Devendra Fadnavis : मुंबईत दरवर्षी पावसात सरासरी 800 झाडं कोसळतात, पण काल एकाच दिवसात..मुख्यमंत्र्यांनी दिलेली आकडेवारी धक्कादायक

Devendra Fadnavis : मुंबईत काल मोठ्या प्रमाणात झाडं उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या. त्यात काही जणांचा मृत्यू झाला आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात झाडं उन्मळून पडण्याच्या घटनांबद्दल महत्वाची माहिती दिली. झाडं कोसळण्याची मुख्यमंत्र्यांनी जी आकडेवारी सांगितली ती धक्कादायक आहे.

Devendra Fadnavis :  मुंबईत दरवर्षी पावसात सरासरी 800 झाडं कोसळतात, पण काल एकाच दिवसात..मुख्यमंत्र्यांनी दिलेली आकडेवारी धक्कादायक
Devendra Fadnavis
| Updated on: Jul 06, 2026 | 12:22 PM

मुंबईसह महाराष्ट्रात पावसामुळे जी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्या संदर्भात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सभागृहात बोलले. मुंबईत काल अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या. मानखुर्द भागात एक इमारत कोसळली. मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर पाणी आल्यामुळे हा महामार्ग बंद आहे. मुंबई-पुणे रेल्वे मार्गही ठप्प आहे. मुख्यमंत्र्यांनी राज्यात घडलेल्या या सगळ्या घटनांचा आपल्या भाषणातून आढावा घेतला. त्यात मुंबईत झाड उन्मळून पडण्याच्या घटनांबद्दल महत्वाची माहिती दिली. “मुंबईत दरवर्षी मान्सूनच्या पावसात सरासरी 800 झाडं कोसळतात. पण काल एकाच दिवसात 350 झाडं पडली” अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

“एक अतिशय अनपेक्षित परिस्थिती निसर्गाच्या माध्यमातून तयार झाली आहे. सभागृहात काही गोष्टी विरोधी पक्षाने उपस्थित केल्या. त्याचं गांभीर्य आहेच. मात्र या संदर्भात आपण लक्षात घेतलं पाहिजे. काल साधारणपणे ताशी 50 किमी वेगाने वारे वाहत होते. आजचा दिवस त्याही पेक्षा गंभीर आहे म्हणून आज म्हणून वर्क फ्रॉम होमची विनती आहे. आज दुपारनंतर 70 ते 90 किलोमीटर ताशी वेगाने वारे वाहणार आहे” असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

माटुंगा मनीज समोर झाडं कोसळलं

मुंबईत झांड कोसळण्याच्या घटनांमध्ये काही जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. मुंबईत यंदाच्या पावसाळ्यात झाडं कोसळण्याचं प्रमाणे वाढलं आहे. चेंबूरमध्ये विद्यार्थ्यांच्या बसवर झाडं कोसळलं होतं. यात एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. 10 विद्यार्थी जखमी झाले होते. काल दादर माटुंगा परिसरातही मोठ्या प्रमाणात झाडं उन्मळून पडली. माटुंगा मनीज समोर एक झाडं कोसळलं. त्या खाली काही गाड्या आल्या. कुर्ला नौपाडा येथे झाड कोसळलं. झाड कोसळून वृद्धाचा मृत्यू झाला.

काल ताशी 50 किमी वेगाने वारे वाहत होते

मुंबईत वांद्रे, कुर्ला, अंधेरी परिसरात अनेक ठिकाणी झाडं कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. काल ताशी 50 किमी वेगाने वारे वाहत होते तेव्हा अशी स्थिती होती. आज तर वाऱ्याचा वेग ताशी 70 ते 80 किमी असेल. त्यामुळे आजही अशा प्रकारच्या घटना घडण्याची भिती आहे.

Follow Us