Rohit Pawar on BJP : मनात सत्तेचे मांडे खाणाऱ्यांनी आग पेटवली, रोहित पवारांचा भाजपवर हल्लाबोल

रोहित पवार म्हणाले की, कुणाला वाटत असेल, ही माणुसकी विसरली जाईल आणि आपण केलेल्या द्वेषाच्या चिखलात सत्तेचे कमळ फुलेल किंवा काहींना वाटत असेल आपली राजकीय भाकरी भाजेल, पण महाराष्ट्रात ते शक्य नाही. आपली संस्कृतीही तसे होऊ देणार नाही.

Rohit Pawar on BJP : मनात सत्तेचे मांडे खाणाऱ्यांनी आग पेटवली, रोहित पवारांचा भाजपवर हल्लाबोल
rohit pawar
| Updated on: Apr 21, 2022 | 11:33 AM

मुंबईः मनात सत्तेचे मांडे खाणाऱ्यांनी आग पेटवली आहे, असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार आणि नेते रोहित पवार (Rohit Pawar) यांनी भाजपवर केला आहे. त्यांनी तासाभरापूर्वी तीन ट्वीट केले आहेत. त्यात कुठेही भाजपचा (BJP) उल्लेख नाही. मात्र, त्यांनी वापरलेले शब्द आणि प्रतिमा पाहता त्यांच्या टीकेचा सूर कोणालाही ओळखू येईल. अतिशय मोजके आणि तोलून-मापून बोलणारे तरुण नेतृत्व म्हणून रोहित पवारांकडे पाहिले जाते. सध्या मुंबई महापालिकेच्या तोंडावर राज्यातले राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. त्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कडव्या हिंदुत्वाची भूमिका घेतलीय. त्यांनी मशिदीवरील भोंगे उतरवण्यासाठी तीन मेपर्यंतचा अल्टीमेटम दिला आहे. राज यांच्या या बदलेल्या भूमिकेचे भाजपमधून स्वागत होताना दिसत असून, त्यांना रसदही पुरवली जातेय. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अतिशय उद्विग्न झालेल्या रोहित पवार यांनी आज सलग एकापाठोपाठ एक तीन ट्वीट करून भाजपवर टीकेच्या फैरी झाडल्यात.

धार्मिक, जातीय वाद…

रोहित पवार यांनी आपल्या ट्वीटमधून भारतीय जनता पक्षावर जोरदार निशाणा साधलाय. ते म्हणाले की, मागच्या वर्षी सर्व धार्मिक स्थळे बंद होती आणि याच काळात आपण जात-धर्म विसरून एकमेकांचा जीव वाचवण्यासाठी, ऑक्सिजन, बेड, औषधे यांसाठी हातात हात घालून लढत होतो. त्यामुळे माणुसकी जिंकली आणि आपण त्या संकटाला परतून लावले, पण आज पुन्हा धार्मिक व जातीय वाद निर्माण केले जात आहेत, असे म्हणत त्यांनी विरोधकांवर शरसंधान साधले आहे.

संस्कृती तसे होऊ देणार नाही…

रोहित पवार म्हणाले की, कुणाला वाटत असेल, ही माणुसकी विसरली जाईल आणि आपण केलेल्या द्वेषाच्या चिखलात सत्तेचे कमळ फुलेल किंवा काहींना वाटत असेल आपली राजकीय भाकरी भाजेल, पण महाराष्ट्रात ते शक्य नाही. आपली संस्कृतीही तसे होऊ देणार नाही. फक्त मनात सत्तेचे मांडे खाणाऱ्यांनी पेटवलेल्या आगीत सामान्य माणसाच्या भाकरीचा कोळसा होणार नाही आणि द्वेषाच्या चिखलात एकात्मतेचा पाय फसणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

इतर बातम्याः

Special Report | देशातल्या सर्वात मोठ्या लेखकाची ख्यातनाम प्रकाशकांकडून लूट; कोण फोडणार पुस्तकांचा तुरुंग?

Mirza Ghalib | जगण्याचं तत्वज्ञान मलमली भाषेत सांगणाऱ्या असदुल्लाह-ख़ाँ-‘ग़ालिब’ का पता…!

महाराष्ट्राचा महापिता कर्नाटकाच्या मातीत एकाकी, समाधीवर साधे छप्परही नाही; पानिपतकारांच्या डोळ्यांत पाणी, पोटात गोळा!