मुंबई : बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रभावित होऊन शिवसेनेत आलो, अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे आमदार संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी दिली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला वंदन करण्यासाठी आले असता त्यांनी राजकीय परिस्थितीवर भाष्य केले. नुकताच मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे. त्यात संजय राठोड यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर शिंदे गटातील आमदारांनी छत्रपती शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या स्मृतीस्थळी जाऊन वंदन केले. मंत्रीपद मिळाल्यानंतर ते प्रथमच शिंदे गटातील आमदार याठिकाणी आले होते. एकूण 9 मंत्री याठिकाणी आले होते. त्यात संजय राठोड वादग्रस्त असल्याने आणि आरोप असलेले मंत्री म्हणून त्यांच्या मंत्रीपदावर विरोधकांकडून (Opposition) टीका होत आहे. या सर्वांविषयी त्यांनी आपली भूमिका आधीच स्पष्टदेखील केली आहे.