राज ठाकरे म्हणाले, विरारची घटना क्लेशदायक; पण…

| Updated on: Apr 23, 2021 | 10:10 AM

विरार पश्चिम येथील विजय वल्लभ कोविड रुग्णालयात आग लागून 13 कोरोनाबाधितांचा होरपळून मृत्यू झाला. या घटनेवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शोक व्यक्त केला आहे. (raj thackeray on virar covid fire incident)

राज ठाकरे म्हणाले, विरारची घटना क्लेशदायक; पण...
राज ठाकरे, मनसेप्रमुख
Follow us on

मुंबई: विरार पश्चिम येथील विजय वल्लभ कोविड रुग्णालयात आग लागून 13 कोरोनाबाधितांचा होरपळून मृत्यू झाला. या घटनेवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शोक व्यक्त केला आहे. या घटनेवरून राज ठाकरे यांनी सरकारला काही सवाल करून सूचनाही केल्या आहेत. (raj thackeray on virar covid fire incident)

राज ठाकरे यांनी ट्विट करून विरारमधील घटनेवर तीव्र शोक व्यक्त केला आहे. आज विरार मधल्या हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीत रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला. परवा नाशिकमधली घटना असो की काही दिवसांपूर्वीची भंडारा आणि भांडूपमधील घटना असोत, या घटना दुर्दैवी आणि क्लेशदायी आहेत, असं सांगतानाच सध्याच्या परिस्थितीत सरकारी यंत्रणांवर ताण आहे हे मान्य. पण म्हणून या घटनांमधून काही बोध घ्यायचाच नाही असं नाही. सरकारने तातडीने जबाबदार अधिकाऱ्यांच्या टीम्स तयार करून, प्रत्येक रुग्णालयातील व्यवस्थांच, अग्निसुरक्षा यंत्रणांचं तात्काळ ऑडिट करून घ्यायला हवं. आणि ज्या त्रुटी आढळतील त्यावर उपाययोजना केल्या पाहिजेत, अशा सूचनाही राज यांनी केल्या आहेत.

नाशिक व विरारसारख्या दुर्घटना घडणं क्लेशदायक: पवार

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही विरारच्या घटनेवर तीव्र दु:ख व्यक्त केलं आहे. राज्यातील डॉक्टर, नर्सेस, शासकीय व खाजगी आरोग्य यंत्रणा कोरोना संकटाशी युद्धपातळीवर लढत असताना नाशिक किंवा विरारसारख्या दुर्घटना घडून रुग्णांना प्राण गमवावे लागणे दुर्दैवी, क्लेशदायक असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरारच्या विजय वल्लभ रुग्णालयाला लागलेल्या आगीत मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांना श्रद्धांजली वाहिली. मृत रुग्णांच्या नातेवाईकांबद्दल त्यांनी सहसंवेदनाही व्यक्त केल्या. अजित पवार यांनी पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून दुर्घटनेची माहिती घेतली असून अन्य रुग्णांची सुरक्षितता व त्यांच्यावरील उपचार सुरळीत सुरु राहतील, याची दक्षता घेण्याचे निर्देश दिले आहेत. रुग्णालयांची सुरक्षितता, फायर ऑडीट करण्याचे निर्देश देऊनही अशा घटना वारंवार घडत आहेत. राज्यात आणि देशातही अशा घटना वाढल्या आहेत. यामागची कारणे उच्चस्तरीय समितीकडून शोधून त्रूटी कायमस्वरुपी दूर करण्याची बाब गांभीर्याने घेतली जाईल. मुख्यमंत्री महोदयांनी या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले असून त्यातून तथ्य बाहेर येईल, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला आहे.

एकनाथ शिंदेंकडून पाहणी

ही घटना घडल्यानंतर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ विरारला धाव घेतली. शिंदे यांनी कोविड रुग्णालयात जाऊन घटनेची पाहणी केली. तसेच मृतांच्या कुटुंबीयांची विचारपूस करून त्यांचे सांत्वनही केले. या घटनेची सरकारने गंभीर दखल घेतली असून आग कशामुळे लागली याची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

13 जणांचा मृत्यू

विरार पश्चिमेकडे विजय वल्लभ नावाचे कोव्हिड रुग्णालय आहे. या रुग्णालयातील अतिदक्षता (ICU) विभागात आज रात्री 3 ते 3.30 च्या दरम्यान भीषण आग लागली. यावेळी रुग्णालयात 90 जण उपचार घेत होतं. तर आयसीयू वॉर्डमध्ये जवळपास 17 रुग्ण उपचार घेत होते. यातील 13 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. (raj thackeray on virar covid fire incident)

 

संबंधित बातम्या:

विरारमधील कोव्हिड रुग्णालयातील ICU विभागात आग, 13 जणांचा मृत्यू, मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश

Nashik Oxygen Tank Leak Patients Names | नाशिक ऑक्सिजन गळती दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांची संपूर्ण यादी

Bhandup Hospital Fire | भांडूपच्या मॉलमधील रुग्णालयातील भीषण 11 तासांनी आटोक्यात, 10 जणांचा होरपळून मृत्यू

(raj thackeray on virar covid fire incident)