राज्य सरकार आज दुपारी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत… पंतप्रधानांच्या आवाहनानंतर मंत्रालयात घडामोडींना वेग

Maharashtra Cabinet Decision: आजच्या कॅबिनेट बैठकीत धडाकेबाज निर्णय अपेक्षित आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला त्रिसूत्री बचतीचे आवाहन केले आहे. त्यानंतर भाजपशासित राज्यातील नेत्यांनी अंमलबजावणीला सुरुवात केली आहे. तर आता राज्य सरकारही याविषयी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.

राज्य सरकार आज दुपारी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत... पंतप्रधानांच्या आवाहनानंतर मंत्रालयात घडामोडींना वेग
महाराष्ट्र कॅबिनेट धडाकेबाज निर्णय
Image Credit source: एजन्सी
| Updated on: May 13, 2026 | 1:13 PM

Maharashtra Cabinet Decision: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला काटकसर आणि बचतीची त्रिसूत्री सांगितली आहे. पेट्रोल-डिझेलची बचत करावी. सोने एक वर्षे खरेदी करू नये आणि खाद्यतेलाचा वापर कमी करावा असे आवाहन मोदी यांनी केले आहे. त्यानंतर आज राज्यात हालचालींना वेग आला आहे. सकाळपासूनच बैठकांचे सत्र सुरू आहे. आजच्या कॅबिनेट बैठकीत धडाकेबाज निर्णय घेणे अपेक्षित आहे.

सर्व मंत्र्यांचे वाहनताफे अर्ध्यावर?

सर्व मंत्र्यांचे वाहनताफे अर्ध्यावर येण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज बैठक घेणार आहेत. पोलिस महासंचालक, मुख्य सचिव या बैठकीला उपस्थित असतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर मंत्रालयात घडामोडींना वेग आला आहे. आज सकाळी एक बैठक झाली. दुपारी एक दुसरी बैठक झाली. आता दोन्ही बैठकीनंतर एकत्रित निर्णय जाहीर होणार आहे. सुरक्षेशी तडजोड न करता ताफ्यातील वाहनसंख्येवर मर्यादा आणण्यात येणार आहे. सर्व मंत्र्याच्या ताफ्यातील वाहनांची संख्या अर्ध्यावर येणार आहे. यावर गांभीर्याने विचार करण्यात येणार आहे. विचाराअंती एकत्रित निर्णय दुपारच्या बैठकीनंतर जाहीर होणार आहे.

काटकसरीवर भर

कलेक्टर किंवा प्रशासनाला बैठकाला न बोलावणे, ऑनलाइन संवाद करणे, असे उपाय योजण्यास सुरुवात आम्ही केली आहे. पुन्हा एकदा निर्देश देऊ, असे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. माझ्याकडे दोनच गाड्या आहे. सुरक्षा यंत्रणेने त्यापैकी कमी करता येईल असे सांगितले आहे. पंतप्रधान मोदी यांनी ज्या सूचना दिल्या आहेत त्याचा प्रत्येकानेच पालन केलेच पाहिजे, असे बावनकुळे म्हणाले.

इंदिरा गांधी यांनी अनेक वेळेला सोने खरेदी करू नका असे आव्हान केले होते. अर्थमंत्री चिदंबरम यांनीही तसे आव्हान केले. महात्मा गांधींनी सुद्धा स्वदेशीचा नारा दिला होता. त्यामुळे देशाचे मजबुती करिता काही काळ काही प्रमाणात काटकसर करावी लागली तर काय फरक पडणार आहे? आणि तसेही पर्याय खूप आहे, असे त्यांनी सुचवले.

