
Raj Thackeray on Ambani And Adani : मनसे प्रमुख राज ठाकरे यांची गोरेगाव येथे आज तोफ धडाडली. त्यांनी बोगस मतदारांचा मुद्दा पुन्हा उपस्थित करत अनेक गंभीर आरोप केले. त्याचवेळी मुंबई तोडण्याचा डाव असल्याचा आरोप केला. मुंबईच्या अगोदर त्यासाठीच ठाण्यावर कब्जा करण्यात आल्याचे ते म्हणाले. नवी मुंबई विमानतळ, वाढवण विमानतळ, बुलेट ट्रेन, विविध रस्त्यांची जाळे, विकासाची कामे, बेसमुार जंगलतोड हे काय मुंबईकरांसाठी सोयीसाठी सुरु नाही तर उद्योगपतींच्या घशात येथील जमिनी घालण्यासाठी हा सर्व खटाटोप सुरु असल्याचा गंभीर आरोप त्यांनी मनसे पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात केला.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मनसेची तयारी सुरू आहे. त्याअनुषंगाने मतदारयादी प्रमुखांचा एक भव्य मेळावा झाला. मुंबईतील गोरेगाव(पूर्व) येथील नेस्को सेंटरमध्ये हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यासाठी मुंबईतील पदाधिकारी, मतदार यादी प्रमुख, गट प्रमुख आणि उपशाखाध्यक्ष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शहर अदानी-अंबानींच्या घशात घालणार
यावेळी राज ठाकरे यांनी विकास योजनेच्या आडून उद्योगपतींचे हितसंबंध जपण्याचा गंभीर आरोप केला. आपण सुरवातीला बुलेट ट्रेनला विरोध केला होता त्यांचा प्लॅन काय तो सांगितला होता, आताच एक नवीन विमानतळ झालं आणि दुसरं वाढवण करायला प्लॅन सुरु आहे. पुढचा त्यांचा प्लॅन लक्षात ठेवा, हळू हळू सांताक्रुज कारगो बंद केला जाईल. नंतर दुसर एअरपोर्ट बंद केल जाईल आणि या जागा अडाणी अंबानीला दिले जातील, असा आरोप राज ठाकरे यांनी केला.
भाजपच्या मराठी मतदारांना सांगतो कि जेव्हा अडाणी अंबानी येथील तेव्हा तुम्ही पण मराठी म्हणूनच त्यांच्या वरवंट्याखाली जाणार आहात. जे काही येतंय ते अडाणी, रस्ता अडाणी, पूल अडाणी असे ते म्हणाले. माझा विरोध विकासाला नाही पण विकास हा महाराष्ट्राच्या थडग्यावर बसून केला जात असेल तर ते मला मान्य नाही, असे त्यांनी ठणकावले. हे सर्व कशासाठी सुरूय तर केंद्रात आम्हीच, राज्यात आम्हीच, पालिकेत आम्ही पाहिजे. ही सर्व शहर यांना पाहिजेत कारण अडाणी अंबानीला आंदन द्यायचं आहे, असा गंभीर आरोप राज ठाकरे यांनी केला.
नॅशनल पार्कमध्ये एक जागा बघितली आहे. हा भाग ठाण्यात येतो. तिथे अदानींना पॉवर प्रोजेक्ट सुरु करायचा आहे. तिथले आदिवासी हटवणार. तिथे जंगलतोड करणार. मग पॉवर प्रोजेक्ट टाकणार. हे उद्योगपती जे जमिनी घेत सुटले आहेत ना, त्यांच्यासाठी हे रस्ते तयार करण्यात येत आहेत. तुमच्यासाठी सी-लिंक वा इतर योजना नसल्याचा आरोप त्यांनी केला.