
Shivsena-BJP Mahayuti: सत्तेत एकमेकांच्या गळ्यात गळे असणारे भाजप आणि शिवसेनेने महापालिकेत मात्र एकमेकांविरोधात शड्डू ठोकला आहे. स्थानिक नेतृत्वात जागा वाटपावरून चांगलेच बिनसल्याने राज्यातील 10 महापालिकेत महायुती फिसकटली आहे. दोन्ही पक्षातील नेत्यांचा नगरपालिका- नगरपरिषदांच्या निकालांमुळे खुमखुमी आल्याचा एकमेकांवर जळजळीत आरोप आहे. सत्तेतील मित्र आता महापालिका निवडणुकीत शत्रू ठरले आहेत. मैत्रिपूर्ण लढतीची सुद्धा या ठिकाणी आशा उरलेली नाही. नवी मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर पाठापोठा, अमरावती, नांदेडमध्ये सुद्धा जागा वाटपासाठीच्या जोर बैठका कामी आल्या नाहीत. कोण कोणत्या ठिकाणी दोन्ही पक्षाचं फाटलं, त्यावर एक नजर टाकुयात.
छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीत दोन्ही गट आक्रमक
छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन्ही पक्षांमध्ये बैठकांच्या दहा फेऱ्या झाल्या. जागा वाटपावर एकमत होईल असे वाटत असतानाच आज सकाळी भाजप आणि शिवसेनेत बिनसल्याची वार्ता येऊन धडकली. शिंदे सेनेने भाजपवर विश्वासघात केल्याचा आरोप केला. अंधारात ठेऊन एबी फॉर्म वाटपाचा आरोप केला. तर दुसरीकडे शिवसेनेमुळे युती तुटल्याचा दावा मंत्री अतुल सावे यांनी केला. युती तुटण्याचे खापर दोन्ही पक्षांनी एकमेकांवर फोडले.
अमरावतीत स्वबळाचा नारा
अमरावतीत शिवसेना शिंदे गट स्वबळावर निवडणूक लढवणार आहे. सर्व 87 जागेसाठी एबी फॉर्म वाटप करणे सुरू केले आहे. आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने घडामोडींना वेग आला आहे.एबी फॉर्म घेण्यासाठी इच्छुकांची गर्दी दिसून येत आहे. अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये सन्मानजगक जागा न मिळाल्याने शिवसेना शिंदे गट महायुती मधून बाहेर पडला आहे. आता संपूर्ण 87 जागा शिवसेना शिंदे गट स्वबळावर निवडणूक लढत आहे.. त्यासाठी माजी आमदार शिवसेना नेते अभिजीत अडसूळ हे उमेदवारांना एबी फॉर्म वाटप करत आहे. त्यासाठी इच्छुकांनी मोठी गर्दी केली आहे.
पुण्यातही महायुती फिसकटली
पुण्यात सर्वात मोठा ड्रामा पाहायला मिळाला. अजितदादांना दूर लोटून भाजप आणि शिंदे सेना महायुती करण्यासाठी आणि एकत्रपणे महापालिका निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी तयार होते. दोन्ही पक्षांमध्ये जागा वाटपासंदर्भात बैठका झाल्या. पण अनेक ठिकाणी शिंदे सेनेला पडती बाजू घ्यावी लागत असल्याने गेल्या शुक्रवारपासून शिंदेसैनिक नाराज दिसले. त्यांनी निलम गोऱ्हे यांच्यासमोर नाराजी बोलून दाखवली. शेवटचा पर्याय म्हणून आज सकाळी उद्योगमंत्री उदय सामंत पुण्यात दाखल झाले. तोडगा निघण्याची शक्यता बळावली. पण अखेर महायुतीला गालबोट लागले. आता दोन्ही पक्ष एकमेकांविरोधात उभे ठाकणार आहेत. भाजप शिवसेनेचे युती तुटल्याच जाहीर करण्यात आलं. शिवसेनेचे पुणे शहर अध्यक्ष नाना भानगिरे आणि रविंद्र धंगेकर यांनी युती तुटल्याचे जाहीर केलं. पुणे महापालिका निवडणुकीत 165 जागा लढणार असल्याची माहिती दिली.