गोपीचंद पडळकरांचा इलेक्ट्रिक बाईकवर प्रवास

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या बचतीच्या आवाहनानंतर आता सांगलीमध्ये भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगली जिल्हा नियोजन समिती सभेसाठी ई-बाईक करून जाणं पसंत केले. आपल्या समर्थकांसहित आमदार गोपीचंद पडळकर यांनी ही बाईकवरून जिल्हा नियोजन समिती सभेकडे ते रवाना झाले. देशावर इंधन संकट येऊ शकते त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे आवाहन केले आहे. त्याचे सर्वच देशवासीयांनी राष्ट्रहित डोळ्यासमोर ठेवून पालन करावे असे आवाहन सुद्धा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले. याचबरोबर माझ्या जत मतदारसंघात असणाऱ्या ऑफिस आणि घरी जे कार्यकर्ते नागरिक मला भेटायला येतात त्यांनी सुद्धा इलेक्ट्रिक बाइक चा वापर करावा आणि जास्तीत जास्त इंधन बचतीबाबत सर्वांनी प्रयत्नशील राहावं असे आवाहन सुद्धा पडळकर यांनी केले.

जपानचा दौरा रद्द केला

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशहितासाठी चांगला निर्णय घेत जनतेला प्रतिसाद देण्याचे आवाहन केले. प्रमुखाने सांगितल्याने नैतिक जबाबदारी आमची ठरते. मी ईव्ही कारमधून प्रवास करण्याचा निर्णय केला आहे. मी जपानचा दौरा रद्द केला, अध्यक्षांनी देखील सांगितलं दौरा रद्द आपण केला आहे, अशी माहिती भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी दिली.

इलेक्ट्रिक वाहनाचा वापर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर राज्यात उद्योग मंत्री उदय सामंत यांनी इलेक्ट्रिक कार वापरण्यास सुरवात केली. इंधन बचत संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना इलेक्ट्रिक वाहन वापरण्याचे आवाहन केलं होतं… आज त्यांची अंमलबजावणी उद्योग मंत्री उदय सामंत यांनी प्रत्यक्ष कृतीतून केली.

अतुल सावेंनी पायी गाठले मंत्रालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला मंत्री अतुल सावेंचा प्रतिसाद दिसून आला. इंधन बचतीचा संदेश देण्यासाठी मंत्री अतुल सावेंनी पायी मंत्रालय गाठले. इतर मागास बहुजन कल्याण, अपारंपरिक, दुग्धविकास व दिव्यांग सक्षमीकरण मंत्री अतुल सावे यांनी मोठे पाऊल टाकले. सावेंसोबत विभागाचे वरिष्ठ अधिकारीही मंत्रालयात पायी चालत दाखल झाले. मंत्री सावेंचा कित्ता इतर मंत्री व अधिकारी गिरवणार का? अशी मंत्रालयात चर्चा सुरू झाली.

इलेक्ट्रिक बोटींचा वापर करण्याचे आवाहन

माझ्या जवळ बंदर खाते आहे. मी आपल्या माध्यमातून माझ्या मच्छीमार बांधवांना व नागरिकांना आवाहन करेन की आपण डिझेलच्या बोटी वापरण्यापेक्षा इलेक्ट्रिक बोटींचा वापर करावा त्यासाठी लागणारी सगळी मदत आणि कर्ज घेण्यासाठी मदत करण्यासाठी आम्ही तयार आहोत. बाहेरगावी जाणाऱ्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात यावं आम्ही सगळे स्वागतासाठी सज्ज राहू ह्या संधीच जिल्हावासीयांनी सोनं करावं, मी माझ्या ताफ्यातील गाड्या कमी केल्या. 7 ते 8 होत्या त्या आता 3 वर आणल्या आहेत. माझी प्रशासकीय कार जी डिझेल वर आहे ती बदलून मी आता इलेक्ट्रिक गाडी घेणार आहे. सगळे सकारात्मक बदल आपण स्वीकारले तर आपले देश लवकरच महासत्ता बनेल. मोदी सरकारचा हेतू साध्य होईल, असे मंत्री नितेश राणे म्हणाले.

Follow Us