पुण्यात पत्नी पराभूत झाल्याने सरपंचाच्या पतीची हत्या

पुण्यात पत्नी पराभूत झाल्याने सरपंचाच्या पतीची हत्या

पुणे : सरपंच पदाच्या निवडणुकीत पत्नीचा पराभव झाल्याने महिला सरपंचाच्या पतीची कारने धडक देऊन हत्या करण्यात आली. पुण्यातील आंबेगाव खुर्द येथे 13 मार्च रोजी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली होती. बाळासाहेब सोपान वनशिव (52) असं हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. अपघाताजवळील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी माजी उपसरपंच अविनाश कैलास कांबळे (39) आणि नितीश कैलास थोपटे (30) यांना अटक केली.

मयत बाळासाहेब वनशिव हे नऱ्हे ग्रामपंचायतीच्या सरपंच मिनाक्षी वनशिव यांचे पती आहेत. 13 मार्च रोजी बाळासाहेब वनशिव हे प्रकाश टिळेकर या मित्रासोबत पहाटे पाच वाजता फिरायला गेले होते. मुंबई -बंगळुरु महामार्गालगतच्या सर्व्हिस रोडने ते जात असताना एका पांढऱ्या रंगाच्या कारने त्यांना जोरात धडक दिली आणि वेगाने निघून गेली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या बाळासाहेब वनशिव यांना भारती हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. रविवारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

याप्रकरणी बाळासाहेब वनशिव यांच्या पत्नी सरपंच मिनाक्षी वनशिव यांनी पोलिसात तक्रार देताना अविनाश कांबळे यांच्यावर संशय व्यक्त केला होता़. त्यानंतर पोलिसांनी अपघातस्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे वरील दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केल्यावर त्यांनी गुन्हा कबुल केला.

मयत बाळासाहेब वनशिव यांच्या पत्नी मीनाक्षी यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत अविनाश कांबळे यांच्या पत्नी रेश्मा कांबळे यांचा पराभव केला होता. याच रागातून अविनाश कांबळे याने बाळासाहेब वनशिव यांच्या अंगावर गाडी घालून अपघाताचा बनाव करुन ठार मारले. भारती विद्यापीठ पोलिसांनी याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे़.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI