शरद पवार राजकारणातून निवृत्ती घेणार? संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया काय?
शरद पवार यांच्या निवृत्तीच्या चर्चांना संजय राऊत यांनी पूर्णविराम दिला आहे. पवार 'INDIA' आघाडीसोबतच राहतील, असे राऊत यांनी स्पष्ट केले. पवार फुले, शाहू, आंबेडकरांचे विचार सोडणार नाहीत. भाजपनेच पक्ष फोडल्याचा आरोप करत, 'INDIA' आघाडीच्या एकजुटीवर त्यांनी भर दिला. सुप्रिया सुळे देखील 'INDIA' सोबतच असल्याची ग्वाही राऊत यांनी दिली.

ज्येष्ठ नेते शरद पवार हे राजकारणातून निवृत्ती घेणार आहेत. त्यानंतर पवारांच्या नेतृत्त्वातील राष्ट्रवादी एनडीएसोबत घरोबा करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यामुळे पवार खरोखरच राजकारणातून निवृत्ती घेणार का? यावर उलटसुलट चर्चा सुरू आहेत. आता त्यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार हे कुठेही जाणार नाहीत. ते इंडिया आघाडीत आहेत आणि इंडिया आघाडीसोबतच राहतील. फुले, शाहू आणि आंबेडकरांचा विचार शरद पवार सोडणार नाहीत, असा दावा संजय राऊत यांनी मीडियाशी बोलताना केला आहे.
शरद पवार यांचं संपूर्ण राजकारण धर्मांध शक्तींविरुद्ध लढण्यात आणि काम करण्यात गेलं आहे. यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर शरद पवार यांनी फुले शाहू आंबेडकरांचा विचार जिवंत ठेवण्याचं काम केलं. शरद पवार यांच्या कुटुंबातील आणि पक्षातील वारसदारांनी या गोष्टीचं भान ठेवलं पाहिजे. आम्हीही यशवंतराव चव्हाण आणि प्रबोधनकार ठाकरेंचा विचार मांडत असतो. पण सत्तेत जाण्याची काही लोकांना घाई झाली असेल आणि सत्तेसाठी विचार गुंडाळला जात असेल तर ते योग्य नाही. त्यामुळे पवारांचा विचार प्रवाह गढूळ होईल. पवार अशी भूमिका घेतील असं वाटत नाही. प्रत्येत राजकीय पक्षात दोन प्रवाह असतात. तसा त्यांच्या पक्षातही असेल, असं संजय राऊत म्हणाले.
तुम्ही त्यांचा पक्ष फोडला
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पवारांना आराम करण्याचा सल्ला दिला होता. त्यावरही राऊत यांनी टीका केली. तुम्ही आता आराम करा, तुमचा पक्ष फोडून आम्ही तुम्हाला घरी बसवलं आहे, असंच मोदींना म्हणायचं आहे. अडचणीच्या काळात पवारांनी तुम्हाला मदत केली. संरक्षण दिलं आणि तुम्ही त्यांचा पक्ष फोडला. घर फोडलं. बाळासाहेब ठाकरेंनी मोदींचं मुख्यमंत्रीपद वाचवलं, शाहांना तुरुंगात जाण्यापासून वाचवलं. पण भाजपने त्यांचाच पक्ष फोडला, अशी टीका राऊत यांनी केली.
सुप्रिया सुळे वेगळी भूमिका घेणार नाही
मोदींना देश सांभाळता येत नाही. म्हणून लोक रस्त्यावर उतरले आहेत. सुप्रिया सुळेही मोदीं विरोधात लढत आहेत. त्यामुळे सुप्रिया सुळे वेगळी भूमिका घेतील असं वाटत नाही. सुप्रिया सुळेही फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचार घेऊन पुढे जात आहेत, असा दावा त्यांनी केला.
वेगळा निर्णय कसा घेऊ शकतो?
सुप्रिया सुळे यांनी डीलिमिटेशनबाबत वेगळी भूमिका घेतली आहे, याकडेही राऊत यांचं लक्ष वेधण्यात आलं. त्यावरही त्यांनी रोखठोख भाष्य केलं. इंडिया ब्लॉक म्हणूनच डीलिमिटेशनचा निर्णय होईल. हा सामुदायिक निर्णय असेल. इंडिया ब्लॉक डीलिमिटेशनबाबत जो निर्णय घेईल, तो आम्हाला बंधनकारक आहे. आम्ही वैयक्तिक निर्णय घेणार नाही. आम्ही इंडिया आघाडीत आहोत. त्यामुळे वेगळा निर्णय कसा घेऊ शकतो? असा सवाल त्यांनी केला.
बाहेरून मुलं होत नाहीत
पवार विधेयकाल पाठिंबा देतील, पण इंडिया आघाडीतच राहतील, अशी चर्चा आहे. त्यावरही राऊत यांनी थेट प्रतिक्रिया दिली. विधेयकाला पाठिंबा द्यायचा आणि एनडीएत जायचं नाही असं होत नाही. बाहेरून पाठिंबा दिल्याने मुलं होत नाहीत. लग्न करावं लागतं किंवा घटस्फोट होतो, असं सूचक विधानच त्यांनी केलं.