मुंबई महापालिकेवर कोणाचा महापौर बसणार? एकनाथ शिंदे थेट नाव घेत म्हणाले…
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महापालिका निवडणुकीत महायुतीचा विजय होईल, असा दावा केला आहे. त्यांनी महायुतीच्या विकासकामांचा उल्लेख केला आणि भ्रष्टाचाराचा निषेध केला. ते म्हणाले की, मुंबईकर काम करणाऱ्यांनाच मतदान करतील आणि महायुतीचा महापौर निवडून येईल.

मुंबई महापालिका निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. येत्या दोन ते तीन महिन्यात महापालिका निवडणूक होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. त्यातच आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक मोठा दावा केला आहे. यंदाच्या मुंबई महानगरपालिकेवर महायुतीचा भगवा झेंडा फडकेल याबद्दल आमच्या मनात शंका नाही. मुंबईकर सुज्ञ आहेत. या निवडणुकीत मुंबईकर परिवर्तन घडवल्याशिवाय राहणार नाही. यावेळी महायुतीचा महापौर बसेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मुंबईतील काही नगरसेवकांनी महायुतीत प्रवेश केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
मुंबईच्या विकासासाठी महायुती कटिबद्ध
मुंबई महानगरपालिकेमध्ये काम केल्याचा अनुभव असलेला हे सर्व नगरसेवक आहेत. परंतु त्यांच्या प्रभागातील काही अडचणी आहेत. काही काम आहेत. त्या संदर्भातील विषय मांडले. मी मुख्यमंत्री असताना किंवा आता देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना जी काम झाली नाहीत ते काम सध्या सुरू आहेत. सर्व कामासंदर्भात चर्चा झाली. जी काम होऊ शकली नाहीत ती सरकारच्या काळामध्ये महायुतीच्या काळामध्ये झाली. सिमेंट काँक्रीटचे रस्ते, आपला दवाखाना असेल किंवा इतर पालिकेची कामे असतील ती सर्व काम झाली. अडीच वर्षात केलेल्या कामाची पोचपावती विधानसभा निवडणुकीत मिळाली, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
एसआरए योजनांना गती मिळणार
मुंबईतील अनेक एसआरए (SRA) प्रकल्प अनेक वर्षांपासून रखडले आहेत. त्यामुळे अनेक मुंबईकर शहराबाहेर गेले आहेत. महायुतीचे सरकार हे प्रकल्प लवकर पूर्ण करून, त्या लोकांना पुन्हा मुंबईत आणणार आहे. विधानसभेच्या निवडणुकीत आम्हाला जनतेने केलेल्या कामाची पोचपावती दिली. त्याचप्रमाणे आता महापालिकेच्या निवडणुकीतही मुंबईकर काम करणाऱ्यांनाच मतदान करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
भ्रष्टाचाराला मुंबईकर थारा देणार नाहीत
काही लोकांनी अनेक वर्षे मुंबईवर राज्य केले, पण मुंबईकडे त्यांनी फक्त सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणूनच पाहिले. कोविडच्या काळात लोक मरत असताना, काही जण मृतदेहांच्या बॅगमध्येही भ्रष्टाचार करत होते. असा भ्रष्टाचार करणाऱ्यांना मुंबईकर आता थारा देणार नाहीत. मुंबईची जनता हुशार आहे आणि ती काम करणाऱ्यांनाच साथ देईल, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
महायुतीचाच महापौर होईल
या निवडणुकीत मुंबईकर नक्कीच मोठा बदल घडवतील. आतापर्यंत 62 नगरसेवक महायुतीत आले आहेत. ही संख्या आणखी वाढेल. ज्यांनी बाळासाहेबांची विचारधारा सोडली, त्यांना लोकांनी लोकसभा आणि विधानसभेत त्यांची जागा दाखवून दिली आहे. आमचा एकच अजेंडा आहे – विकास, विकास आणि फक्त विकास!. याच विकासकामांच्या जोरावर महायुतीचा महापौर निवडून येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
