मनसे अध्यक्ष राज ठाकरेंविरोधात कोर्टाकडून वॉरंट जारी

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंविरोधात कोर्टाकडून वॉरंट जारी

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात अटक वॉरंट (warrant against Raj Thackeray) जारी करण्यात आले आहे. छठपूजेबाबत केलेल्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर झारखंडच्या रांची दिवाणी न्यायालयाने वॉरंट जारी केले आहे. मुंबईचे स्थानिक निवासी अंखुरी अंजनी कुमार यांनी राज ठाकरे (warrant against Raj Thackeray) यांच्या  वक्तव्याच्या विरोधात याचिका दाखल केली होती. याच याचिकेवर न्यायालयाने वॉरंट बजावले आहे.

रांची दिवाणी न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश फहीम किरामनी यांनी राज ठाकरे यांच्याविरोधात वॉरंट जारी केले आहे. कोर्टाने राज यांना 18 फेब्रुवारी 2020 रोजी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

काय आहे प्रकरण?

शिवसेनेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर 2006 साली राज ठाकरे यांनी मनसे या नव्या पक्षाची स्थापना केली. मनसेची स्थापना केल्यानंतर राज ठाकरे यांनी मराठी भाषेचा मुद्दा हाताशी धरत उत्तर भारतीयांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला होता. याच पार्श्वभूमीवर 20 जानेवारी 2008 रोजी राज ठाकरे यांनी छठपूजेबाबत वक्तव्य केले होते.

“उत्तर भारतीयांचे छठपूजेचे हे नवे नाटक कुठून आले? महाराष्ट्रात राहायचे असेल तर महाराष्ट्राची संस्कृतीसोबतच तुम्हाला राहावे लागेल”, असे राज ठाकरे म्हणाले होते.

राज ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर उत्तर भारतीय नेत्यांकडून प्रचंड टीका केली गेली होती. याशिवाय बिहारच्या मुजफ्फर न्यायालातही त्यांच्याविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. राज ठाकरे न्यायालयात सुनावणीच्या तारखेला हजर राहत नाहीत म्हणून न्यायालयाने त्यांच्याविरोधात अटक वॉरंटही जारी केले होते. त्यावेळी हे प्रकरण प्रचंड गाजले होते.

वेळेनुसार हळूहळू राज ठाकरे यांची उत्तर भारतीयांबाबतची भूमिका सौम्य होत गेली. इतकेच नव्हे तर 2018 साली राज ठाकरे स्वत: मुंबईत छठपूजेच्या कार्यक्रमात हजर राहिले होते. आता पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे.

राज ठाकरे यांचे मत काय?

या प्रकरणावर राज ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांसमोर अनेकदा आपले मत मांडले आहे. छठपूजेवरुन जे काही राजकारण सुरु झाले होते त्याच्या पार्श्वभूमीवर आपण तसे वक्तव्य केल्याची प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी याअगोदर दिली आहे.

Published On - 10:53 am, Thu, 9 January 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI