आव्हान देऊ नका, अडचणीत याल… संजय राऊत यांचा सरनाईक यांना इशारा
ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना रॅपिडोच्या मुद्यावरून तीव्र शब्दांत इशारा दिला आहे. रॅपिडोमुळे रिक्षाचालकांची रोजीरोटी हिरावली जात असून, सरनाईक रॅपिडोकडून उपकृत असल्याचा राऊतांचा आरोप आहे. मंत्र्यांनी रिक्षाचालकांच्या समस्यांवर लक्ष द्यावे, अन्यथा अडचणी वाढतील, असे राऊत म्हणाले.

रॅपिडोसाठी रिक्षाचालकांची रोजीरोटी हिरावून घेतली जात आहे. या रिक्षाचालकांना वाऱ्यावर सोडलं जात आहे. त्यांच्या प्रश्नांसाठी मी तुमच्याकडे वेळ मागितली आहे. तुम्ही आम्हाला वेळ द्या. रिक्षाचालकांच्या समस्या जाणून घ्या. उलट आरोपप्रत्यरोप करू नका. आव्हानं देऊन नका. नाही तर तुम्हीच अडचणीत याल, असा इशाराच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना दिला आहे. संजय राऊत मीडियाशी संवाद साधत होते.
प्रताप सरनाईक हे महाराष्ट्रातील धर्मात्मा आहेत आणि ते राज्याचे परिवहन मंत्री आहेत. नाशिक आणि इतर भागातील संघटनांनी माझ्याकडे जी कागदपत्रे दिली त्यानुसार सरकारमधील काही मंत्र्यांना रॅपिडोने विविध मार्गाने उपकृत केलं आहे. त्यांची सार्वजनिक मंडळ, दहीहंड्या यांना रॅपिडोवाल्यांनी प्रायोजक म्हणून पैसे दिले आहेत. या इंटरेस्टला कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट म्हणतात. ठाण्यातील दहीहंडीतही स्पॉन्सरशीप मिळाली आहे. ज्या रॅपिडो कंपनीला गरीब रिक्षाचलाकांच्या छाताडावर बसवलं आहे, त्या रॅपिडो कंपनीने परिवहन मंत्र्यांची दहीहंडी स्पॉन्सर केली आहे. इतर मंत्र्यांना स्पॉन्सर केलं आहे. हा मुद्दा समोर येत असेल तर रिक्षा चालकांचं समाधान करणं हे परिवहन मंत्र्यांचं काम आहे. त्यांनी त्यांच्याशी बोलावं. परिवहन मंत्र्यांना रॅपिडो बरोबर बैठक घ्यायला वेळ आहे. पण मराठी रिक्षाचालकांशी बोलायला वेळ नाही. आव्हानं देऊ नका. आम्ही जे सांगतो त्यावर बोला, नाही तर तुम्ही अडचणीत याल, असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.
यूपीच्या निवडणुका म्हणून मुदत वाढ
उत्तर प्रदेशातील निवडणुका आहेत, त्यासाठी त्यांचे पार्टी चीफ अमित शाह यांच्या सूचनेनुसार मराठी बोलण्यासाठी रिक्षाचलाकांना मुदत वाढ दिली आहे. योगी आदित्यनाथ, अमित शाह किंवा मोदींच्या आदेशाने सरनाईक काम करत आहेत. मी ज्या रिक्षा चालकांबाबत बोलतो ते मराठी आहेत. मराठी येण्याचा आणि मराठी रिक्षाचालकांची रोजीरोटी हिरावून घेणे हे दोन वेगळे प्रश्न आहेत. मराठी रिक्षाचलाकांची रोजीरोटी परिहवन मंत्री हिरावून घेत आहेत. मी दुसरा प्रश्न मांडत नाही, असं राऊत म्हणाले.
हा इगोचा प्रश्न नाही
मी लोकप्रतिनिधी म्हणून वेळ मागितला आहे. तुमचं आमचं राजकीय भांडण जे असेल ते असेल. पण मी रिक्षाचलाकांसाठी वेळ मागतो. पण तुम्ही अमित शाह यांना विचारल्याशिवाय मला वेळ देणार नाही. शाह तुमचे पक्षप्रमुख आहे. मी वेळ मागेत राहिल. शाह मंत्रिमंडळातून जातील तेव्हा मला वेळ देतील, असं सांगतनाच रिक्षाचालकांच्या प्रश्नांसाठी सरनाईक माझ्याकडे आले तर स्वागत करेन. किंवा मला वेळ दिला तर मी त्यांच्याकडे जाईल. यात इगोचा प्रश्न नाही. हा रिक्षाचालकांच्या रोजीरोटीचा प्रश्न आहे, असंही त्यांनी सांगितलं.