शिंदेंच्या पक्षात 3 एकनाथ शिंदे, एकाला फडणवीसांचं बळ तर दुसऱ्याला… बड्या नेत्याच्या दाव्याने मोठी खळबळ

संजय राऊत यांनी दावा केला आहे की शिंदे गटात तीन एकनाथ शिंदे आहेत, ज्यात फडणवीस आणि अमित शाह वेगवेगळ्या शिंद्यांना बळ देत आहेत. राऊत यांनी शिंदे-फडणवीसमधील अंतर्गत वादावरही भाष्य केलं. तसेच, त्यांनी सुनेत्रा पवार गटाच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवरही गंभीर टीका केली.

शिंदेंच्या पक्षात 3 एकनाथ शिंदे, एकाला फडणवीसांचं बळ तर दुसऱ्याला... बड्या नेत्याच्या दाव्याने मोठी खळबळ
eknath shinde
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 04, 2026 | 11:32 AM

एकनाथ शिंदे यांच्या पक्षात तीन एकनाथ शिंदे आहेत. हे तीन एकनाथ शिंदे कोण आहेत हे तुम्हाला लवकरच कळेल. थोडा अभ्यास करा. एकाच पक्षात तीन शिंदे आहेत. आमच्याकडे एकच एकनाथ शिंदे होते. तिकडे तीन शिंदे तयार झाले आहेत. मी काय म्हणतो हे या तिन्ही शिंदेंना माहीत आहे. त्यातील दोन शिंद्यांनी आम्हालाही संपर्क केला आहे. दु:ख व्यक्त करण्यासाठी खांदे हवे असतात म्हणून त्यांनी संपर्क केला आहे. आम्ही चुकलो. आम्ही काय करावं? आता हवा बदलली आहे, असं हे दोन्ही शिंदे म्हणत आहेत, असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना केला आहे. राऊत यांच्या या दाव्याने मोठी खळबळ उडाली आहे.

शिंदेंच्या पक्षात तीन एकनाथ शिंदे आहेत. याचा अर्थ समजून घ्या. या क्षणी तीन एकनाथ शिंदे आहेत. कोणत्या शिंदेला ताकद द्यायची हे अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस ठरवतील. माझ्या माहितीनुसार एका शिंदेला फडणवीस ताकद देत आहेत. दुसऱ्या शिंदेंना अमित शाह ताकद देत आहेत, असा गौप्यस्फोट संजय राऊत यांनी केला आहे.

Loading...

शिंदे-फडणवीसांमध्ये विस्तव जात नाही

शिंदे आणि फडणवीस यांच्यात विस्तव जात नाही. दोघे समोर आल्यावर खोटं खोटं बोलतात. दाढीतल्या दाढीत गोबऱ्या गालात हसतात. पण त्यांच्यात विस्तव जात नाही. पाठ वळताच हे दोघेही एकमेकांवर वार करण्यासाठी असूसलेले असतात. दोघेही पाठीवर चिलखत लावून फिरत आहेत. कधी वार होईल याचा नेम नाही असं दोघांनाही वाटतंय, असा टोला त्यांनी लगावला.

सुनेत्रा पवारांचा पक्षव कोसळणार

यावेळी त्यांनी सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्त्वातील राष्ट्रवादीवरही हल्ला चढवला आहे. शिंदेंचा गट आणि अजित पवारांचा गट हे गट आहेत. हे पक्ष नाहीत. या गटांना विचारधारा नाही. भूमिका नाही. हे अमित शाहांचे गट आहेत. शहांनी निर्माण केलेले आहेत. अमित शाह आहेत तोपर्यंत हे गट राहतील. दोन्ही पक्ष फार काळ टिकणार नाहीत. सर्वात आधी दुर्देवाने सुनेत्रा पवारांचा पक्ष कोसळेल. तसं चित्र आहे. एकनाथ शिंदेंचा जो पक्ष आहे, त्याच्यातही अस्वस्थता आणि अस्थिरता आहे, असा दावा राऊत यांनी केला आहे.

अमिताभ पिंजऱ्यात, विद्रूप चित्र

अभिनेता तुषार कपूरला खंडणीची धमकी आली होती. त्यावरही राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री कूचकामी आहेत. गृहमंत्री म्हणून कुचकामी ठरले आहेत. महानायक अमिताभ बच्चन सुरक्षेचा पिंजरा घेऊन चालत आहेत. हे विद्रूप चित्र आहे. या राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था कोसळली आहे. त्याचं चित्र त्या पिंजऱ्यात आहे. अमिताभ बच्चन दुबळ्या व्यक्ती दिसत आहेत. राज्यातील मुख्यमंत्र्यांना लाज वाटावी असं चित्र आहे. या राज्यात प्रदीप पूर्णेकर, टायगर श्रॉफ आणि अमिताभ बच्चन सुरक्षित नाही. मग सुरक्षित कोण आहे? अमित शाह, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हेच लोक सुरक्षित आहेत. झेड प्लस सुरक्षेत फिरत आहेत. बाकीच्या लोकांना खंडणीच्या धमक्या येत आहेत अन् राज्याचे मुख्यमंत्री गोकूळच्या राजकारणात बिझी आहेत, अशी खोचक टीकाही त्यांनी केली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us