
आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांचे समर्थक आणि कार्यकर्ते यांच्यात काल तुफान राडा झाला. विशेष म्हणजे राज्याच्या कायदे मंडळ परिसरातच, विधानभवनाच्या लॉबीतच हा प्रकार झाला. त्यामुळे इभ्रत तर गेलीच पण सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झाला. हा आयता मुद्दा विरोधकांच्या हाती लागला. आज उद्धव ठाकरे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी त्यावर चांगलेच तोंडसूख घेतले. हे टोळी युद्ध असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांनी फडणवीस सरकारला या मुद्दावरून घेरले. काय म्हणाले राऊत?
राज्याच्या संस्कृतीवर काळा डाग
काल विधानभवनाच्या लॉबीत जो प्रकार घडला ती गँगवॉर आहे. हा प्रकार अत्यंत दुर्दैवीच नाही तर दुखःद आणि धक्कादायक असल्याचे राऊत म्हणाले. हे टोळीयुद्ध राज्याच्या संस्कृतीला लाज आणणारे आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांचे एक विधान माझ्या लक्षात आहे, ते म्हणाले होते की, मी महाराष्ट्राची संस्कृती जपेन संस्कृती बदलू देणार नाही. पण महाराष्ट्राच्या संस्कृतीला त्यांच्या कारकिर्दीतच रोज अनेक मार्गाने डाग लागत आहे, असा घणाघात राऊतांनी घातला.
ही संघाची संस्कृती आहे का?
भ्रष्टाचार, व्याभिचार, हनी ट्रॅप, आमदार निवासातील टॉवेल गँग असेल, मंत्री पैशांच्या बॅगा घेऊन असतात, पण कारवाई होत नाही. मोक्काचे आरोपी, खुनाचे आरोपी, दाऊदचे हस्तक हे त्यांच्या पक्षात विधीमंडळात घेतले जातात, ही या महाराष्ट्राची संस्कृती आहे का? असे मला देवेंद्र फडणवीसांना विचारायचे आहे. ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची संस्कृती आहे का? ज्या संस्कारातून फडणवीस हे आले आहेत. त्यात राज्यात सध्या जे सुरू आहे, ते बसते का? असा प्रश्नांचा भडीमार त्यांनी केला.
राष्ट्रपती राजवट लागू करा
विधानभवनात काल टोळीयुद्ध झाले, गँगवॉर झाली. खून प्रकरणातील, मोक्काचे आरोपी, दरोड्यातील आरोपी काल विधानभवनाच्या लॉबीत होते, त्यांना कोणी आणलं. काय कारवाई झाली, असा जाब राऊतांनी विचारला. हा सर्व प्रकार पाहता शिवसेना राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करत असल्याचे ते म्हणाले.
हे गुंडांचे राज्य झालं आहे. जर हा प्रकार इतर कोणाच्या राज्यात झाला असता, कोणी अन्य मुख्यमंत्री असता, तर हेच देवेंद्र फडणवीस विधानभवनाच्या पायरीवर येऊन हे सरकार बरखास्त करा, इथे राष्ट्रपती राजवट लावा, असे किंचाळले असते. मग कालच्या घटनेवरून त्यांना वाटत नाही का, की हे राज्यात राष्ट्रपती लागवट लागू झाली पाहिजे, असा सवाल राऊतांनी केला.