निकाल लागला, पण पाहायला ती उरली नाही, पायधुनीतील कलिंगड दुर्घटनेत मृत्यू झालेल्या आयेशाला दहावीत किती टक्के?

मुंबईतील पायधुनी परिसरात एकाच कुटुंबातील चौघांच्या मृत्यूने खळबळ उडाली असून, टरबूजात उंदीर मारण्याचे विष (झिंक फॉस्फाइड) असल्याचे फॉरेन्सिक तपासात उघड झाले आहे. १० वी उत्तीर्ण झालेल्या आयेशासह संपूर्ण कुटुंबाचा यात मृत्यू झाला असून पोलीस तपास सुरू आहे.

निकाल लागला, पण पाहायला ती उरली नाही, पायधुनीतील कलिंगड दुर्घटनेत मृत्यू झालेल्या आयेशाला दहावीत किती टक्के?
| Updated on: May 09, 2026 | 9:04 AM

दक्षिण मुंबईतील पायधुनी परिसरात एकाच कुटुंबातील चार सदस्यांचा विषबाधेमुळे मृत्यू झाला. यामुळे संपूर्ण शहर हादरले होते. सुरुवातीला ही घटना अन्नातून झालेल्या विषबाधेचा (Food Poisoning) एक दुर्दैवी प्रकार वाटत होती. मात्र, आता फॉरेन्सिक लॅबच्या (Forensic Lab) अहवालाने या प्रकरणाला एक धक्कादायक वळण दिले आहे. यावेळी मृतांच्या अवयवांच्या नमुन्यांत आणि त्यांनी खाल्लेल्या कलिंगडमध्ये झिंक फॉस्फाइड या उंदीर मारण्याच्या विषाचे अंश आढळून आले आहेत. यामुळे ही घटना केवळ अपघात नसून घातपात किंवा सामूहिक आत्महत्येचा प्रकार असावा, असा संशय बळावला आहे.

नेमकं काय घडलं?

पायधुरी परिसरात राहणाऱ्या अब्दुल्ला डोकाडिया (वय ४५), त्यांची पत्नी नसरीन (वय ४०) आणि त्यांच्या दोन मुली आयेशा (वय १६) व झैनब (वय १३) हे २५ एप्रिलच्या रात्री डोकाडिया यांच्या घरी एका स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीत अनेक मित्र आणि नातेवाईक सहभागी झाले होते. बिर्याणीसह विविध पदार्थांचा आस्वाद घेतल्यानंतर सर्व पाहुणे आपापल्या घरी निघून गेले. त्यानंतर २६ एप्रिलच्या पहाटे १ वाजेच्या सुमारास कुटुंबातील सदस्यांनी फ्रिजमध्ये ठेवलेले कलिंगड खाल्ले. ते खाल्ल्यानंतर काही वेळातच चौघांनाही उलट्या आणि तीव्र जुलाबाचा त्रास सुरू झाला. त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना प्रथम एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर प्रकृती अधिक खालावल्याने सरकारी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान या चारही जणांचा मृत्यू झाला. हे कुटुंब पायधुनी येथील त्यांच्या काकांच्या घरात गेल्या दोन वर्षांपासून वास्तव्यास होते.

या घटनेतील सर्वात मोठी बाब म्हणजे त्यांची डोकाडिया कुटुंबियांची मुलगी आयेशा हिचा दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा (SSC) निकाल शुक्रवारी जाहीर झाला. यामध्ये आयेशा ७० टक्के गुण मिळवून प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाली आहे. ती अभ्यासात अत्यंत हुशार होती आणि खेळत असतानाही तिचे अभ्यासाकडे पूर्ण लक्ष असे, असे तिच्या शेजाऱ्यांनी सांगितले. यशाचा हा आनंद साजरा करण्यासाठी ती आज जिवंत नसल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

पोलिस तपासातील आव्हाने

दरम्यान कलिंगडमध्ये उंदीर मारण्याचे विष आले कसे, हा आता तपासाचा मुख्य विषय आहे. कलिंगड कापताना त्यात विष मिसळले गेले की ते मुद्दाम टाकले गेले, याचा शोध पायधुनी पोलिस घेत आहेत. पोलिसांनी आता खून (Murder) आणि सामूहिक आत्महत्या (Mass Suicide) अशा दोन्ही बाजूने तपास सुरू केला आहे. त्या रात्री पार्टीत आलेल्या लोकांची आणि इमारतीतील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us