
आज विचारांचं सोनं लुटण्याचा दिवस आहे. राज्यात सकाळच्या सत्रात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी मेळावा नागपूरमध्ये झाला. तर थोड्याच वेळात मंत्री पंकजा मुंडे भगवानगडावर तर नारायगडावर मनोज जरांगे पाटील विचार मांडतील. संघाचे वैचारिक प्रबोधन सकाळीच झाले. इतरांचे दुपारी आणि संध्याकाळी होतील. मुंबईत दोन्ही शिवसेनेचे दसरा मेळावा होत आहेत. उद्धव ठाकरे काय बोलतात याकडं सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. तर त्यापूर्वी खासदार संजय राऊतांच्या विधानाची जोरदार चर्चा रंगली आहे.
हो, चिखलफेक करणार
अतिवृष्टीचा फटका उभ्या महाराष्ट्राला बसला आहे. तर पावसामुळे उद्धव सेनेच्या दसरा मेळाव्याच्या ठिकाणी दादर येथील शिवतीर्थावर पाण्याने चिखल झाला आहे. पाणी काढण्याचे आणि चिखल कमी करण्याचे काम सुरू असल्याचे खासदार संजय राऊत यांनी सांगितलं. शिवसेनाचा दसरा मेळावा ही परंपरा आहे. ती कसोशीने पार पाडण्याचे काम करण्यात येत आहे. आज राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक मुंबईत दाखल झाला आहे. दाखल होत असल्याचे आणि सभेस्थळी पोहचणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर गोरेगाव येथील नेस्कोच्या मैदानावर शिंदे सेनेचा दसरा मेळावा होईल.
तर शिंदे सेनेकडून या परिस्थितीवर भाष्य करत उद्धव सेनेच्या दसऱ्या मेळाव्यातून केवळ चिखलफेक होते. विचारांचं सोनं लुटल्या जात नसल्याचा टोला लगावण्यात आला. त्याला राऊतांनी खरमरीत उत्तर दिलं. ते म्हणालं की “चिखल फेकणार आहोत. चिखल फेकायला पाहिजे. माहिती नसेल तर सांगतो या हिंदू संस्कृतीत अनेक सण आहेत, ज्याचा चिखलाशी संबंध आहे. शिमगा असेल, विदर्भातही असे काही सण आहेत. त्यांना (शिंदे गटाला) हिंदू संस्कृती माहितीच नाही. शिवपार्कातील चिखलात त्यांना लोळवावेच लागेल.” असा पलटवार राऊतांनी केला.
आम्हाला कधीच आव्हान नव्हतं. जर आव्हानं असतं तर आम्ही चिखलात कधी गेलोच नसतो. शिवतीर्थावरच मेळावा करायचा हा हट्ट आम्ही पुढं नेलाच नसता. निष्ठावंत शिवसैनिक उन, वारा, पाऊस, वादळ, चिखल तुडवीत येतील आणि विचारांचं सोनं घेऊन जातील. संध्याकाळी तुम्ही पाहा काय नजारा आहे तो. आधी निष्ठावंताचे मेळावे व्हायचे आता गद्दारांचं मेळावे होतायेत. या गद्दारांना मोदी-शहांचे पाठबळ आहे. त्यांच्या मदतीने त्यांनी शिवसेना चोरली असा आरोप राऊतांनी पुन्हा केला.
मनसेसोबतच्या युतीवर भाष्य
आजच्या दसऱ्या मेळाव्यात मनसेसोबतच्या युतीवर नक्कीच भाष्य होईल. संदर्भ मिळतील. कोणताही संभ्रम असण्याचे कारण नाही. आमची भूमिका स्पष्ट आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात अनेकदा संवाद आणि भेट झाली आहे. पण ताबडतोब काय भूमिका जाहीर अशी अपेक्षा आहे. पण तसं होत नाही. ग्राऊंड लेव्हलाला दोन्ही पक्षांच्या युतीचे काम सुरू झाले आहे. पण याअधिक याविषयी भाष्य आपण करू शकत नाही. ती भूमिका दोन्ही पक्षाचं प्रमुख मांडतील असं सूतोवाच राऊतांनी केलं.