जलबोगदा खणन कामात मुंबई महानगरपालिकेची विक्रमी कामगिरी, एका महिन्यात तब्बल 526 मीटर खणन

एका महिन्यात 526 मीटर खणन तर एकाच दिवसात 40 मीटरपेक्षा अधिक खणन करण्याची कामगिरी एकाच आठवड्यात दोन वेळा करण्याची किमया महानगरपालिकेने साध्य केली आहे.

जलबोगदा खणन कामात मुंबई महानगरपालिकेची विक्रमी कामगिरी, एका महिन्यात तब्बल 526 मीटर खणन

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा प्रकल्प खात्याने भूमिगत जल बोगद्यांच्या खणन कामात नवीन उच्चांक नोंदवला आहे. एका महिन्यात 526 मीटर खणन तर एकाच दिवसात 40 मीटरपेक्षा अधिक खणन करण्याची कामगिरी एकाच आठवड्यात दोन वेळा करण्याची किमया महानगरपालिकेने साध्य केली आहे. किनारी रस्ता प्रकल्पाने भूमिगत बोगदा खणन करण्याची विक्रमी कामगिरी नुकतीच साध्य केल्यानंतर त्यापाठोपाठ पाणीपुरवठा प्रकल्प खात्याने ही कामगिरी केल्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अभियांत्रिकी कौशल्याची सर्वत्र वाखाणणी केली जात आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा प्रकल्प खात्याच्या वतीने पूर्व उपनगरांमध्ये पाणीपुरवठ्यात सुधारणा करण्यासाठी दोन भूमिगत जलबोगदे बांधण्यात येत आहेत. अमरमहाल ते परळ हा सुमारे 9.68 किलोमीटर लांबीचा भूमिगत जलबोगदा एफ/उत्तर आणि एफ/दक्षिण विभागांमध्ये तसेच ई आणि एल विभागातील काही परिसरात पाणीपुरवठा सुधारण्यास मदत करणार आहे. तर अमरमहाल ते ट्रॉम्बे उच्च पातळी जलाशयापर्यंत जाणारा दुसरा बोगदा हा सुमारे 5.52 किलोमीटर लांबीचा असून त्याद्वारे एम/पूर्व आणि एम/पश्चिम विभागातील पाणीपुरवठा सुधारण्यास मदत होणार आहे.

हे दोन्ही बोगदे जमिनीखाली सुमारे 100 ते 110 मीटर खोलीवर बांधण्यात येत असून त्यांचा व्यास 3.2 मीटर इतका आहे. या दोन्ही बोगद्यांमधून येणाऱया भूमिगत जलवाहिन्या ह्या भूपृष्ठावरील मुख्य जलवाहिनी आणि सेवा जलाशय यांना जोडल्या जाणार आहेत. पूर्व द्रुतगती मार्गावर स्थित दोन मुख्य जलवाहिन्यांमधून येणारे पाणी या बोगद्यांद्वारे पुढे जाणार आहे.

या भूमिगत जलबोगद्यांसाठी ‘टेराटेक’ कंपनीचे बोगदा खणन संयंत्र कार्यान्वित आहे. या संयंत्राने नुकतीच विक्रमी कामगिरी साध्य केली आहे. अमरमहाल ते परळ या पहिल्या भूमिगत जलद बोगद्याच्या कामामध्ये डिसेंबर 2011 या एकाच महिन्यात तब्बल 526 मीटर खणन पूर्ण करण्यात आले आहे. बोगद्याच्या कामाला सुरुवात केल्यानंतर अवघ्या 85 दिवसांच्या कालावधीत सुमारे एक किलोमीटरचे खणन पूर्ण करण्याची कामगिरी यामुळे साध्य झाली आहे. ही कामगिरी अपूर्व स्वरूपाची मानली जात असून त्यामुळे अभियांत्रिकी क्षेत्रातील तज्ञांकडून महानगरपालिकेचे कौतुक केले जात आहे.

एवढेच नव्हे तर अमरमहाल ते ट्रॉम्बे या दुसऱया बोगद्याच्या खणन कामामध्ये एकाच दिवशी 40.3 मीटर खणन करण्याची कामगिरी एकाच आठवड्यात दोन वेळा साध्य करण्यात आली आहे. ही देखील अपूर्व कामगिरी मानली जात आहे. या दुसऱया बोगद्याचे एकूण 2.75 किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. म्हणजेच त्याचे 50 टक्के काम पूर्ण झाले आहे.

Maharashtra Corona Update : पंतप्रधान मोदींकडून सर्व राज्यांचा आढावा; महाराष्ट्राकडून कोणत्या प्रमुख मागण्या?

राज्य सरकार, एटीएसची प्रतिमा मलिन करण्याचे षडयंत्र; मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात एनआयएची भूमिका संशयास्पद – नसीम खान

Breaking : मुंबई बँकेवर शिवसेना-राष्ट्रवादीचं वर्चस्व, प्रसाद लाड पराभूत; अध्यक्षपदी राष्ट्रवादीचा उमेदवार

Published On - 9:55 pm, Thu, 13 January 22

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI