मातोश्रीचा मागचा दरवाजा कशासाठी होता? टेम्पो कसे आत यायचे? संजय शिरसाट यांचा राऊतांवर पलटवार
सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी संजय राऊतांच्या लाचखोरीच्या आरोपांना सडेतोड उत्तर दिले आहे. 'मातोश्रीचा मागचा दरवाजा कशासाठी होता? टेम्पो कशासाठी आत यायचे?' असा सवाल करत शिरसाट यांनी ठाकरे सरकारवरच पलटवार केला. त्यांनी दलित कल्याण व सामाजिक न्याय विभागातील आपल्या कामांची माहिती देत राऊत आणि उद्धव ठाकरेंना दलित मंत्र्यांच्या नियुक्तीवरूनही घेरले.

लातूरमध्ये लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या नावाने प्रशिक्षण केंद्र उभारण्यासाठी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी 5 कोटी रुपयांची लाच मागितल्याचा खळबळजनक आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. राऊत यांच्या या आरोपाचा संजय शिरसाट यांनी समाचार घेतला आहे. मी गेल्या दोन वर्षात 25 कोटीचा एक तरी प्रस्ताव मंजूर केल्याचं दाखवा. मला मंत्री म्हणून 10 कोटीच्यावरचा प्रस्ताव मंजूर करण्याचा अधिकार नाही. त्यासाठी मुख्यमंत्र्यांची परवानगी घ्यावी लागते, असं सांगतानाच मातोश्रीच्या मागचा दरवाजा कशासाठी होता? या दरवाजातून टेम्पो आत कशासाठी यायचा? असा सवालच संजय शिरसाट यांनी केला आहे.
सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषद घेऊन हा सवाल केला आहे. आतापर्यंत मी संजय राऊत यांच्या विरोधात बोलत होतो. त्यावर राऊतांनी कधी तोंड उघडलं नाही. पण मागची एक दोन प्रकरणं पाहिल्यावर राऊत यांना वाटलं चांगला चान्स आहे. त्यामुळेच त्यांनी माझ्यावर आरोप केले. उदगीरकर नावाच्या गृहस्थाने 25 कोटीचा प्रस्ताव दिला होता. अनेक प्रस्ताव माझ्याकडे येत असतात. अनेक प्रस्ताव फेटाळले जातात. काहींना मंजुरी दिली जाते. हा प्रोसेजचा भाग आहे. पण राऊतांनी त्याचा थेट संबंध साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्याशी लावला. अण्णा भाऊ साठेंचं योगदान मला माहीत आहे का? असा जावई शोधही त्यांनी लावला. त्या प्रकरणाशी अण्णा भाऊ साठेंचा संबंध काय? लेटरहेडवर महापुरुषांचं नाव लावायचं आणि काम नाही झालं तर बदनाम करायचं असा प्रकार सुरू असतो, असं संजय शिरसाट म्हणाले.
ठाकरेंनी अण्णा भाऊ साठेंना हार घातला का?
तुम्ही अण्णा भाऊ साठेंचं नाव घेता. तुमच्या पक्षाच्या अध्यक्षांनी कधी अण्णा भाऊ साठेंच्या फोटोला हार घातला का? हार घातल्याचा एखादा फोटो दाखवू शकता का? आम्हाला या भानगडीत तुम्ही खेचू शकत नाहीत. अण्णा भाऊ साठे आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. वाटेगावात जाऊन पाहा. इतिहासात कुणी एवढा पुतळा बसवला नसेल, एवढा मोठा पुतळा बसवण्यात येणार आहे. त्यासाठी 50 कोटी रुपये मंजूर केले आहेत. पाच एकरमध्ये त्यांचं मोठं स्मारक करत आहोत. आम्हाला अण्णा भाऊ सांगता? महाडला जाऊन बघा. चवदार तळ्याचं सुशोभिकरण करतोय, त्यासाठी 90 कोटी खर्च करतोय. डोळे उघडे ठेवा. फोटोचा वापर केवळ राजकारणासाठी करू नका. मजबुरी म्हणून तुम्हाला फोटो ठेवावा लागतो, असा हल्लाच शिरसाट यांनी चढवला.
कोणता बौद्ध मंत्री केला?
बरं झालं उद्धव ठाकरेंनी यांना मंत्री केलं नाही, असं राऊत म्हणाले होते. राऊत यांच्या या विधानाचाही त्यांनी समाचार घेतला. उद्धव ठाकरेंना हे माहीत होतं आमच्याकडे पैसे नाहीत, म्हणूनच आम्हाला मंत्री केलं नाही. अपक्ष आमदार शंकर गडाख यांचा पक्षाशी संबंध नव्हता, त्यांना एका दिवसात कॅबिनेट मंत्री करण्यात आलं. त्यांचं असं कोणतं योगदान पक्षासाठी होतं? आपली चांडाळ चौकडी कशी मंत्रिमंडळात येईल हेच उद्धव ठाकरेंनी पाहिलं. अनिल परब आणि सुभाष देसाई यांना मंत्रिमंडळात घेतलं. मलिदा कसा खायचा हेच लक्ष्य होतं. मातोश्रीचा मागचा दरवाजा कशासाठी होता? हे सांगायला लावू नका. मागच्या दारातून कसे टेम्पो आत यायचे? आमच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करता? एक तर आमच्याकडे पैसा नाही. दुसरी आमची जात आडवी येते. तुमच्या मंत्रिमंडळाचा कोणता दलित मंत्री होता? सांगा नाव. सांगा बौद्ध समाजाचा कोणता मंत्री होता? अगदी 1995च्या सत्तेतील एखाद्या दलित मंत्र्याचं नाव सांगा? आता अडीच वर्ष तुम्ही सत्तेत होता. कोणता दलित मंत्री केला? नाव सांगता येईल का? तुम्ही दलितांचा कळवळा करता. तुम्हाला माझा राजीनामा खाऊ वाटला का? असा सवाल त्यांनी केला.
जे तुम्हाला जमलं नाही…
जे तुमच्याकडून जमलं नाही. ते मी करत आहे. मी दलित विद्यार्थ्यांच्या हॉस्टेलसाठी 1200 कोटी ठेवले आहेत. साडे चौदा कोटी रुपये वामनदादा कर्डक यांच्या स्मारकासाठी ठेवले आहेत. आताच बौद्ध गयेला गेलो जाऊन आलो. माझी पत्नी लिलावतीत अॅडमिट असताना गेलो. तिथे 10 एकर जागेची मागणी केली. मुख्यमंत्र्यांशी डायरेक्ट बोलणं करून दिलं. कर्मचाऱ्यांची पगारवाढ केली. प्रमोशन केलं. तुम्हाला माझ्या कामांची बरोबरी करता येणारच नाही, असा दावाही त्यांनी केला.
कुठच्या कुठे लटकवून टाकेन
मला दोन वर्ष झाली मंत्री होऊन झाली आहेत. या दोन वर्षात एकही 25 कोटीचं प्रपोजल केल्याचं दाखवून द्या. पुरावा आहे ना. दाखवून द्या. 25 कोटींची प्रपोजल मंजूर केली असती तर किती खाल्ले असते? सरकारचा पैसा हा जनतेचा पैसा आहे. त्याचा असा वापर करू देणार नाही. ज्याच्यासाठी ट्विट केलं त्याची पार्श्वभूमी तर बघा. लातूरच्या एखाद्या कार्यकर्त्यााला तरी विचारावं त्याच्याबद्दल. मला त्याच्याशी घेणंदेणं नाही. पण मला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला तर मी कुठच्या कुठे लटकवून टाकेन, असा इशाराच त्यांनी दिला.
