उत्तर प्रदेशात 403 ऐवजी 100 जागा लढवणार, 24 तासात शिवसेना बॅकफूटवर; महाराष्ट्र आणि उत्तरप्रदेशच्या सेना नेत्यांमध्ये संभ्रम?

उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत 80 ते 100 जागा लढवणार असल्याचं शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज जाहीर केलं आहे. दोन दिवसांपूर्वीच उत्तर प्रदेश शिवसेना राज्य कार्यकारिणीची बैठक झाली. (Shiv Sena)

उत्तर प्रदेशात 403 ऐवजी 100 जागा लढवणार, 24 तासात शिवसेना बॅकफूटवर; महाराष्ट्र आणि उत्तरप्रदेशच्या सेना नेत्यांमध्ये संभ्रम?
uddhav thackeray

मुंबई: उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत 80 ते 100 जागा लढवणार असल्याचं शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज जाहीर केलं आहे. दोन दिवसांपूर्वीच उत्तर प्रदेश शिवसेना राज्य कार्यकारिणीची बैठक झाली. त्यात सर्वच्या सर्व 403 जागा लढवण्याचा निर्णय झाला होता. त्यानंतर अवघ्या 24 तासात शिवसेनेने निर्णय फिरवला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील शिवेसना नेते आणि उत्तर प्रदेशातील नेत्यांमध्ये जागा लढवण्यावरून संभ्रम असल्याचं बोललं जात आहे. (Shiv Sena leader confused to contest number of seats upcoming Assembly elections in Uttar Pradesh?)

राऊत नेमकं काय म्हणाले?

गोव्यात शिवसेनेच्या स्थानिक युनिटने गेल्या पाच वर्षापासून काम सुरू केलं आहे. त्यामुळे आम्ही गोव्यात 20 ते 21 जागा लढवणार आहोत. तसेच उत्तर प्रदेशातही आम्ही 80 ते 100 जागा लढवू, असं सांगतानाच गोव्यात महाविकास आघाडी सारखा प्रयोग करू शकतो. गोव्याच्या आघाडीत योग्य स्थान मिळालं तर आम्ही आघाडीत जाऊ शकतो. उत्तर प्रदेशातही काही शेतकरी संघटना आहेत. या संघटना आमच्या सोबत यायला तयार आहेत. खासकरून पश्चिमी उत्तर प्रदेशमधील शेतकरी संघटनांनी आम्हाला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशातही आघाडीचा प्रयोग होऊ शकतो, असं राऊत यांनी सांगितलं. गोवा आणि उत्तर प्रदेशात युती झाली नाही तर आम्ही एकटे लढू, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

कार्यकारिणीत काय निर्णय झाला?

शिवसेनेच्या उत्तर प्रदेश राज्य कार्यकारिणीची 10 सप्टेंबर रोजी बैठक झाली. यावेळी राज्यातील विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली. त्यानंतर भाजपला धडा शिकवण्यासाठी राज्यातील सर्वच्या सर्व 403 जागांवर उमेदवार देण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. शिवसेनेचे प्रदेशाध्यक्ष ठाकूर अनिल सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा ठराव मंजूर करण्यात आला.

शिवसेनेची हुलबाजी

दरम्यान, शिवसेना नेहमीच उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी किती जागा लढवणार याचा आकडा फुगवून सांगत असते. मात्र, प्रत्यक्षात निवडणूक लढवण्याची वेळ येते तेव्हा 100च्या आतच जागा लढवत असते. त्यामुळे शिवसेना ज्या घोषणा करते त्यात नवीन काही नाही, असं सूत्रांनी सांगितलं.

56 जागांवर डिपॉझिट जप्त

2017मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने 57 जागांवर उमेदवार दिले होते. त्यापैकी 56 जागांवर शिवसेना उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले होते. केवळ एकाच जागेवर शिवसेनेला बऱ्यापैकी मते मिळाली होती. शिवसेनेला राज्यात जनाधार नसला तरी शिवसेनेची उत्तर प्रदेशात नेहमीच चर्चा होते, असंही सूत्रांनी सांगितलं.

लाखाच्या आत

2017च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने 57 उमेदवार दिले होते. या सर्व उमेदवारांना मिळून 88 हजार 595 मते मिळाली होती. तर 43 मतदारसंघात शिवसेना उमेदवारांना एक हजाराहून कमी मतदान झालं होतं. काही ठिकाणी तर शिवसेनेच्या उमेदवारांना 200 मते मिळवितानाही नाकीनऊ आले होते.

दोन जागांची चर्चा

उत्तर प्रदेशातील गोंडा विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे महेश तिवारी यांनी 35 हजार 606 मते मिळवली होती. ते चौथ्या क्रमांकावर होते. तर बदायू विधानसभा मतदारसंघात शिवसेना उमेदवाराला 14 हजार 576 मते मिळाली होती. त्यामुळे शिवसेनेचं या दोन जागांवर या निवडणुकीत अधिक लक्ष राहणार असल्याचं सांगितलं जात आहे. (Shiv Sena leader confused to contest number of seats upcoming Assembly elections in Uttar Pradesh?)

 

संबंधित बातम्या:

गोवा, उत्तर प्रदेशात मविआचा प्रयोग; गोव्यात 20 तर उत्तर प्रदेशात 100 जागा लढवणार; संजय राऊत यांची घोषणा

VIDEO: शरद पवारांनी काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्रं यावं; बाळासाहेब थोरातांचं पहिल्यांदाच खुलं आवतन

ओबीसींना आरक्षण न मिळण्यास भाजपच जबाबदार, केंद्राने इम्पिरिकल डेटा द्यावा; नाना पटोले यांची मागणी

(Shiv Sena leader confused to contest number of seats upcoming Assembly elections in Uttar Pradesh?)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI