मराठा मोर्चाचा व्हिडिओ ट्विट; संजय राऊत संभाजी छत्रपतींना म्हणाले, कुठे भाजपच्या नादाला…

| Updated on: Dec 19, 2022 | 11:06 AM

राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. इतर संघटनांना हाताशी पकडून, काही लोकांना जवळ घेऊन गुन्हे दाखल करणं हे भाजपचं कामच आहे.

मराठा मोर्चाचा व्हिडिओ ट्विट; संजय राऊत संभाजी छत्रपतींना म्हणाले, कुठे भाजपच्या नादाला...
मराठा समाजाचा व्हिडिओ ट्विट; संजय राऊत संभाजी छत्रपतींना म्हणाले, कुठे भाजपच्या नादाला...
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

निखिल चव्हाण, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई: ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी महामोर्चा म्हणून मराठा मोर्चाचा व्हिडीओ ट्विट केल्याने त्यावरून मराठा समाज आक्रमक झाला आहे. माजी खासदार संभाजी छत्रपती यांनी या व्हिडीओवरून राऊतांना फटकारलं असून संभाजी छत्रपती यांच्या स्वराज्य संघटनांनी राऊतांच्या विरोधात जोरदार आंदोलन केलं आहे. भाजपनेही या व्हिडीओवरून राऊतांना घेरलं आहे. या व्हिडीओवरून चोहोबाजूने टीका झाल्यानंतर राऊत यांनी त्याला आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मी व्हिडीओ ट्विट केला. पण तो व्हिडीओ कालच्या मोर्चाचा आहे, असं मी कुठं म्हणालो? मी कुठे दावा केलाय? असा सवाल करतानाच संभाजी छत्रपती तुम्ही कुटे भाजपच्या नादाला लागताय? असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

तुम्ही तो व्हिडिओ पाहिला असेलच. मी तरी कुठं म्हटलं तो महाविकास आघाडीचा मोर्चा आहे. पाहा ना तुम्ही. तुम्ही तो व्हिडीओ काळजीपूर्वक पाहा. हा महाविकास आघाडीचा कालचा मोर्चा आहे असा मी दावा कधीच केला नाही, असं संजय राऊत म्हणाले.

हे सुद्धा वाचा

मराठा मोचालाही हे लोकं नॅनो मोर्चा, नॅनो मोर्चा म्हणत होते. तो प्रचंड मोर्चा सुद्धा याच रस्त्यावरून गेला. मी कोणत्याही व्हिडीओत म्हटलं नाही हा महाविकास आघाडीचा मोर्चा आहे. महाविकास आघाडीच्या मोर्चाचे इतर व्हिडिओ मी टाकले आहेत.

दोन्ही मोर्चे ताकदीचे आहेत. दोन्ही मोर्चे न्याय हक्कासाठी होते. दोन्ही मोर्चे महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठीचे होते. मराठा मोर्चात जे सामील झाले होते, ते सुद्धा मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीच्या मोर्चात सामील झाले होते. त्यात भाजपला इतकं कळवळून टीका करण्याचं कारण नाही, असा चिमटा त्यांनी काढला.

मराठा मोर्चाही विराट झाला होता. कालचा महाविकास आघाडीचा मोर्चा अतिविराट निघाला आहे. मोठे मोर्चे निघाले तर त्याला नॅनो मोर्चा म्हणायचं ही भाजपची प्रथा आहे. त्यावरची ही टीका आहे. मी कुठं म्हटलं आमचा मोर्चा आहे. न बघता टीका करायची आणि आयटी डिपार्टमेंटला कामाला लावायचं हे भाजपचं कामच आहे, अशी टीका त्यांनी केली.

हा आमचा मोर्चा आहे, महाविकास आघाडीचा मोर्चा आहे असं म्हणालो असतो तर टीकेला वाव होता. तरीही मी परत म्हणतो तोही मोर्चा आमचाच होता. महाराष्ट्राचाच होता. त्या मोर्चानेही महाराष्ट्राची शक्ती दिल्लीला दाखवली. कालच्या मोर्चानेही शक्ती दिल्लीला दाखवली, असं राऊत म्हणाले.

माझ्यावर टीका करत असेल तर त्यांनी शिवाजी महाराजांच्या अपमानावर बोलावं. संभाजी छत्रपती प्रगल्भ नेते आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानावरती आपण बोलत आहोत. भाजपच्या नादाला कुठे लागले?

आपला मोर्चा की तुमचा मोर्चा? आमचा मोर्चा मोठा की तुमचा मोर्चा? सर्व मोर्चे आपलेच आहेत. महाराजांच्या अपमनाच्या विषयावर आपण उभे आहोत ना? त्यावर बोलू. इतकच मी राजेंना आवाहन करतो, असंही ते म्हणाले.

राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. इतर संघटनांना हाताशी पकडून, काही लोकांना जवळ घेऊन गुन्हे दाखल करणं हे भाजपचं कामच आहे. आमच्या लोकांवर गुन्हे दाखल करायचे आणि त्यांच्या लोकांना क्लिनचिट द्यायची असा नवीन कारखाना, नॅनो कारखाना त्यांनी काढला आहे. काढू द्या, असंही ते म्हणाले.