रेड अलर्ट दिल्यावर सरकारची जबाबदारी संपते का? सामनाचा खोचक सवाल

शिवसेना ठाकरे गटाने महाराष्ट्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सामनातून सरकारवर जोरदार टीका करण्यात आली असून, पावसाच्या व्यवस्थापनात अपयश आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

रेड अलर्ट दिल्यावर सरकारची जबाबदारी संपते का? सामनाचा खोचक सवाल
sanjay Raut rain
| Updated on: Aug 20, 2025 | 8:45 AM

मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पाऊस कोसळत आहे. गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे सर्वत्र जनजीवन विस्कळीत झाले आहे. सातत्याने होणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी नदीनाल्यांना पूर आला आहे. तर काही ठिकाणी धरणांचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. यामुळे काही भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. आता याच घटनांवर शिवसेना ठाकरे गटाने टीका केली आहे. तीन दिवसांच्या पावसात ‘सरकार गेले वाहून’ अशी स्थिती राज्यावर ओढवली आहे. हे सरकार हीच महाराष्ट्रावर आलेली एक ‘आपत्ती’ आहे. पावसाच्या नैसर्गिक आपत्तीशी ते काय लढणार? असा सवाल सामनातून करण्यात आला आहे.

आता कुठल्या बिळात लपले आहेत

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना अग्रलेखातून गेल्या दिवसांमध्ये झालेल्या पावसाचा आढावा घेण्यात आला आहे. यात मुंबईसह महाराष्ट्रात कुठे काय परिस्थिती उद्भवली याबद्दल भाष्य करण्यात आले आहे. यावरुन शिवसेना ठाकरे गटाने जोरदार टीका केली आहे. एरवी मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता असताना दोन-पाच सेंटिमीटर पाणी कुठे साचले तरी ‘‘मुंबई बुडाली होती’’ अशी आवई उठवणारे भारतीय जनता पक्षाचे वाचाळवीर पोपट आता कुठल्या बिळात लपले आहेत की मुंबईच्या रस्त्यांवर साचलेले पाणी नाकातोंडात जाऊन त्यांची वाचा बसली आहे? असा खोचक टोलाही सामनातून लगावण्यात आला.

सर्व दावे पोकळ

मुंबईसह संपूर्ण राज्यात गेले तीन-चार दिवस पावसाचे धुमशान सुरू आहे. बहुतांश सर्वच जिल्ह्यांतील नदीनाल्यांना पूर आला व राज्यभरात एकंदर 12 जणांचा मृत्यू झाला. मुंबईत तर संततधार पावसाने सर्व रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले. आधीच मुंबईचे तमाम रस्ते खड्डे पडल्याने धोकादायक झाले असतानाच हे खड्डेमय रस्ते जलमय झाल्यामुळे धोका अधिकच वाढला आहे. ‘‘मुंबई यंदा तुंबू देणार नाही, संपूर्ण मुंबई खड्डेमुक्त करू’’ असे अनेक दावे सरकारमधील ‘फेकनाथां’नी केले होते. मात्र हे सर्व दावे किती पोकळ होते, हे दोन दिवसांच्या पावसाने पुन्हा एकदा सिद्ध केले, असेही सामनातून नमूद करण्यात आले आहे.

आपत्कालीन कक्ष काय करीत होता

हवामान खात्याने रेड अलर्ट दिल्यावर केवळ पत्रक काढून सरकार मोकळे होते, पण जलमय होणाऱ्या मुंबईला वाचवण्यासाठी त्यांनी कोणतीही उपाययोजना केली नाही. मुंबई शहराला तीन-तीन पालकमंत्री आहेत व मुंबई जलमय होत असताना हे तिन्ही पालकमंत्री काय करीत होते? ‘रेड अलर्ट’चा इशारा दिला आणि जनतेला सावध राहायला सांगितले म्हणजे सरकारची जबाबदारी संपते काय? यंदाच्या पावसाळ्यात मुंबई दुसऱ्यांदा बुडाली त्याला जबाबदार कोण? जनतेला सावधानतेचा इशारा देणाऱ्या सरकारने मुंबई जलमय होणार नाही यासाठी कोणती सावधानता बाळगली? रस्ते बंद होणार नाहीत, मुंबईची जीवनवाहिनी असलेली लोकल सेवा ठप्प होणार नाही यासाठी कोणती उपाययोजना केली? एकापाठोपाठ एक सर्व रस्ते जलमय होत असताना सरकार व महापालिकेचा आपत्कालीन कक्ष काय करीत होता? आता पुन्हा बुडालेल्या मुंबईचे खापर फोडण्यासाठी सरकारने कोणाचे डोके शोधले आहे? असे अनेक सवाल सामनातून उपस्थित करण्यात आले आहे.

मुंबईबरोबरच ठाणे, पुणे, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातही अनेक जिल्ह्यांत अतिवृष्टी झाली. मराठवाड्यात काही ठिकाणी ढगफुटीचे प्रकार घडले. एकट्या नांदेड जिल्ह्यात पुरामुळे नऊ जणांचा मृत्यू झाला. एकट्या मराठवाड्यातील शेतात पाणी शिरल्याने 2.80 लाख हेक्टरवरील उभ्या पिकांचे खत झाले आहे. दोन दिवसांत शेतीच्या नुकसानीचे पंचनामे सुरू होतील, असे सरकारच्या वतीने सांगण्यात आले आहे. मात्र मागच्याच नुकसानीचे पैसे अद्याप मिळाले नसल्याने केवळ कागदी घोडे नाचवणाऱ्या सरकारी पंचनाम्याने शेतकऱ्यांना काय दिलासा मिळणार आहे? असा खोचक टोलाही सामनातून लगावण्यात आला आहे.