ओला-उबर चालक पुन्हा संपावर

ओला-उबर चालक पुन्हा संपावर

मुंबई : ओला आणि उबर चालक मालक आजपासून पुन्हा एकदा संपावर गेले आहेत. सरकारने मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने ओला व उबर या खासगी टॅक्सीसेवा पुरवठादार कंपन्यांच्या चालकांनी आजपासून पुन्हा एकदा संपाचा पवित्रा घेतला. त्यामुळे मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील सुमारे 30 हजार ओला-उबर चालक मालक शनिवारी मध्यरात्रीपासून संपावर गेले.
याआधीही मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील 30 हजार ओला-उबर चालकांनी 12 दिवस संप पुकारला होता. त्यावेळी सरकार समोर 13 मागण्या मांडण्यात आल्या होत्या.

संप मिटण्यासाठी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी टॅक्सी कंपन्या, चालक-मालक संघटनांची बैठक बोलावून 15 नोव्हेंबरपर्यंत ओला-उबर टॅक्सी चालकांच्या समस्यांवर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर हा संप मागे घेण्यात आला. पण 17 नोव्हेंबर आला तरी सरकारने कुठलाही मार्ग काढला नाही. त्यानंतर शनिवारी 17 नोव्हेंबरला पुन्हा एक बैठक घेण्यात आली, पण या बैठकीत कुठलाही तोडगा न निघाल्याने ओला-उबर चालक शनिवारी मध्यरात्रीपासून पुन्हा संपावर गेले. शिवाय सोमवारी सकाळी 10 वाजता लालबाग भारतमाता सिनेमाजवळून सरकार विरोधात आक्रोश मोर्चाही काढण्यात येईल.

ओला-उबर खाजगी टॅक्सी चालक मालकांच्या मागण्या काय?

-एसी हॅचबॅक कॅबसाठी प्रतिकिमी 16 रुपये दर ठेवावा.

-एसी सेदा न कॅबसाठी प्रतिकिमी 18 रुपये दर ठेवावा.

-एसयूव्ही कारसाठी पहिल्या चार किलोमीटरसाठी किमान 100 ते 150 रुपये भाडेदर निश्चित ठेवावा.

मागीलवेळी जेव्हा ओला-उबर चालकांनी 12 दिवसांचा संप पुकारला होता, तेव्हा सामान्य नागरिकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागला होता. दरम्यान इतर टॅक्सी चालकांनीही संधीचा फायदा घेत प्रवाशांना लुटले. वाट्टेल त्या दारात या टॅक्सीचालकांनी प्रवाशांकडून पैसे उकळले. आता ओला-उबर चालक पुन्हा एकदा संपावर गेल्याने कदाचित सामान्य नागरिकांना पुन्हा या समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI