Sanjay Raut: धनुष्यबाण आणि घड्याळाचा निकाल लागला! तो फोटो आणि… ‘सुप्रीम’ निकालाअगोदरच संजय राऊतांच्या भाष्यानं खळबळ

Sanjay Raut on Eknath Shinde And Ajit Pawar: संजय राऊत गेल्या दोन दिवसांपासून तोफ गोळे डागत आहेत. काल विमानतळावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरन्यायाधीश सूर्य कांत यांचे स्वागत केले. तर संध्याकाळी अजितदादांसह त्यांचा सत्कार केला. त्यावरून आता संजय राऊतांनी खळबळजनक ट्विट केले आहे.

Sanjay Raut: धनुष्यबाण आणि घड्याळाचा निकाल लागला! तो फोटो आणि... सुप्रीम निकालाअगोदरच संजय राऊतांच्या भाष्यानं खळबळ
सरन्यायाधीश सूर्य कांत, संजय राऊत, एकनाथ शिंदे, अजितदादा पवार
Image Credit source: संजय राऊत यांच्या एक्स हँडलवरून साभार
| Updated on: Jan 25, 2026 | 8:45 AM

CJI Surya Kant-Eknath Shinde And Ajit Pawar: सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्य कांत हे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्यांच्या मुंबई विमानतळावरील एंट्रीपासून ते भव्य सत्कारापर्यंत राजकीय नेत्यांच्या वावरामुळे एकच काहूर उठलं आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. ही सुनावणी लांबणीवर गेली आहे. त्यातच काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई विमानतळावर त्यांचे पुष्पगुच्छ देत स्वागत केले. तर संध्याकाळी दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादा हे त्यांच्या भव्य सत्कार कार्यक्रमात जातीने हजर होते. त्यांनी गणपतीची मूर्ती दिली. बुद्धीची देवतेला स्मरून उद्धव सेनेचे खासदार संजय राऊत यांनी हाच फोटो ट्विट करत खळबळजनक दावा केला.

सरन्यायाधीशांचा भव्य सत्कार

देशाचे 53 वे सरन्यायाधीश म्हणून सूर्य कांत यांनी पदभार स्वीकारला. मुंबई उच्च न्यायालयातर्फे त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. या दोन्ही नेत्यांनी गणपती मूर्ती देत सरन्यायाधीशांचे अभिनंदन केले. हाच फोटो खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरुन ट्विट केला. पण त्यांच्या कॅप्शनने सर्वाधिक लक्ष वेधले आहे. कमी शब्दात राऊतांनी भविष्यातील घडामोडींवर भाष्य केले. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. कालही त्यांनी मुंबई विमानतळावरील सरन्यायाधीशांचा एकनाथ शिंदे यांच्याकडून पुष्पगुच्छ देत स्वागताचा फोटो शेअर केला आणि संताप व्यक्त केला होता.

धनुष्यबाण आणि घड्याळाचा निकाल लागला

सरन्यायाधीश सूर्य कांत यांचे अभिनंदन करतानाचा एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा फोटो राऊतांनी शेअर केला. त्यांनी फोटो शेअर करताना, “धनुष्य बाण आणि घड्याळाचा निकाल लागला!!!!न्यायदेवते त्यांना क्षमा कर! हे राम!” अशी कॅप्शन त्यांनी जोडली. या कमी शब्दात त्यांनी मोठे भाष्य करण्याचा प्रयत्न केला. राऊतांच्या दोन दिवसांच्या ट्विटर वॉरमुळे त्यांच्या मनात कोणती साशंकता आहे हे स्पष्ट होत असले तरी त्यांनी त्याबाबत सविस्तर म्हणणे टाळले आहे. पण राऊत जे इंगित करत आहेत, त्यामुळे राज्यात खळबळ उडाली हे नक्की.

बुधवारी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हाबाबत सुनावणी होणार होती. पण ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली. गेल्या तीन वर्षांपासून हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात सुरु आहे. येत्या चार आठवड्यात याविषयीची सुनावणी होणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण पुढे ढकलताना सांगितले आहे.