Sanjay Raut : मनसेसाठी उद्धव सेना काँग्रेसची साथ सोडणार? काँग्रेस नेत्यांना कान पिचक्या देताना राऊतांचे ते मोठे विधान

Sanjay Raut on Congress : मतचोरीविरोधात एकजुट दाखवणाऱ्या महाविकास आघाडीत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीवरून शीतयुद्ध सुरू आहे. काँग्रेसने वेगळी चुल मांडण्याचे संकेत दिले असताना आता उद्धव ठाकरे शिवसेनेने सुद्धा काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांना फटकारले आहे.

Sanjay Raut : मनसेसाठी उद्धव सेना काँग्रेसची साथ सोडणार? काँग्रेस नेत्यांना कान पिचक्या देताना राऊतांचे ते मोठे विधान
संजय राऊत काँग्रेस
| Updated on: Oct 23, 2025 | 10:38 AM

Sanjay Raut on alliance with MNS and Congress : मत चोरी आणि निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीविरोधात विरोधी पक्षातील एकजुट दिसली. महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी त्यावर वज्रमुठ दाखवली. पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येताच काँग्रेसने वेगळी चुल मांडली. मुंबईतील नेत्यांच्या वेगळ्या सूरांनी आघाडीतील बेसूर समोर आले. भाई जगताप यांच्यानंतर प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या भूमिकेने सध्या काहूर उठले आहे. मनसेला सोबत घेण्यावरून वातावरण तापलेले दिसत आहे. त्यातच खासदार संजय राऊत यांनी सकाळच्या पत्र परिषदेत काँग्रेस नेत्यांना चांगलेच फटकारून काढले आहेत.

काँग्रेस नेत्यांवर संजय राऊतांचे तोंडसूख

एरव्ही रोज महायुती आणि केंद्र सरकारवर संजय राऊत यांच्या आरोपांचे तोफगोळे उडतात. त्यांच्याकडील गोळाबारुदाने महायुतीची तटबंदी रोज हादरते. त्यांच्या गंभीर आरोपांचे पडसादही लागलीच उमटतात. पण आजच्या पत्र परिषदेची सुरुवातच अंतर्गत कलहाने झाली. राऊतांनी काँग्रेस नेत्यांच्या बदललेल्या भूमिकेवर मत व्यक्त केले.

मुंबई महापालिका अथवा स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी मित्र पक्षाने वेगळी भूमिका घेतली असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. पण आमच्याकडून आमच्या मित्र पक्षांना, सहकाऱ्यांना अडचणीत येणारी भूमिका घेणार नाही. वक्तव्य करणार नाही. राज ठाकरे यांचा स्वतंत्र पक्ष आहे. त्यांची स्वतंत्र भूमिका आहे आणि त्यांच्यामुळे कोणी वेगळी भूमिका घेत असेल तर तोही त्यांचा प्रश्न आहे. आम्हाला भाजपचा पराभव करायचा आहे. अदानीच्या घशात मुंबई जाण्यापासून वाचवायची आहे. तर संयुक्त महाराष्ट्राच्यावेळी सर्व पक्ष एकत्र आले होते. काँग्रेसच्या नेत्यांनी हा इतिहास समजून घेणे आवश्यक आहे. संयुक्त महाराष्ट्रावेळी सर्व पक्ष मतभेद विसरून एकत्र आले होते. बिहारमध्ये राज ठाकरे नाहीत. तरीही काँग्रेस आणि तेजस्वी यादव यांचं वाजलं आहे. निवडणुका तोंडावर आल्या आहेत. तरी त्यांच्यात जागा वाटपाचे भिजत घोंगडं आहे. तिथे राज ठाकरे अथवा उद्धव ठाकरे आहेत का? ठीक आहेत, अशी वक्तव्य होतात. पण मुंबई महाराष्ट्राच्या हातात असायला हवी ही आमची भूमिका आहे, असे राऊतांनी काँग्रेसला ठणकावले.

राहुल गांधींना पंतप्रधान करायचं होतं

काँग्रेस पक्षातील मराठी नेतृत्वानं पुढील जे संकट आहे मुंबईवरील, त्यावर गांभीर्याने विचार करावा. आम्हाला जे बोलायचे ते आम्ही राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, वेणुगोपाल, महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्याशी बोलू. या चारही प्रमुख लोकांशी कोणतीही चर्चा झाली नाही. त्यामुळे त्यावर उगाच आकांडतांडव करण्यात आधार नाही. ही लोकशाही, संविधान आणि मुंबई वाचवण्याची निकराची लढाई आहे हे काँग्रेसच्या नेत्यांनी गांभीर्याने समजून घेतले पाहिजे.

आम्हाला काँग्रेसचाच पंतप्रधान करायचा होता. पण नाही होऊ शकला. इंडिया ब्लॉक निर्माण केला तो आम्हाला राहुल गांधी यांना पंतप्रधान करण्यासाठी होता. आमचं मन फार मोठं आहे. आम्हाला राहुल गांधी यांना पंतप्रधान करायचं आहे, मुबंईच्या महापौरांचं काय घेऊन बसले हे महाशय. मुंबईचेच नाही तर 27 महापालिकेचे महापौर काँग्रेसनं करावं. महापौर मराठी होणं याला आमचं प्राधान्य आहे.

मनसेसाठी काँग्रेसला सोडणार का?

मनसे सोबत आल्यापासून काँग्रेसचा सूर बदलला आहे. त्यामुळे नवीन मित्र मनसेसाठी काँग्रेसला सोडणार का असा सवाल संजय राऊतांना विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी लागलीच उत्तर दिलं. अशी कुठलीही चर्चा सुरू नसल्याचे ते म्हणाले. महाविकास आघाडीसमोर असा विषय आलेला नाही. इंडिया ब्लॉकच्या बैठकीत असा विषय नाही, काँग्रेसने तशी भूमिका घेतली नाही. आतापर्यंत सर्वपक्षीय शिष्टमंडळात काँग्रेस पक्ष सहभागी झालेला आहे. काँग्रेसच्या मुंबईतील नेत्यापासून ते दिल्लीतील नेत्याचा निवडणूक आयोगाविरोधातील लढ्याला पाठिंबा आहे, असे राऊत म्हणाले.