Sanjay Raut: ऑपरेशन टायगर? राहुल गांधींचा तो व्हिडिओ पोस्ट करत संजय राऊतांचा नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच हल्लाबोल, टार्गेटवर कोण?

Sanjay Raut Big Attack: आज मराठी नवीन वर्षाची सुरूवात झाली आणि या निमित्ताने उद्धव सेनेचे खासदार संजय राऊत यांनी विरोधी पक्ष नेते राहुल गांधींचा जुना व्हिडिओ पोस्ट करत थेट संदेश दिला. त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवरून त्यांनी हा व्हिडिओ पोस्ट करत कुणाला टार्गेट केलं?

Sanjay Raut: ऑपरेशन टायगर? राहुल गांधींचा तो व्हिडिओ पोस्ट करत संजय राऊतांचा नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच हल्लाबोल, टार्गेटवर कोण?
संजय राऊत, राहुल गांधी
Image Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Mar 19, 2026 | 9:45 AM

Sanjay Raut repost Rahul Gandhi Video: आज हिंदू आणि मराठी नवीन वर्षाची सुरूवात होत आहे. यानिमित्ताने शुभेच्छांचा वर्षाव सुरू असतानाच उद्धव सेनेचे खासदार संजय राऊत यांनी सकाळीच एक खणखणीत संदेश दिला. त्यांनी लोकसभेतील विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा एक जुना व्हिडिओ त्यांच्या एक्स हँडलवरून ट्वीट केला. पक्ष सोडणाऱ्यांवर राहुल गांधी यांनी टीकास्त्र सोडले होते. ‘जा आणि स्वतःचा जीव वाचवा, महल वाचवा, मला काही फरक पडत नाही’ असा घणाघात राहुल गांधींनी पक्ष सोडणाऱ्या नेत्यांना दिला होता. हाच व्हिडिओ नेमका नवीन वर्षाच्या मुहूर्तावर ट्वीट करण्यामागे राऊतांचे उद्देश काय? कुणाला त्यांना हा इशारा द्यायचा आहे हे वेगळं सांगणं न लागे. पण आजचं औचित्य साधण्यामागील कारण त्यांनी स्पष्ट केलं नाही.

कहाणी अच्छी है!

खासदार संजय राऊत यांनी आज सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर राहुल गांधी यांचा एक जुना व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यात राहुल गांधी यांनी काँग्रेस सोडून जाणाऱ्या नेत्यांवर टीका केली. राहुल गांधी यांनी या नेत्यांना चांगले सुनावले. तुम्ही तुमचे घरदार सांभाळा, स्वतःचा जीव वाचवा, राजकीय करीअर वाचावा, तुम्ही पक्ष सोडून गेल्याने मला कोणताही फरक पडत नाही असे वक्तव्य राहुल गांधी यांनी त्या व्हिडिओत केले आहे. हा व्हिडिओ पोस्ट करत संजय राऊत यांनी ‘कहाणी अच्छी है!’ असे कॅप्शन दिले आहे. त्यामागे त्यांना काय इशारा द्यायचा आहे. हा व्हिडिओ पोस्ट करून संजय राऊत पक्ष सोडणाऱ्यांना काय इशारा देऊ इच्छितात आणि अशात कोणी पक्ष सोडणार का? याच्या चर्चा रंगल्या आहेत.

‘ऑपरेशन टायगर’ ची भीती?

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कालपरवा दिल्ली दौरा केला. त्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. त्यांनी संसदेलाही भेट दिली. भाजपच्या बड्या नेत्यांशी बैठक केल्यानंतर त्यांनी पक्षाच्या खासदारांची बैठक घेतली. त्याचवेळी उद्धव सेनेच्या खासदारांना आपल्या खेम्यात घेण्यासाठी मोठ्या हालचाली दिल्लीत झाल्याची चर्चा होत आहे. उद्धव सेनेचे 4 खासदार शिंदे सेनेत येण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. हा पक्ष प्रवेश लवकरच होणार असून शिंदे गटाचे दिल्लीतील वजन यामुळे वाढणार आहे. या ऑपरेशन टायगरमुळे उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. दिल्ली वारीतून मोठा वार होण्याची शक्यता असल्याची चर्चा होत असतानाच आता खासदार संजय राऊतांनी केलेल्या सूचक ट्वीटने मोठे संकेत दिले आहे. खरंच उद्धव ठाकरेंचे खासदार फुटणार का? असा सवाल केल्या जात आहे. याचे उत्तर अर्थातच लवकरच समोर येईल.

Follow Us