एकही दिल है, कितनी बार जितोगे? मयुर शेळके 50 हजारांपैकी निम्मी रक्कम अंध महिलेला देणार

मयुर शेळके याने वांगणी रेल्वे स्थानकात रुळावर पडलेल्या साहिल शिरसाट या अंध महिलेच्या मुलाचा जीव वाचवला होता. (Mayur Shelke donate money to blind lady)

  • निनाद करमरकर, टीव्ही 9 मराठी, अंबरनाथ
  • Published On - 11:28 AM, 22 Apr 2021
एकही दिल है, कितनी बार जितोगे? मयुर शेळके 50 हजारांपैकी निम्मी रक्कम अंध महिलेला देणार
मयुर शेळके अंध महिला संगीता शिरसाट यांना बक्षिसाची अर्धी रक्कम देणार

अंबरनाथ : वांगणी रेल्वे स्थानकात रुळावर पडलेल्या चिमुकल्याचा जीव वाचवणाऱ्या मयुर शेळकेने (Mayur Shelke) पुन्हा एकदा माणुसकीचं दर्शन घडवलं आहे. मयुरने त्याला मिळणाऱ्या बक्षिसातील अर्धी रक्कम अंध माता संगीता शिरसाट (Sangeeta Shirsat) यांना देण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच रेल्वेकडून मिळालेल्या 50 हजारांपैकी 25 हजार रुपये मयुर शिरसाट कुटुंबाला देणार आहे. आधी शौर्य गाजवून मनं जिंकणारा मयुर आपल्या ठायी असलेल्या दातृत्व गुणाचंही दर्शन घडवत आहे. (Mayur Shelke donate money to blind lady)

पारितोषिक मिळण्याआधीच दानधर्म

मयुर शेळके याने अवघ्या काही दिवसांपूर्वी वांगणी रेल्वे स्थानकात रुळावर पडलेल्या साहिल शिरसाट या चिमुकल्याचा जीव वाचवला होता. या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर अगदी रेल्वे मंत्र्यांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वांनीच त्याचं कौतुक केलं होतं. रेल्वेकडून त्याला पन्नास हजार रुपयांचं विशेष बक्षीस जाहीर करण्यात आलं. लवकरच ही रक्कम त्याला मिळणार आहे. मात्र त्यापूर्वीच त्याने बक्षिसाची अर्धी रक्कम अंध मातेला देण्याचा स्तुत्य निर्णय घेतला. याशिवाय जावा कंपनीनेही मयुर शेळकेला बाईक भेट देण्याची घोषणा केली आहे.

अंध माऊली संगीता शिरसाट यांना मदत

संगीता शिरसाट या वांगणीच्या एका चाळीत भाड्याच्या खोलीत मुलासह राहतात. रेल्वेत छोट्यामोठ्या वस्तू विकून त्या आपला उदरनिर्वाह करतात. मुलगा साहिल हाच त्यांचा एकमेव आधार असून त्याला वाचवणारा मयुर हा या अंध मातेसाठी खऱ्या अर्थानं देवदूत ठरला आहे. आपल्या लेकराला वाचवणाऱ्या रिअल हिरोचा यथोचित सन्मान करा, अशी निरपेक्ष मागणी या अंध माऊलीने केली होती. निष्पाप ओठांतून निघालेली ही इच्छा देवाने ऐकलीच, मात्र त्यातील अर्धी रक्कमही आपसूक तिच्या पदरी पडली. तर देवदूताच्या रुपाने धावलेल्या मयुरने बक्षिसाची अर्धी रक्कम देण्याची घोषणा करुन आपल्या व्यक्तीमत्त्वाच्या आणखी एका कंगोऱ्याचं दर्शन घडवलं आहे.

नेमकं काय घडलं ?

रायगड जिल्ह्यातील वांगणी रेल्वे स्थानकातील देवदुतामुळे लहानगा बचावल्याची घटना नुकतीच समोर आली होती. सात वर्षांचा चिमुकला मुलगा अंध आईसोबत चालताना चुकून रेल्वे ट्रॅकवर पडला. इतक्यात समोरुन भरधाव वेगाने एक्स्प्रेस येत होती. आई जीवाच्या आकांताने आपल्या मुलाला वाचवण्यासाठी आरडाओरड करत होती. तेव्हा रेल्वेचा पॉईंटमन मयुर शेळके देवदुतासारखा मायलेकाच्या मदतीला धावून आला. आपल्या जीवाची पर्वा न करता त्याने अवघ्या सात सेकंदात चिमुकल्याचे प्राण वाचवले. या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर सर्व स्तरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

Video : अंध आईच्या हातातला मुलगा चालता चालता रेल्वे ट्रॅकवर पडला आणि तेवढ्यात रेल्वे आली

रेल्वे ट्रॅकवर चिमुरड्याचा जीव वाचवणाऱ्या देवदूताची मुख्यमंत्र्यांकडून दखल, मयुर शेळकेला ठाकरेंचा फोन

(Mayur Shelke donate money to blind lady)