मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय, पुढचे 45 दिवस अत्यंत महत्त्वाचे; सूचना काय?

मुंबईत मान्सून लांबणीवर पडल्यामुळे आणि तलावांतील पाणीसाठा कमी झाल्याने बीएमसीने १०% पाणी कपात लागू केली आहे. सध्या शहरात केवळ ४५ दिवसांचा पाणीसाठा शिल्लक आहे.

मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय, पुढचे 45 दिवस अत्यंत महत्त्वाचे; सूचना काय?
BMC
| Updated on: Jun 04, 2026 | 12:44 PM

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरावर पुन्हा एकदा पाणीटंचाईचे गडद सावट निर्माण झाले आहे. हवामान विभागाने यंदा मान्सूनचे आगमन लांबणीवर पडण्याचा अंदाज वर्तवल्यामुळे मुंबईकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे. त्यातच मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील साठा झपाट्याने खाली जात आहे. याच परिस्थितीचे गांभीर्य ओळखून बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) संपूर्ण मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये १० टक्के पाणी कपात लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे ऐन उन्हाळ्याच्या शेवटी मुंबईकरांना पाण्याचा जपून वापर करावा लागणार आहे.

केवळ ४५ दिवसांचा साठा शिल्लक 

मुंबईला अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी अशा सात प्रमुख तलावांमधून दररोज कोट्यवधी लिटर पाणीपुरवठा केला जातो. मात्र, यंदा मान्सूनपूर्व पावसाने दडी मारल्यामुळे आणि कडक उन्हामुळे हे तलाव वेगाने कोरडे पडत आहेत. सद्यस्थितीत या तलावांमध्ये केवळ ४५ दिवस म्हणजेच साधारण १५ ऑगस्टपर्यंत पुरेल इतकाच वापरण्यायोग्य जलसाठा शिल्लक आहे.

तर दुसरीकडे, भारतीय हवामान विभागाने यंदा मुंबईत मान्सून नेहमीपेक्षा उशिरा दाखल होणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. पाऊस लांबल्यास मुंबईत भीषण परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी पालिकेने आतापासूनच पाण्याच्या कोट्यात कपात करून उपलब्ध साठ्याचे नियोजन सुरू केले आहे.

समुद्राचे खारे पाणी गोड करण्याचा बीएमसीचा मेगा प्लॅन

तसेच पारंपरिक जलस्रोतांवरचे अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि भविष्यातील पाणी संकट टाळण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने आता दूरगामी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. मुंबईच्या विस्तीर्ण समुद्रातील खाऱ्या पाण्याचे गोड्या पाण्यात रूपांतर (Desalination Plant) करण्याच्या प्रकल्पावर पालिकेने काम वेगाने सुरू केले आहे. मुंबई महापालिकेचे उपमहापौर संजय घाडी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईकरांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. आपल्याकडे सध्या १५ ऑगस्टपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा सुरक्षित आहे. त्यापूर्वीच मान्सून सक्रिय झाल्यास सर्व धरणे पुन्हा ओसंडून वाहतील. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून आपण खाऱ्या पाण्याचा पुनर्वापर करून त्याचे गोड्या पाण्यात रूपांतर करण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेवर वेगाने काम करत आहोत.

तसेच महापालिका प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, सर्व सातही तलावांमधील पाणीपातळीवर हायड्रॉलिक इंजिनिअरिंग विभागाकडून २४ तास लक्ष ठेवले जात आहे. पाणी कपातीमुळे नागरिकांचे हाल होऊ नयेत म्हणून पाणीपुरवठ्याची वेळ आणि दाब यांचे काटेकोर व्यवस्थापन केले जात आहे. गरज पडल्यास अतिरिक्त विहिरी आणि बोअरवेल वापरही पर्यायी व्यवस्था म्हणून केला जाईल. त्यामुळे नागरिकांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि पाणी साठवून ठेवताना त्याचा अपव्यय टाळण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे. तसेच वाहने धुणे, घराबाहेर पाणी मारणे यांसारख्या गोष्टी टाळून मुंबईकरांनी पाण्याचा प्रत्येक थेंब जपून वापरावा, अशाही सूचना देण्यात आल्या आहेत.

Follow Us