पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूरवरुन संजय राऊत यांनी नरेंद्र मोदी यांना घेरले
शिवसेना उबाठा नेते संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घेरले आहे. पहलगाम हल्ला करणारे दहशतवादी सापडत नाही, ऑपरेशन सिंदूरमध्ये यश मिळाले असताना शस्त्रसंधी करण्यात आली, त्यासाठी अमेरिकेचा दबाव होता, असा आरोप राऊत यांनी केला.

शिवसेना उबाठा नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी अजूनही मिळाले नाही. दुसरीकडे ऑपरेशन सिंदूरवरुन राजकारण केले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणालाच विश्वासात घेत नाहीत, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
नीती आयोगाची बैठक रविवारी झाली. त्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना संजय राऊत म्हणाले, स्वतः पंतप्रधान टीम इंडिया म्हणून काम करत नाहीत. ते भारताला विश्वासात घेत नाहीत. भाजपशासित राज्यातील मुख्यमंत्र्यांनाही विश्वासात घेत नाहीत. प्रमुख विरोधी पक्षनेत्यांनाही विश्वासात घेत नाहीत. आता तर त्यांनी पहलगाम हल्ल्याचे राजकारण सुरू केले. नीती आयोगाच्या बैठकीत सुद्धा ऑपरेशन सिंदूरबद्दल चर्चा होते. दुसरीकडे आम्हाला पहेलगाम हल्ल्याचे राजकारण करू नका, असा सल्ला देतात. मोदी यांचे लष्करी गणवेशातील होर्डिंग, फोटो वापरुन राजकारण होत आहे, असा आरोप राऊत यांनी केला.
पहलगाम हल्ला करणारे दहशतवादी गायब झाले आहे. त्यांचा शोध लागला नाही. अमेरिकन अध्यक्षच्या दबावाखाली शस्त्रसंधी करण्यात आली. यापूर्वी घडलेल्या पुलवामा घटनेतील दहशतवादीसुद्धा सापडले नाही. परंतु त्या घटनेचे राजकारण केले गेले. आता पहलगाममध्ये देखील असेच घडले आहे. त्याच्यामागे देखील राजकारण किंवा कारस्थान आहे, असा संशय असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले.
तुम्ही तिन्ही सेनादलांना या युद्धातून माघार घेण्यास भाग पाडले. युद्ध जिंकत असताना माघार घेतली गेली. तुम्ही आमच्या २६ महिलांच्या कुंकवाचा अपमान करत आहात. या प्रकरणात अमित शाह यांचा राजीनामा मागायला हवा. त्यांच्या अपयशामुळेच ही वेळ आली आहे, असा आरोप राऊत यांनी अमित शाह यांच्यावर केला.
राज ठाकरेंसोबत युती होणारच
राज ठाकरे यांच्या युतीसंदर्भात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी स्वतः सांगितले आहे. आम्ही मतभेद संपवून टाकणार आहोत. त्यानंतर आदित्य ठाकरे हे देखील म्हणतात की, आम्ही युतीसाठी तयार आहोत. महाराष्ट्र आणि मराठी माणूस संकटात आहे. प्रत्येक क्षेत्रातील मराठी माणसाला वाटले पाहिजे की मराठी माणूस एकत्र यायला पाहिजे. आम्ही भूतकाळात डोकावत नाहीत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा भूतकाळ आमच्या सोबत चांगला नव्हता. पण आम्ही सरकार चालवले. भविष्याच्या विचार करत आम्ही एकत्र आलो. राज ठाकरे आणि यांच्या पक्षानेही भूतकाळातून बाहेर येणे आणि भविष्याचा विचार करणे गरजेचे आहे. आम्ही त्या दृष्टिकोनातून पाऊले टाकली आहेत, असे राऊत सांगितले.
दोन्ही भाऊ एकत्र येत असतील तर त्याचे स्वागतच आहे, असे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले. त्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, सुधीर मुनगंटीवार एक प्रगल्भ राजकारणी आहेत. सुधीरभाऊ यांनी मनाची इच्छा व्यक्त केली. प्रत्येक मराठी माणसाची तीच भावना आहे. आमच्या पक्षांमध्ये या विषयावर मतभेद नाही. आम्हाला सकारात्मक पावले टाकायची आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले.