पिंपरीत युती अन आघाडीची घोषणा अजून ही रखडली
पिंपरी चिंचवड मध्ये भाजप आणि आरपीआय आठवले गटासोबत शिंदे शिवसेनेच्या युतीची घोषणाचं लांबली आहे. अर्ज भरायला अवघे काही तास उरलेत तरी आम्ही लवकरचं युती जाहीर करु,असं दोन्ही बाजूंचे नेते सांगतायेत.एका जागेवर मोठा तिढा सुरुये, तो सोडवतोय, असं कारण भाजपकडून पुढं केलं जातंय. दुसरीकडे ठाकरे सेना, मनसे आणि काँग्रेसची ही तीच अवस्था आहे. एकमेकांसमोर आपले उमेदवार येणार नाहीत, याची काळजी घेऊन आम्ही एबी फॉर्मचं वाटप करतोय. लवकरचं एकत्र पत्रकार परिषद घेऊन आम्ही आघाडीवर शिक्कामोर्तब करू, असं मविआकडून सांगितलं जातंय.तीन वाजता अर्ज भरण्याची मुदत संपणार असताना चित्र स्पष्ट होत नसल्यानं, उमेदवार संभ्रमात आहेत.
नांदेडमध्ये सुद्धा महायुतीत बिनसलं
नांदेड महानगरपालिकेसाठी भाजपा -शिवसेनेची युती फिस्कटल्याच जवळपास निश्चित मानल्या जात आहे. भाजपने इथं आक्रमक होत काँग्रेसला हुडहुडी भरवली. अनेक नेते भाजपमध्ये आले. पण शिवसेनेशी दिलजमाई करण्यात अडथळे आले. नांदेड महानगरपालिका भाजप स्वतंत्र लढण्याच्या तयारीत आहे. 40 जागा शिंदे यांची शिवसेना स्वतंत्र लढणार तर 41 जागावर दादांची राष्ट्रवादी व शिंदे यांची शिवसेना सोबत लढणार असल्याची माहिती समोर येत आहे. शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांच्या दोन वेगवेगळ्या भूमिका, नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर स्वतंत्र लढणार तर नांदेड दक्षिणचे आमदार आनंद बोंढारकर व हेमंत पाटील दादांच्या राष्ट्रवादीसोबत आहेत.
महायुतीत कुठं कुठं बिनसलं
१. पुणे
२. छत्रपती संभाजीनगर
३. नाशिक
४. नांदेड
५. अमरावती
६ . मालेगाव
७. अकोला
८. मिरा-भाईंदर
९. नवी मुंबई
१०. धुळे
११ सांगली
१२ उल्हासनगर
जळगावत राष्ट्रवादी अजित पवार गट महापालिका निवडणूक स्वबळावर लढवणार
महायुतीत भाजपकडून जागा संदर्भात कुठलीही तडजोड न झाल्याने राष्ट्रवादी अजित पवार गट स्वबळावर लढणार आहे.
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अनिल पाटील यांची फोनवर बोलताना माहिती दिली. महापालिका निवडणुकीत 75 पैकी 20 ते 25 जागांवर राष्ट्रवादी अजित पवार गट स्वबळावर लढणार असल्याची माहिती आमदार अनिल पाटील यांनी दिली. अजून अर्धातास पर्यंत आम्ही महा युती बाबत वाट पाहणार,मात्र त्यांच्या कडून आता फारशी आशा उरली नसल्याने,आम्ही स्वबळावर निवडणूक लढविण्याची तयारी केली आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील यांनी दिली आहे
नाशिकमध्ये शिंदे सेना- राष्ट्रवादी एकत्र
नाशिकमध्ये शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं ठरलं आहे. शिंदेंची शिवसेना ९२ ते बी९५ जागा लढवणार तर अजित पवारांची राष्ट्रवादी २७ ते ३० जागा लढवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तर रिपब्लिकन सेनेला २ जागा दिल्या जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. नाशिकमध्ये सेना राष्ट्रवादी युतीत शिंदेंची सेना मोठा भाऊ ठरला आहे.