Sanjay Raut: जंतर मंतरवर आम्ही जनरल कायर बघितला, संजय राऊतांची सडकून टीका, कुणावर निशाणा?
Sanjay Raut Big Statements: उद्धव सेनेचे खासदार संजय राऊत यांनी कालच्या राहुल गांधी यांच्या भाषणाचा संदर्भ देत केंद्र सरकारवर सडकून टीका केली. CJP आंदोलनादरम्यान आम्ही जंतरमंतरवर जनरल कायर बघितला अशी घणाघाती टीका त्यांनी केली. त्यांचा निशाणा कुणावर होता हे वेगळं सांगायची गरज नाही. यावेळी त्यांनी सीजेपी पुढे काय भूमिका घेते याकडे लक्ष असल्याचे सांगितले.

आज शिवसेना पक्ष आणि चिन्हावर अधिकार कुणाचा यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. गेल्यावेळी प्रमाणे सुनावणी पुढे ढकलली जाते की आज यावर सुनावणी होते याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. त्याचवेळी उद्धव सेनेचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर मोठी टीका केली आहे. जंतर मंतरवर आम्ही जनरल कायर बघितला, अशी टीका त्यांनी केली. काल लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या भाषणाचा संदर्भ देत त्यांनी ही टीका केली.
अमित शाह यांच्यावर मोठी टीका
आता या सगळ्या पापांचं फळ हे अमित शाह यांच्या पदरात टाकावचं लागेल. जालियनवाला हत्याकांडात आम्ही जनरल डायर पाहिला होता. तर आता जंतरमंतरवर आम्ही जनरल कायर बघितला अशी सडकून टीका त्यांनी केली. याप्रकरणी त्यांचा थेट संबंध असो वा नसो त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे. त्यांना न विचारता फायरिंग झालं असेल तर गृहमंत्री म्हणून त्यांची जबाबदारी आहे. याचा अर्थ पोलिस तुमचे आदेश मानत नाही. तुमचे आदेश पोलीस मानत नाहीत. तुम्ही अकार्यक्षम आहात. जर तुम्ही तो आदेश दिला असेल तर तुम्ही विद्यार्थ्यांना गोळ्या घालून ठार मारण्याचा प्रयत्न केलात. दोन्ही बाजूंनी आपण पाहिलं तर अमित शाह हे अपराधी आहेत. त्यांचा राजीनामा मागणं हे राष्ट्राचं कर्तव्य आहे. जितेंद्र सिंह हे प्रधानमंत्री कार्यालयातील एक राज्यमंत्री आहेत. ते खोटे बोलत आहेत. ते लिहून दिलेली भाषणं वाचतात. स्वतः ज्यांच्यावर गोळ्या चालल्या असे अनेक विद्यार्थी समोर आले आणि संसदमार्ग पोलीस ठाण्यातील डायरीत त्याची नोंद झाली आहे. या डायरीतील पानं येत्या काळात समोर येतील, असे राऊत म्हणाले.
तर अमित शाह यांना पुण्यात कोणीतरी कार्यक्रमाला बोलावले आहे, असे मला कोणीतरी सांगितले आहे. ज्या पुणेकरांनी या गोळीबार करणाऱ्या महाशयाला बोलावलं आहे. त्यांना लाज वाटली पाहिजे. लोकमान्य टिळक पुरस्कार असो वा इतर कोणताही पुरस्कार असो, तो शाह यांच्या हस्ते देत आहेत. मुलांच्या रक्ताने रंगलेले हात आहेत त्यांचे आहेत. अख्ख्या पुणेकरांनी त्याला विरोध केला पाहिजे, असे आवाहन राऊतांनी केले.
ते आमच्या पक्षाचे मालक कसे झाले?
आज शिवसेना पक्ष आणि चिन्हावर अधिकार कुणाचा यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यावरून राऊतांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. राज्यघटनेतील परिशिष्ट 10 चा आणि अँटिडिफेक्शन लॉचा आधार घेत राऊतांनी मोठे विधान केले. संविधानातील या तरतूदीचे न्यायालयाने पालन केल्यास एकनाथ शिंदे यांच्याकडील सर्व सदस्य हे अपात्र ठरतील. न्यायालयाने तीन वर्षांपूर्वीच याविषयीचा निर्णय घ्यायला पाहिजे होता. हे आमच्या पक्षाचे मालक कसे झाले? सर्वोच्च न्यायालयाने, केंद्रीय निवडणूक आयोगाने केलेला हा सर्वात मोठा घोटाळा आहे, असा गंभीर आरोप राऊत यांनी केला. शरद पवार यांचा पक्ष अजित पवार यांना देणं. बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली शिवसेना एखाद्या ऐऱ्या गैऱ्याच्या हाती देणं हा सर्वात मोठा घोटाळा विधानसभा अध्यक्ष, निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्टाने मिळून केल्याचा आरोप राऊतांनी यावेळी केला.