घरटं चोरून नेणाऱ्यांनो, उमेद कशी चोराल?; राष्ट्रवादीने काळजालाच हात घातला
अजितदादा गटाचे नेते सुनील तटकरे यांनी निवडणूक आयोगाच्या निकालावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सत्याचा विजय! लोकशाहीचा विजय!, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाचे स्वागत केले आहे. 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष' नाव व 'घड्याळ' चिन्ह हे दोन्ही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे राखून ठेवल्याबद्दल निवडणूक आयोगाचे सुनिल तटकरे यांनी आभार मानतानाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी व नेत्यांचे ट्वीट करत मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.

मुंबई | 6 फेब्रुवारी 2024 : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हातून पक्ष आणि चिन्ह गेला आहे. निवडणूक आयोगाने अजित पवार गटाकडे राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह दिलं आहे. हा शरद पवार गटासाठी मोठा झटका मानला जात आहे. या निर्णयानंतर शरद पवार गटात एकच खळबळ उडाली असून शरद पवार गटाकडून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. अदृश्य शक्तीने हा निकाल दिल्याचा आरोप शरद पवार गटाकडून केला जात आहे. पवार गटाने थेट अजित पवार यांच्यावरही हल्ला चढवला आहे. घरटं चोरून नेणाऱ्यांनो, उमेद कशी चोराल? असा सवाल शरद पवार गटाने केला आहे. एका कवितेच्या माध्यमातून शरद पवार गटाने हा सवाल केला आहे.
शरद पवार गटाने राष्ट्रवादीच्या ट्विर हँडलवरून एक व्हिडीओ ट्विट करण्यात आला आहे. त्यात एका तरुणाची कविता आहे. घरटं चोरून नेणाऱ्यांनो, उमेद कशी चोराल? असा सवाल या कवितेतून करण्यात आला आहे. हीच कविता शरद पवार गटाने ट्विट करून अजितदादा गटावर निशाणा साधला आहे. हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.
म्हणूनच ते आमचे साहेब आहेत
पवार गटाने आणखी एक व्हिडीओ ट्विट केला आहे. शरद पवार यांच्या भाषणाचा हा व्हिडीओ आहे. त्यावर राष्ट्रवादीने एक पोस्ट लिहिली आहे. 2022च्या व्हिडिओत साहेबांचं जे म्हणणं आहे ते आजही तंतोतंत तसंच आहे. कारण, त्यानंतर अनेक राजकीय वादळं आली तरीही हा मनुष्य खचत नाही, साहेबांची इच्छाशक्ती अजूनही प्रचंड आहे. कोणत्याही संकटाला ते आजही निधड्या छातीने सामोरं जातात, म्हणूनच ते आमचे साहेब आहेत!!, असं ट्विट त्यांनी केलं आहे.
घरटं चोरून नेणाऱ्यांनो, उमेद कशी चोराल?
काही कविता चांगल्या माणसांसारख्या असतात, कठीण काळात उभारी देणाऱ्या..!
सौजन्य – अनिकेत म्हस्के pic.twitter.com/dLOS6YAQDo
— NCP (@NCPspeaks) February 6, 2024
देवळाची जागा कुणाला जरी मिळाली
राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला दिल्यानंतर ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. शरद पवार यांना धक्का वगैरे काही वाटत नाही. देवळाची जागा कुणाला जरी मिळाली तरी आतल्या मूर्तीच अधिष्ठान हे भक्तांच्या ठाई असतं. त्याच पद्धतीने शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल ह्या दोन्हीही पक्षाचे अधिष्ठान किंवा अस्तित्व हे निवडणूक आयोगाच्या निकालावर अवलंबून नाही. पक्ष वाढवला, घडवला त्या गाव खेड्यातील कार्यकर्ते शिवसैनिकांच्या अधिष्ठानावर जास्त अवलंबून आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी ह्या दोन्हीही पक्षाचे कार्यकर्ते उद्धव साहेब आणि शरद पवार साहेब यांच्या सोबत आहेत, असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे.
