पेपर सुरु होण्याच्या दीड तास अगोदरच प्रश्नपत्रिका व्हॉट्सअप ग्रुपवर

पेपर सुरु होण्याच्या दीड तास अगोदरच प्रश्नपत्रिका व्हॉट्सअप ग्रुपवर

ठाणे : सध्या दहावीच्या परीक्षा सुरु आहेत. 15 मार्चला विज्ञान 1 आणि विज्ञान 2 ची प्रश्नपत्रिका फुटल्याच्या घटनेवरून गुन्हा दाखल झालेला असतानाच काल समाजशास्त्र या विषयाची प्रश्नपत्रिका परीक्षेपूर्वी सुमारे दीड तास आधीच व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून व्हायरल झाली. परीक्षा मंडळाने या तक्रारींची दखल काही घेतली नव्हती. परंतु भिवंडी तालुक्यातील काल्हेर येथील पी. डी. टावरे विद्यालयातील कर्तव्यदक्ष शिक्षिकेमुळे हा प्रकार उघडकीस आला असून सध्या नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भिवंडी शहर तसेच तालुक्यात सुमारे 45 परीक्षा केंद्रांवर सुमारे हजारो विद्यार्थी परीक्षा देत आहेत. 15 मार्चला विज्ञान 1 आणि 2 विषयाच्या प्रश्नपत्रिका फुटल्याची तक्रार करूनही मुंबई विभागीय परीक्षा मंडळ दुर्लक्ष करत असल्याची ओरड होत होती. त्यातच परीक्षा मंडळाने काल उशिरा शहर पोलीस ठाण्यात या संबंधी तक्रार दाखल केली. तर दुसऱ्याच दिवशी म्हणजे काल समाजशास्त्र विषयाची परीक्षा असताना सुमारे दीड तास आधीच या विषयाची प्रश्नपत्रिका एका व्हॉटसअप ग्रुपच्या माध्यमातून व्हायरल झाली. या बाबत माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता हा खळबळजनक प्रकार एका शिक्षिकेने उघडकीस आणला आहे.

भिवंडी तालुक्यातील काल्हेर येथील परशराम धोंडू टावरे विद्यालयात परीक्षा केंद्र आहे. त्या ठिकाणी विद्यालयाच्या प्रवेशद्वाराच्या मागील तीन ते चार दिवसांपासून काही विद्यार्थी ऐनवेळी पेपर सुरु झाल्यावर परीक्षा केंद्रात प्रवेश करत असल्याचं शिक्षकांच्या निदर्शनास येत होतं. बुधवारीही अशाच पद्धतीने प्रवेशद्वाराच्या बाहेर एका रिक्षामध्ये तीन विद्यार्थिनी मोबाईलमध्ये काहीतरी पाहत असल्याचं शिक्षिका विद्या पाटील यांच्या लक्षात आलं. त्यांनी तात्काळ त्या रिक्षाजवळ जात त्यांच्याकडील मोबाईल ताब्यात घेऊन तपासलं असता त्यामध्ये समाजशात्र विषयाच्या प्रश्नपत्रिकेचे स्क्रीनशॉट काढलेले आढळून आले.

शिक्षिकेने मोबाईल ताब्यात घेऊन ही बाब केंद्र प्रमुख मुख्याध्यापक गणेश पुंडलिक भोईर यांच्या लक्षात आणून दिल्यानंतरही परीक्षा सुरु झाल्यावर आलेल्या तीन विद्यार्थिनींची अंगझडती घेतली असता त्यांच्या मोबाईलमध्येही ती प्रश्नपत्रिका आढळून आली. मुख्याध्यापकांनी ही बाब परीक्षा मंडळाच्या निदर्शनास आणून नारपोली पोलीस ठाण्यात या विरोधात तक्रार दाखल केली. याबाबत शेतकरी उन्नत्ती मंडळ या शैक्षणिक संस्थेच्या अध्यक्ष राजू पाटील यांनी आमच्या शाळेतील कर्तव्यदक्ष शिक्षकांमुळे हा प्रश्नपत्रिका फुटीचा प्रकार उघडकीस आणल्याची माहिती दिली.

15 मार्चच्या विज्ञान 1 आणि त्यानंतर विज्ञान 2 या विषयाच्या प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणी दक्ष नागरिकांनी मुंबई परीक्षा मंडळाकडे तक्रार केली होती. त्यांनी याबाबत शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून गुन्हा नोंदविला असतानाच हा नवा प्रकार समोर आल्याने नारपोली पोलिसांनी या गुन्ह्याबाबत गांभीर्याने तपास सुरु केला आहे. ज्या Toppers Group च्या माध्यमातून या प्रश्नपत्रिका लीक होत होत्या, त्यांचाही शोध घेतला जाईल. शिवाय यामध्ये आणखी कुणाचा सहभाग होता याचा तपास पोलीस करत आहेत. सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन कौसडीकर यांनी याबाबत माहिती दिली.

Published On - 8:16 am, Thu, 21 March 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI