ठाण्यात सिलेंडरचा स्फोट एका घरात, महिलेचा मृत्यू दुसऱ्या घरात

ठाण्यात सिलेंडरचा स्फोट एका घरात, महिलेचा मृत्यू दुसऱ्या घरात

ठाणे: पाचपाखाडी येथील आंबेडकर रोड परिसरातील एका घरामध्ये सिलेंडर लीक होऊन भीषण स्फोट झाला. या स्फोटामुळे भिंत पडून बाजूला राहणाऱ्या  एका  वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. कांताबाई वानखडे असे या मृत महिलेचे नाव आहे.  तर ज्या घरात हा स्फोट झाला, त्या घरातील चार जण जखमी आहेत. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सकाळी नऊच्या […]

सचिन पाटील

|

Jul 05, 2019 | 4:47 PM

ठाणे: पाचपाखाडी येथील आंबेडकर रोड परिसरातील एका घरामध्ये सिलेंडर लीक होऊन भीषण स्फोट झाला. या स्फोटामुळे भिंत पडून बाजूला राहणाऱ्या  एका  वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. कांताबाई वानखडे असे या मृत महिलेचे नाव आहे.  तर ज्या घरात हा स्फोट झाला, त्या घरातील चार जण जखमी आहेत. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सकाळी नऊच्या सुमारास ही घटना घडली.

आंबेडकर रोड परिसरात एका चाळीमध्ये  संदीप काकडे आपल्या कुटुंबियांसमवेत राहतात. त्यांच्या घरात आज सिलेंडर लीक होऊन स्फोट झाला. सुरुवातीला गॅस लीक  झाला आणि त्यानंतर अचानक सिलेंडरचा स्फोट झाला. यावेळी कुटुंबातील सर्वच सदस्य घरात असल्याने घरातील चौघेही जखमी झाले.

संदीप काकडे वय 40,लतिका काकडे वय 35,वंदना काकडे वय 50, आणि हिमांशू काकडे वय 12 अशी जखमींची नावे असून, त्यांना उपचारांसाठी खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

यामध्ये वंदना काकडे 20 टक्के भाजल्या असून लतिका काकडे 35 टक्के भाजल्या आहेत. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे काकडे यांच्या बाजूला राहणाऱ्या कांताबाई वानखडे यांचा या घटनेत मृत्यू झाला आहे.

सिलेंडरचा स्फोट झाल्यानंतर कांताबाई यांच्या अंगावर घराची भिंत कोसळल्याने त्या यामध्ये जखमी झाल्या. त्यांना सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. स्फोट झाल्यानंतर तात्काळ  ठाणे महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन आणि फायर ब्रिगेडची टीम घटनास्थळी पोहोचली आणि बचाव कार्याला सुरुवात करण्यात आली.

दरम्यान  शिवसेनेचे खासदार राजन विचारे आणि आमदार प्रताप सरनाईक यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. मृत महिलेला आणि जखमींना जिल्हा प्रशासनाने आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी त्यांनी केली आहे .

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें