
Shivraj Patil Chakurkar Passed Away: राजकारणात समाजवादी, उजवे, डावे, शेतकरी-कामगार वर्गाचे प्रतिनिधीत्व करणारे अनेक पक्ष आणि नेते होते. पण सुसंस्कृतपणा आणि शालीनता हे या राजकारण्यांचा मुख्य स्वभाग गुण होता. शिवराज पाटील चाकुरकर हे या पिढीतील नेते होते. त्यांच्या निधनामुळे त्यांचे चाहते, कार्यकर्त्यांना अनेक गोष्टींची यानिमित्ताने आठवण होत आहे. त्यांच्या राजबिंड व्यक्तिमत्वाला या शालिनतेचा साज होता. पण मुंबईतील 26/11 दहशतवादी हल्ला झाला. त्यावेळी एक चूक त्यांना महागात पडली आणि ते झटदिशी राजकारणाच्या मुख्य प्रवाहातून बाजूला फेकले गेले. हा किस्सा कित्येक वर्ष आत्ताचे सत्ताधारी आणि तत्कालीन विरोधक शस्त्रासारखा वापरत होते. या एका गडबडीमुळे एक मराठी माणूस पंतप्रधान पदाच्या शर्यतीतून आपसूकच बाहेर गेला. काय होती ती चूक?
कपडे बदलण्याचा वाद
26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. मुंबईत तीन दिवस दहशतवाद्यांचा हैदोस सुरू होता. त्यावेळी शिवराज पाटील हे केंद्रीय गृहमंत्री होते. त्यावेळी पाटील यांच्यावर हल्ला झालेला असतानाही हे सारखे कपडे बदलत असल्याचा आरोप झाला. त्यांनी दिवसभरात किती वेळा ड्रेस बदलला. ते सीरीयल ड्रेस चेंजर असल्याची टीका त्यावेळी झाली. त्यांना विरोधकांनी निरो म्हटले. रोम जळत असताना निरो हा बासरी वाजवत बसल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. त्यानंतर त्यांना पदावरून पाय उतार व्हावे लागले आणि ही एक चूक त्यांना राजकारणात महाग पडली. ते पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून ओळखले जात होते. पण एकाच दिवशी त्यांनी अनेकदा कपडे बदलल्याचा वाद पेटला आणि ते या शर्यतीतूनच बाद झाले. पुढे ते राजकारणातही फारसे सक्रीय राहिले नाही.
काँग्रेसमध्ये तळागाळातून मिळवले मोठे पद
शिवराज पाटील यांनी कायद्याचे शिक्षण घेतले आणि ते राजकारणाकडे वळाले. ते लातूरचे नगराध्यक्ष होते. त्यावेळी त्यांनी येथील शैक्षणिक आणि इतर क्षेत्रात चांगला ठसा उमटवला. ते एक शालीन सुसंस्कृत पिढीतील नेते होते. व्यर्थ बडबड करणे, नाहक टीका करणे ते नेहमी टाळत. राजकीय मूल्य जपण्यात त्यांची हयात गेली. काँग्रेसच नाही तर विरोधकांमध्ये पण त्यांचे मित्र होते. राजकीय टीका टिप्पणी होत असली तरी या मैत्रीत कधी अंतर आले नाही. त्यांनी टाऊन हॉलमध्ये ग्रंथालय उभारले. त्यावेळी लातूरमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरलं. त्यावेळी अनेक दिग्गजांनी या ग्रंथालयाला आवर्जून भेट दिली.
पंतप्रधान पदाचे दावेदार
लातूर लोकसभा मतदारसंघातून ते 1980 ते 1999 या कालावधीत सलग सातवेळा निवडून गेले. 2004 मध्ये त्यांचा पराभव झाला. पराभव झाला असला तरी त्यांना काँग्रेसने राज्यसभेवर घेतले. त्यांना देशाचं गृहमंत्रिपद दिले. पुढे त्यांच्यावर पंजाबचे राज्यपाल म्हणूनही जबाबदारी देण्यात आली. ते काही काळ लोकसभेचे अध्यक्षही राहिले. त्यांनी मंत्रिमंडळात विविध खात्याचं काम पाहिले. ते पंतप्रधान पदाच्या प्रमुख दावेदारांपैकी एक होते.