
राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकांचे बिगुल वाजले आहेत. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असताना राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला आहे. मुंबई महानगरपालिकेसाठी भाजपने आपली रणनीती स्पष्ट करत उमेदवारांना AB फॉर्म वाटप करण्यास सुरुवात केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपच्या पहिल्या यादीत १२५ उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे. यामध्ये प्रामुख्याने नवीन युवा चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.
दादर येथील भाजपचे कार्यालय वसंत स्मृती येथे रविवारी रात्री १ वाजेपासूनच इच्छुक उमेदवारांची आणि कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. ज्या जागांवर महायुतीमधील जागावाटपाचा तिढा सुटला आहे, अशा जागांच्या उमेदवारांना तातडीने बोलावून पहाटेपर्यंत फॉर्मचे वाटप करण्यात आले.
मुंबई भाजपच्या वतीने पहिला AB फॉर्म तेजस्वी घोसाळकर यांना देण्यात आला आहे. त्या वॉर्ड क्रमांक २ मधून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. त्यांच्यासोबतच अर्चना भालेराव यांच्यासह सुमारे १० ते १५ उमेदवारांनी पहाटेपर्यंत एबी फॉर्म देण्यात आले. भाजपने यावेळी अनुभवी माजी नगरसेवकांसोबतच नव्या दमाच्या युवा नेत्यांवर विश्वास दाखवला आहे.
Dr Neil Somaiya MBA, PdD is declared BJP Candidate for BMC Elections from Ward 107 Mulund West
He will file Nomination Form today afternoon 1pm at BMC Office Kalidas Complex Mulund (West)
In 2017 he became One of the Youngest Corporator of Mumbai Municipal Corporation
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) December 29, 2025
दरम्यान या निवडणुकीत भाजपने मिशन १५० चे लक्ष्य ठेवले आहे. मुंबईवर आपली पकड मजबूत करण्यासाठी भाजपकडून सर्व ताकद पणाला लावली आहे. विशेषतः प्रस्थापित नेत्यांना डावलून नव्या चेहऱ्यांना संधी दिल्याने पक्षात काही ठिकाणी नाराजीचे सूर उमटण्याची शक्यता आहे. तरी विजयाची खात्री असलेल्या उमेदवारांनाच प्राधान्य देण्यात आल्याचे माहिती समोर येत आहे. आता उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर मुंबईच्या राजकीय मैदानात नेमकी कोणती उलथापालथ होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.