल्याने ओला-उबर सारख्या ॲप्सवर भाडे (Surge Pricing) वाढलेले दिसत आहे. तर रिक्षाचालकही लांबच्या भाड्यासाठी नकार देत असल्याने प्रवाशांची दुहेरी कोंडी झाली आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना शक्य असल्यास आजचा प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे. तसेच, ब्लॉक संपल्यानंतरही सर्व गाड्या त्यांच्या नियमित वेळेवर येण्यासाठी रात्री ८ वाजेपर्यंतचा वेळ लागू शकतो. तोपर्यंत विलंबाचा हा सिलसिला सुरूच राहण्याची शक्यता आहे.
