
एअर इंडियाचे विमान अहमदाबादमध्ये गुरुवारी दुपारी कोसळले. यात विमान क्रू मेंबर्ससह 242 प्रवाशी आणि स्थानिक नागरिकांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर हवाई वाहतूक सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यातच खासदार संजय राऊतांनी आज सकाळी पत्र परिषद घेत, सायबर हल्ल्याच्या माध्यमातून इंजिन बंद पडलं का? असा सवाल केला. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. संजय राऊतांना नेमकं म्हणायचंय तरी काय? हा पहलगामसारखाच एक हल्ला असल्याचे त्यांना सुचवायचंय का? काय म्हणाले राऊत?
राऊत म्हणाले की, ड्रीमलायनरच्या अपघाताची चौकशी सध्या सुरू आहे. देशातील आणि परदेशातील अनेक एजन्सी सध्या अपघाताचा एकत्रित तपास करत आहेत. ब्रिटनचं पथक आले आहे. पोर्तुगालचे पथक आले आहे. अमेरिकेतील बोईंग कंपनीची टीम आलेली आहे. आपल्या काही एजन्सी आहेत. त्याच्यामुळे याविषयावर मी मत मांडणं योग्य होणार नाही.
पण ड्रीमलायनरबाबत जेव्हा करार झाला होता. तेव्हा भारतीय जनता पक्षाने त्यासंदर्भात शंका उपस्थित केल्या होत्या. या विमानाची क्षमता, इंजिन याविषयी भाजपने शंका घातली होती. UPA च्या काळात या विमानांची खरेदी झाली होती. प्रफुल्ल पटेल त्यावेळी त्या खात्याचे मंत्री होते. त्यांनी वारंवार त्याविषयीचा खुलासा केला होता.
तो खळबळजनक दावा काय?
नेमका हा अपघात घडला कसा? हा जगातील एव्हिएशन क्षेत्राला पडलेला प्रश्न आहे. 30 सेकंदात हे घडलं कसं? हा प्रश्न आहे. एकाच वेळेला दोन इंजिन बंद पडली कशी? कोणी सायबरच्या माध्यमातून विमानाची यंत्रणा हायजॅक केली का? असे अनेक प्रकार समोर येत आहेत. आपण त्यातील तज्त्र नाही. पण शत्रू राष्ट्राकडून जे सायबर हल्ले होत आहेत. ती गंभीर गोष्ट आहे. आपली यंत्रणा ठप्प करण्यात येते. अनेकदा लष्कराचे नेटवर्क ठप्प करण्याचा प्रयत्न होतो. यंत्रणा तपास करत असताना त्यावर आताच काही बोलणं योग्य नाही. या अपघातात 300 हून अधिक लोकांना प्राण गमवावे लागले. माझ्या मनात काही शंका आहेत, पण त्या आताच व्यक्त करून गोंधळ उडवणे योग्य नाही, असे राऊत म्हणाले.
अहमदाबाद विमानतळ सध्या कुणाच्या ताब्यात आहे, विमानाची देखभाल, सुरक्षा हे कुणाकडे आहे. येथे मनुष्यबळ अर्ध्यावर आहे, असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षरित्या अदानींवर पुन्हा निशाणा साधला. जर लोकांच्या मनातील प्रश्नांना वेळीच उत्तर दिली नाही तर देशात विमानातून प्रवास करणाऱ्यांची संख्या घटेल, अशी भीती राऊतांनी व्यक्त केली.