Narendra Modi : पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त का साजरा केला जातोय सेवा सप्ताह? केंद्रीय मंत्र्याने कारण सांगितलं…
PM Narendra Modi Birthday : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस; पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त का साजरा केला जातोय सेवा सप्ताह? केंद्रीय मंत्र्याचं मोठं विधान, काय म्हणाले? वाचा सविस्तर...

मुंबई | 17 सप्टेंबर 2023 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस आहे. पंतप्रधानांचा 73 वा वाढदिवसा निमित्त आज सर्वत्र विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताह साजरा केला जातोय. हा कार्यक्रम कशासाठी आयोजित करण्यात येत आहे, यावर केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी भाष्य केलं आहे. आज विश्वकर्मा जयंती आणि पंतप्रधान मोदी यांचा वाढदिवस आहे. आणि ह्या शुभ मुहर्तावर पीएम विश्वकर्मा योजना सुरू केली आहे. पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं आहे की, माझा वाढदिवस साजरा करू नका.सेवा सप्ताह साजरा करा, म्हणून ठिकठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त वांद्र्यातील रंगशारदा सभागृहात पीएम विश्वकर्मा योजनेचा शुभारंभ झाला. यावेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे बोलत होते.
आपण मूळ मुंबईचे आहोत का? आपण मुंबईकडे का आलो? गांधीजी बोलायचे की, गावाकडे चला… आणि आता सुरु आहे चला शहरकडे… गावाकडे आता व्यवसाय चालत नाही. रबराच्या चपला आल्या. तर गावात चर्मकार कुठं राहिलेत? मी गावी राहायचो तर 400 लोकांचे गाव होते. पण त्यात 12 बलुतेदार होते. गावी डोंबऱ्याचे खेळ व्हायचे. ही कला सोपी आहे का सांगा? आपल्या देशात अनेक कला आहेत. डोंबाऱ्याचा खेळ बघितल्यावर आपोआप खिशात हात जायचे आणि पैशे तिथे टाकले जायचे, असं रावसाहेब दानवे म्हणाले.
आता टीव्ही आला, डोंबरीचे खेळ पाहायला कुणी येत नाही. मग त्यांचा उदरनिर्वाह थांबला. मग काय चला मुंबईला, चला बेगारि काम करायला आणि मग चला शहरकडे… आपण चीन आणि लंडनचे प्रोडक्ट घेतो. पण आपल्या देशात तयार झालेल्या खेळणी घेत नाही. आपण जेव्हा आपली कला आपल्या गोष्टींना पुढे घेऊ तेव्हा आत्मनिर्भर भारत होईल. आपण जर एक लाख रूपये घेतले तर त्याला व्याज 5 % आहे आणि परत 38 महिन्यांनी परत द्यायचे आहे, असंही रावसाहेब दानवे म्हणालेत.
आपल्या 12 बलुतेदारांचा विचार नरेंद्र मोदीजींनी केला आहे. 2014 मध्ये जेव्हा प्रधानमंत्री निवडून आले. तेव्हा त्यांनी भाषणात सांगितलं, माझे सरकार गरीबाला समर्पित राहील. तसंच ते काम करत आहेत. पुढेही आमचं सरकार असंच गोरगरीब जनतेसाठी काम करत राहील, असंही दानवे म्हणाले.