मध्य रेल्वेचे तीन तेरा, प्रवाशांची तारांबळ, लोकलची सद्यस्थिती काय?
मुंबई लोकलच्या मध्य रेल्वेच्या सेवेत आज सकाळपासून मोठा खंड पडला आहे. ठाणे ते सीएसएमटी आणि कल्याण ते सीएसएमटी मार्गावरील लोकल गाड्या २०-२५ मिनिटांपर्यंत उशिराने धावत आहेत. काही लोकल रद्द झाल्या आहेत तर अनेक स्थानकांवर इंडिकेटर बंद असल्याने प्रवाशांना माहिती मिळत नाही.

मुंबईकरांची लाईफलाईन असलेल्या मुंबई लोकलच्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. आज सकाळपासून मध्य रेल्वेचे तीन तेरा वाजले आहेत. मध्य रेल्वे पुन्हा विस्कळीत झाली आहे. आज सकाळपासून ठाण्यातून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मध्य रेल्वेच्या सेवा विस्कळीत झाल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील ठाण्याहून सीएसएटीकडे जाणाऱ्या जलद लोकल गाड्या २० ते २५ मिनिटे उशिराने धावत आहेत. तर धिम्या मार्गावरील लोकलही १० मिनिटे विलंबाने धावत आहेत. यामुळे प्रवाशांची तारांबळ उडाली आहे. तसेच कल्याण डोंबिवलीहून मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांनाही मोठा विलंब लागत आहे. त्यामुळे प्रवाशांनी संतापले आहेत.
लोकल अर्धा तास उशिराने
तसेच सध्या कल्याणहून मुंबई CSMT कडे येणाऱ्या करणाऱ्या लोकल गाड्या अर्धा तास उशिराने धावत आहेत. तसेच अनेक स्थानकांवर इंडिकेटर बंद आहेत. त्यामुळे कोणती ट्रेन फलाटावर येणार, कोणती लोकल कुठे जाणारी आहे, याबद्दल प्रवाशांना माहिती मिळत नाही. तसेच लोकलच्या वेळापत्रकाविषयी कोणतीही माहिती मिळत नाही. त्यामुळे त्यांची गैरसोय वाढली आहे. काही लोकलही रद्द करण्यात आल्या आहेत. त्यासोबत एसी लोकल ट्रेनही उशिराने धावत आहेत.
प्रवाशांना याचा मोठा फटका
ऐन कामाच्या वेळेस कल्याण स्थानकातून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या चाकरमान्यांना आणि इतर प्रवाशांना याचा मोठा फटका बसला आहे. तांत्रिक बिघाडामुळे लोकल उशिराने धावत आहे. सध्या स्थानकांवर फारशी गर्दी नसली तरी प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
ठाण्यात वाहतुकीचा खोळंबा
तर ठाण्याहून मुंबई-नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या मानपाडा ते माजीवाडा मार्गावर एका गाडीत बिघाड झाल्याने वाहतूक कोंडी झाली आहे. वाहतूक विभागाकडून बंद पडलेली गाडी बाजूला करण्याचे काम सुरू आहे. सध्या वाहतूक धिम्या गतीने सुरू आहे. यामुळे रस्ते प्रवाशांनाही विलंब होत आहे.
