मध्यरात्री मुख्यमंत्री अन् दोन उपमुख्यमंत्र्यांमध्ये ‘वर्षा’वर खलबते, दोन तासांच्या बैठकीत…

| Updated on: Feb 14, 2024 | 11:28 AM

Rajya Sabha Election | बैठकीत राज्यसभा निवडणुकीवर चर्चा झाली. राज्यसभेसाठी महायुतीचे पाच उमेदवार निवडून येणार आहेत. या पाच पैकी तीन भाजप, एक शिवसेना आणि एक राष्ट्रवादीचा उमेदवार असणार आहे. या उमेदवारांच्या नावावर चर्चा झाली.

मध्यरात्री मुख्यमंत्री अन् दोन उपमुख्यमंत्र्यांमध्ये वर्षावर खलबते, दोन तासांच्या बैठकीत...
Follow us on

मुंबई, दि. 14 फेब्रुवारी 2024 | राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांत नाट्यमय घडामोडी घडत आहे. आधी शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांच्या पक्षात बंडखोरी झाली. त्यानंतर काँग्रेसला एकापोठापाठ तीन धक्के बसले. काँग्रेसमधून सर्वात मिलिंद देवरा बाहेर पडत शिवसेनेत दाखल झाले. त्यानंतर बाबा सिद्दीकी राष्ट्रवादी गेले. आता काँग्रेस नेते अशोक चव्हाण भाजपमध्ये आले. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बैठक झाली. या बैठकीत तब्बल दोन तास खलबते झाले.

काय झाली बैठकीत चर्चा

बैठकीत राज्यसभा निवडणुकीवर चर्चा झाली. राज्यसभेसाठी महायुतीचे पाच उमेदवार निवडून येणार आहेत. या पाच पैकी तीन भाजप, एक शिवसेना आणि एक राष्ट्रवादीचा उमेदवार असणार आहे. या उमेदवारांच्या नावावर चर्चा झाली. तसेच अशोक चव्हाण भाजपमध्ये आल्यामुळे त्यांना समर्थन देणारे आमदार काँग्रेसमध्ये नाराज आहे. या नाराजीचा फायदा घेण्यासाठी सहावी जागा लढवावी का? यावर चर्चा झाली. राज्यसभेतील सहावी जागा लढवण्याची रणनीती तयार करण्यात आली, अशी माहिती सूत्रांनी दिला.

अशोक चव्हाण राज्यसभेवर तर…

काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या अशोक चव्हाण यांना राज्यसभेत उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. वरिष्ठ पातळीवरुन तसे संदेश राज्यातील भाजप नेत्यांना मिळाले आहेत. अशोक चव्हाण यांना राज्यसभा दिली तर नारायण राणे यांना लोकसभेत उतरविले जाणार आहे. बैठकीत कोणकोणत्या उमदेवारांना तिकीट दिले जाणार, त्या नावांवर चर्चा झाली. आगामी राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्वाची ठरली.

देवेंद्र फडणवीस म्हणतात, नावे उद्या कळतील

भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, काल रात्री महायुतीची बैठक झाली. या बैठकीत राज्यसभा निवडणूकच्या संदर्भात चर्चा करण्यात आली. आता उद्या आमचे उमेदवार तुम्हाला कळतील.