आमदारांच्या मुलांची फिल्डिंग, भाजपचा मेसेज अन्…; सरवणकरांच्या पराभवाचा कट कोणाचा? पुराव्यासह मोठा गौप्यस्फोट

वॉर्ड 194 मधील पराभवानंतर समाधान सरवणकर यांनी भाजपच्या स्थानिक टोळीवर गंभीर आरोप केले आहेत. व्हॉट्सअँप मेसेजद्वारे गद्दारी केल्याचा दावा करत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे सांगितले.

आमदारांच्या मुलांची फिल्डिंग, भाजपचा मेसेज अन्...; सरवणकरांच्या पराभवाचा कट कोणाचा? पुराव्यासह मोठा गौप्यस्फोट
Samadhan sarvankar
| Updated on: Jan 20, 2026 | 12:38 PM

मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता महायुतीमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे. मुंबईतील वॉर्ड क्रमांक १९४ मधून पराभूत झालेले शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार समाधान सरवणकर यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. तसेच त्यांनी पराभवासाठी भाजपच्या एका स्थानिक टोळीला जबाबदार धरले आहे. भाजपच्या या टोळीने पक्षाचा आदेश डावलून मला पाडण्यासाठी रीतसर मोहीम राबवली, असा खळबळजनक आरोप समाधान सरवणकर यांनी केला. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

समाधान सरवणकर यांनी टीव्ही ९ मराठीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पराभव कसा झाला, कशामुळे झाला याबद्दलची सविस्तर माहिती दिली. प्रभादेवी-वरळी हा परिसर शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र, यंदाच्या निवडणुकीत वॉर्ड १९४ मध्ये समाधान सरवणकर यांचा पराभव झाला. या वॉर्डमधून ठाकरे गटाचे निशिकांत शिंदे विजयी झाले. या निकालावर समाधान सरवणकर यांच संताप व्यक्त केला. माझ्या प्रभागात मला पाडण्यासाठी चार-पाच आमदार आणि दोन पक्षप्रमुखांची मुले तळ ठोकून होती. सर्वांचे मुख्य टार्गेट मीच होतो. मतदार माझ्यासोबत होते. पण भाजपच्या एका विशिष्ट पदाधिकाऱ्याने युतीधर्माला हरताळ फासला, असा घणाघात समाधान सरवणकर यांनी लगावला.

समाधान सरवणकर यांनी भाजपच्या स्थानिक यंत्रणेवर गंभीर आरोप केले आहेत. भाजपच्या एका विशिष्ट पदाधिकाऱ्याने कार्यकर्त्यांना व्हॉट्सअँप मेसेज करून सरवणकरांना मदत करू नका असे स्पष्ट आदेश दिले होते. आपल्याला वरून काहीतरी आलेले आहे असे भासवून कार्यकर्त्यांची दिशाभूल करण्यात आली. भाजपचा अधिकृत लेबल असल्याने कार्यकर्त्यांनी त्या पदाधिकाऱ्याचे ऐकले. त्यामुळे आम्हाला मिळणारी मदत जाणीवपूर्वक रोखण्यात आली, असा गौप्यस्फोट समाधान सरवणकर यांनी केला.

भाजपची टोळी सक्रिय

हा प्रकार केवळ महापालिकेपूरता मर्यादित नसून लोकसभेपासून हे सर्व सुरु आहे. लोकसभेत शीतल गंभीर यांचा पराभव कसा होईल, यासाठी हीच भाजपची टोळी सक्रिय होती. तरीही गंभीर यांनी विजय मिळवला. त्यानंतर प्रिया सरवणकर यांनाही लक्ष्य करण्यात आले. ही विशिष्ट मंडळी भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्याबद्दलही अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन बोलत होती. भाजप अशा पद्धतीने काम करेल याची आम्हाला अजिबात कल्पना नव्हती, असे समाधान सरवणकरांनी म्हटले.

दादर-माहीमची जनता कोणाच्या पाठीशी आहे हे स्पष्ट

या स्थानिक भाजप पदाधिकाऱ्याच्या वागणुकीबद्दल आम्ही तक्रार करण्यापूर्वीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (RSS) वरिष्ठ पातळीवर माहिती दिली होती. जर भाजपने प्रामाणिकपणे युतीचे काम केले असते, तर आज ही वेळ आली नसती. शिवसेनेच्या विशाखा राऊत या केवळ १०० मतांच्या फरकाने निवडून आल्या. यावरून दादर-माहीमची जनता कोणाच्या पाठीशी आहे हे स्पष्ट होते, असेही समाधान सरवणकर म्हणाले.

लवकरच देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार

आपला पराभव हा जनतेने दिलेला कौल नसून स्थानिक पातळीवर झालेल्या गद्दारीचा परिणाम आहे, असे समाधान सरवणकर यांनी सांगत आक्रमक पवित्रा घेतला आहे. या संपूर्ण प्रकरणाचे पुरावे घेऊन मी लवकरच देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. या तक्रारीनंतर भाजप त्या विशिष्ट पदाधिकाऱ्यावर काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.